परंपरागत शेतीला पर्याय आवश्यक

By admin | Published: November 26, 2015 03:25 AM2015-11-26T03:25:54+5:302015-11-26T03:25:54+5:30

ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे जगणे उन्नत होणार नाही. शहराकडे येणारे लोंढे थांबविण्यासाठी ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणे आवश्यक आहे.

Traditional farming options are necessary | परंपरागत शेतीला पर्याय आवश्यक

परंपरागत शेतीला पर्याय आवश्यक

Next

यवतमाळ : ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे जगणे उन्नत होणार नाही. शहराकडे येणारे लोंढे थांबविण्यासाठी ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणे आवश्यक आहे. त्यासाठी उद्योग उभारणी होईल, पण परंपरागत शेतीलाही पर्याय शोधणे आवश्यक असल्याचे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या १८व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहिर, खासदार प्रफुल्ल पटेल, लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा आदी उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, बाबूजींनी आणि देशातील तमाम स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी स्वातंत्र्यापूर्वी सुराज्याचे स्वप्न पाहिले. हे स्वप्न अद्याप आपण पूर्ण करू शकलो नाही. सुखी, संपन्न, समृद्ध आणि शक्तिशाली भारताचे पुन:निर्माण करणे हीच बाबूजींना खरी श्रद्धांजली ठरेल. ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी आपल्या अर्थव्यवस्थेत बदल करावा लागेल. त्यासाठी परंपरागत शेतीचा त्याग करून तंत्रज्ञानावर आधारित नवेनवे उपाय शोधणे आवश्यक झाले आहे. ग्रामीण भागात उद्योगनिर्मितीसह वीज, पाणी, रस्ते, आरोग्यसेवा निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी सरकार काम करते आहे, असे गडकरी म्हणाले.
खा. पटेल म्हणाले, बाबूजींनी सातत्याने देशाच्या प्रगतीचाच विचार केला आहे. लोकमतच्या माध्यमातून पत्रकारितेला प्रारंभ करून त्यांनी जनप्रबोधन केले. आम्ही राजकीय क्षेत्रात असलो, तरी आमच्यासाठी काही आदर्श व्यक्तिमत्त्वे असतात. त्यात बाबूजी माझ्यासाठी आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. आधुनिक महाराष्ट्रात बाबूजींचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले गेले आहे.
खा. दर्डा यांनी आठवणींना उजाळा देत विदर्भ विकासासंदर्भात आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, बाबूजींनी विदर्भाच्या उद्योगवाढीसाठी आणि वीजनिर्मितीसाठी मोठे आणि महत्त्वाचे योगदान दिले आहे. राजकारणात विरोध होतोच, पण विकास थांबायला नको, असे त्यांचे मत होते. बाबूजींनी मला एक बाब सांगितलेली आठवते, एखाद्या कामाचे विरोधक राहू शकतात, पण ते विरोधकच असतात शत्रू नाही, हे लक्षात ठेवायला हवे. त्यामुळेच विदर्भाच्या विकासासाठी पक्षीय राजकारण कधीच विदर्भात आडवे येत नाही. गडकरी हे स्पष्टवक्ते आहेत. ते विकासपुरुष आहेत. यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा विमानतळाच्या विकासासाठी नितीन गडकरी यांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, लोकमतचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, खासदार भावना गवळी आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबूजींनी पुत्रवत प्रेम केले
बाबूजींनी विदर्भाच्या विकासासाठी केलेले कार्य कुणीच विसरू शकत नाही. ते उद्योगमंत्री असताना त्यांनी विदर्भ आणि महाराष्ट्राच्या विकासाचा प्रयत्न केला. पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांनी केलेले काम लोकमतच्या लोकप्रियतेतून सिद्ध होते. मृदुभाषी बाबूजींनी माझ्यावर पुत्रवत प्रेम केले आणि मार्गदर्शनही केले, असे नितीन गडकरी या वेळी म्हणाले.

Web Title: Traditional farming options are necessary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.