कुपोषण निर्मूलनासाठी स्मार्टफोन, टॅबचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 05:36 AM2019-03-01T05:36:05+5:302019-03-01T05:36:07+5:30

कुपोषण निर्मूलनासाठी स्मार्टफोन, टॅबचा आधार नारायण जाधव। लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राज्यातील कुपोषण निर्मूलनासह महिला बालकल्याण आणि आरोग्य ...

Smartphone, tabbed basis for eradicating malnutrition | कुपोषण निर्मूलनासाठी स्मार्टफोन, टॅबचा आधार

कुपोषण निर्मूलनासाठी स्मार्टफोन, टॅबचा आधार

Next

कुपोषण निर्मूलनासाठी स्मार्टफोन, टॅबचा आधार

नारायण जाधव।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्यातील कुपोषण निर्मूलनासह महिला बालकल्याण आणि आरोग्य विभागाच्या विविध जनकल्याणकारी योजना दुर्गम भागांत पोहोचविण्यासाठी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, अंगणवाडीसेविका, मिनी अंगणवाडीसेविकांसह आरोग्यसेविका आणि आशा कार्यकर्तींना लवकरच स्मार्टफोनसह टॅबचे वाटप करण्यात येणार आहे. सध्या अ‍ॅण्ड्रॉइड स्मार्टचा जमाना असल्याने विविध शासकीय योजनांची माहिती व्हिडीओ, छायाचित्रांसह फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे गावागावांतील अंगणवाडीसेविका, आशा कार्यकर्तींना देऊन त्यांच्या माध्यमातून कुपोषण निर्मूलन, बालमृत्यू रोखण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.


शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या निर्णयानुसार राज्यातील ८५,४५२ अंगणवाड्यांसह केंद्राच्या अखत्यारीतील ३६ जिल्ह्यांतील ५५३ प्रकल्प, ३८९९ मुख्य सेविका, अंगणवाडीसेविका आणि मिनी अंगणवाडीसेविका मिळून एक लाख २० हजार ३३५ स्मार्टफोन देण्यात येणार आहेत. यावर, १०६ कोटी ८२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तर महिला बालकल्याण विभागाप्रमाणेच राज्याच्या आरोग्य विभागानेही तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून आरोग्यसेविकांसाठी ४९२० टॅबलेट, आशा कार्यकर्तींसाठी २०७० स्मार्टफोनसह पर्यवेक्षणासाठी १० वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. यावर आठ कोटी १७ लाख ५४ हजार ५९ रुपये खर्च करण्यात येणार आहेत.


राज्यातील आदिवासीबहुल १३ जिल्ह्यांसह सर्वच प्रमुख गावे आणि आदिवासी पाड्यांत अंगणवाड्या आहेत. त्या ठिकाणी अंगणवाडीसेविकांसह मदतनिसांच्या मदतीने ती गावे/ पाडे यातील एक ते सहा वर्षांपर्यंतची लहान मुले, गरोदर महिलांसह स्तनदा मातांची नोंद ठेवून त्यांना शिक्षण आणि पोषण आहारासह वैद्यकीय मदत दिली जाते. यामुळे कुपोषणाचे प्रमाण गेल्या काही वर्षांत ३४ टक्क्यांपर्यंत खाली आहे. मात्र, यात आणखी प्रगती व्हावी, यासाठी आरोग्य विभागासह महिला आणि बालविकास विभागाने आता अंगणवाडीसेविकांसह आशा कार्यकर्तींना अ‍ॅण्ड्रॉइड फोनच्या माध्यमातूनच ‘स्मार्ट’ करण्याचा निर्णय घेतला आहे.


मोबाइल टॉवर आहेत कुठे?
राज्यातील अंगणवाडीसेविकांसह आरोग्यसेविका आणि आशा कार्यकर्तींना टॅब आणि स्मार्टफोन देऊन त्याद्वारे कुपोषण निर्मूलनाच्या योजनांची माहिती देण्याची योजना चांगली असली, तरी डोंगरदऱ्यांतील दुर्गम आदिवासी पाड्यांत मोबाइल नेटवर्क मिळत नाही. इंटरनेट पोहोचविण्यासाठी टॉवर वा आॅप्टिकल फायबरचे जाळे नाही. यामुळे पालघर, ठाणे, गडचिरोली, मेळघाटात स्मार्टफोनद्वारे कुपोषण निर्मूलन होईल कसे, असा प्रश्न अंगणवाडीसेविकांकडूनच उपस्थित केला जात आहे. यासाठी त्या भागात मोबाइल टॉवर बसविणे गरजेचे आहे.


कुपोषण निर्मूलनासाठी कसा करणार प्रचार?
सध्या अ‍ॅण्ड्रॉइड स्मार्टचा जमाना असल्याने त्यात अंगणवाडीसेविका, आशा कार्यकर्तींसह विविध आरोग्य केंदे्र, तालुका, जिल्हानिहाय ग्रुप तयार करून व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची माहिती व्हिडीओ, छायाचित्रांसह देऊन तत्काळ शेवटच्या घटकापर्यंत क्षणात पोहोचविण्यात येणार आहे. शिवाय, एखाद्या गावात गरोदर माता अवघडल्यास अन् आरोग्य मदत तत्काळ मिळावी, म्हणून या फोनच्या माध्यमातून तत्काळ वरिष्ठांना कळविण्यात येणार आहे. असाच प्रयत्न कुपोषित बालकांची माहिती छायाचित्रासह संबंधित आरोग्य अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवून त्यास वाचविणे शक्य होणार आहे.

Web Title: Smartphone, tabbed basis for eradicating malnutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.