राज्यात सभांचा धडाका! उद्धव ठाकरे, अजित पवार, प्रकाश आंबेडकरांच्या आज जाहीर सभा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 10:01 AM2024-03-04T10:01:28+5:302024-03-04T10:03:05+5:30

लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते, त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून प्रचारसभाही सुरु झाल्या आहेत.

Public meeting of Uddhav Thackeray, Ajit Pawar, Prakash Ambedkar today | राज्यात सभांचा धडाका! उद्धव ठाकरे, अजित पवार, प्रकाश आंबेडकरांच्या आज जाहीर सभा

राज्यात सभांचा धडाका! उद्धव ठाकरे, अजित पवार, प्रकाश आंबेडकरांच्या आज जाहीर सभा

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. नुकतेच भाजपाने १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर आता प्रत्येक पक्ष सभांचा धडाका लावत आहे. राज्यात उद्धव ठाकरे, अजित पवार, प्रकाश आंबेडकर यांच्या जाहीर सभा पार पडणार आहे. कुठल्याही क्षणी लोकसभा निवडणूक जाहीर होईल त्यामुळे राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. 

शरद पवारांच्या सभेनंतर मंचर येथे अजित पवारांची जाहीर सभा होणार आहे. सकाळी १० वाजता शिरुरच्या मांडवगण फराटामध्ये तर दुपारी ३ वाजता मंचर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याठिकाणी अजित पवार जनतेला संबोधित करणार आहेत. तर मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. आजपासून या सभेला सुरुवात होईल. साकोली, नवी मुंबई, मुंबई, हातकंणगले आणि सांगली इथं या सभा होतील. 

तर खोपोली, पनवेल आणि उरण या भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दौऱ्यावर जाणार आहेत. तळोजामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पनवेलमध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले जाईल. त्यानंतर खोपोलीच्या झाकोटिया मैदानात ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील जागावाटप अंतिम टप्प्यात आल्याचे बोलले जाते. परंतु अजूनही काही जागांवर वाद असल्याने जागावाटप जाहीर झाले नाही. महाविकास आघाडीतील जागावाटपात काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात १५ जागांमध्ये वाद आहे. तर, शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात ९ जागांवर वाद असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. तर महायुतीतही शिवसेना-भाजपा यांच्यात काही जागांवर रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे. 

Web Title: Public meeting of Uddhav Thackeray, Ajit Pawar, Prakash Ambedkar today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.