"आता त्यांनी ठरवायचं आहे की..."; खा. संजय राऊतांचा राज ठाकरेंना पुन्हा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 05:43 PM2024-02-02T17:43:49+5:302024-02-02T17:44:32+5:30

तृणमूल काँग्रेस भाजपाचा पराभव करण्यास सक्षम आहे. त्यांनी काँग्रेससोबत आघाडी केली नसली तरी त्या इंडिया आघाडीच्या आजही घटक आहेत असा दावा संजय राऊतांनी केला. 

Sanjay Raut again asked Raj Thackeray about joining Mahavikas Aghadi | "आता त्यांनी ठरवायचं आहे की..."; खा. संजय राऊतांचा राज ठाकरेंना पुन्हा सवाल

"आता त्यांनी ठरवायचं आहे की..."; खा. संजय राऊतांचा राज ठाकरेंना पुन्हा सवाल

मुंबई - महाराष्ट्राची लूट करणाऱ्यासोबत जायचं, मुंबई वेगळी करणाऱ्यांसोबत जायचं की महाराष्ट्र, मुंबई एकसंघ ठेवणाऱ्यासोबत राहायचे हे राज ठाकरेंनी ठरवायला हवे. आज महाविकास आघाडीची बैठक संपली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर बैठकीत सहभागी होते. अनेक गोष्टींवर चर्चा झाली. किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली. आम्ही मविआमध्ये वंचितचा समावेश केला असून प्रकाश आंबेडकरांकडून आलेली सूचना त्यावर नक्कीच चर्चा होईल असं संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं. 

संजय राऊत यांनी पत्रकारांना सांगितले की, बैठकीत जागावाटपावर चर्चा सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, आम्ही आणि वंचित बहुजन आघाडीत कुठलेही मतभेद नाही. किमान समान कार्यक्रम तयार करतील त्याबाबत आंबेडकरांच्या काही सूचना आहेत. त्याचा समावेश आमच्या जाहिरनाम्यात केला जाईल. इंडिया आघाडी देशात काम करतेय. काही निर्णय हे धोरणात्मक आणि रणनीतीदृष्ट्या आहेत. आप काँग्रेसची दिल्लीत युती होतेय. तृणमूल काँग्रेस भाजपाचा पराभव करण्यास सक्षम आहे. त्यांनी काँग्रेससोबत आघाडी केली नसली तरी त्या इंडिया आघाडीच्या आजही घटक आहेत असा दावा संजय राऊतांनी केला. 

तसेच देशात संविधानविरोधी जे वातावरण निर्माण केलंय ते संपवायचे आहे. प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्ष भाजपाला मदत होईल अशी कुठलीही पाऊले उचलायची नाही. यावर आमचे एकमत झाले आहे. महाराष्ट्रातील राजकारण ज्यापद्धतीने गटांगळ्या खातंय आणि देशात हुकुमशाही सुरू आहे ते वातावरण बदलण्यासाठी आम्हाला एकत्रित राहणे गरजेचे आहे. जागावाटपावर सध्या सुरू आहे. भाजपाचा पराभव याला प्राधान्य आहे. त्यानंतर जागावाटप होईल असं विधान महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊतांनी केले. 

दरम्यान, या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनीही माध्यमांशी संवाद साधला होता. माझा चेहरा नेहमी हसराच असतो, मी दु:खी होत नाही. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर जाऊ नका. मविआच्या बैठकीत आम्ही काही मुद्दे ठेवले होते त्यावर तिन्ही पक्ष एकत्रित चर्चा करतील. त्यात काही त्रुटी असतील तर दूर करून त्यानंतर मसुदा तयार केला जाईल. महाविकास आघाडीचं इंडिया होऊ नये ही दक्षता घ्यायचे आम्ही ठरवलं आहे. त्यामुळे जागावाटप हा आमचा पुढच्या टप्प्यातील चर्चा राहणार आहे. पहिल्या टप्प्यात किमान समान कार्यक्रम यावर चर्चा सुरू आहे. इंडिया आघाडी आता राहिले नाही. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसही वेगळे राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तसं होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं त्यांनी म्हटलं होते. 

Web Title: Sanjay Raut again asked Raj Thackeray about joining Mahavikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.