भाजपचे प्रवीण पोटे यांचा विक्रमी विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:02 AM2018-05-25T00:02:30+5:302018-05-25T00:02:30+5:30

१२८ मते असलेल्या काँग्रेस पक्षाला खरे तर मित्रपक्षांच्या मदतीने विजयासाठी आवश्यक असलेला २३८ मतांचा जादुई आकडा गाठणे अशक्य नव्हते

Pravin Pote's BJP's record victory | भाजपचे प्रवीण पोटे यांचा विक्रमी विजय

भाजपचे प्रवीण पोटे यांचा विक्रमी विजय

Next

अमरावती : राज्यभरातील राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावणारा निकाल अमरावती मतदारसंघाचा आहे. त्यासाठीची आकर्षणे दोन - एकूण वैध मतदानाच्या ९६.४२ टक्के विक्रमी मते घेऊन अमरावतीचे पालकमंत्री असलेल्या भाजपक्षाच्या प्रवीण पोटे यांनी ऐतिहासिक विजय संपादन करणे आणि एकूण ४८९ मतांपैकी १२८ मतसामर्थ्य असलेला काँग्रेस पक्ष अवघी १७ मते मिळून भाजपच्या दावणीला बांधला जाणे!
येथे भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होती. १२८ मते असलेल्या काँग्रेस पक्षाला खरे तर मित्रपक्षांच्या मदतीने विजयासाठी आवश्यक असलेला २३८ मतांचा जादुई आकडा गाठणे अशक्य नव्हते; तथापि काँग्रेस पक्षाला अखेरपर्यंत उमेदवारच सापडला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ येत असताना, 'मिळाला काय उमेदवार?' असे फोन पक्षाच्या राज्य प्रमुखांकडून स्थानिक नेत्यांना दिवसाआड येत होते. राज्य पातळीवर उमेदवार मिळत नाही; स्थानिक पातळीवर कसा मिळणार, अशी नाराजी स्थानिक नेत्यांची होती. अखेरच्या टप्प्यात काँग्रेसने स्थानिक व्यावसायिक अनिल माधोगडिया यांना धरून बांधून मैदानात उतरविले आणि त्याचवेळी काँग्रेसचा पराभव निश्चित झाला.
भाजपचे प्रवीण पोटे पाटील हे राज्यमंत्री असूनही चार महिन्यांपासून मंत्रालयात गेले नाहीत, इतकी त्यांनी मतदारसंघावर अढळ नजर ठेवली. दिवाळीपासून 'कामी' लागलेले पोटे, पाटील विरोधकांचा कुठलाही डाव उलथवून लावण्यासाठी अगदी सज्ज होते. काँग्रेस ऐनवेळी तगडा उमेदवार देईल नि आमचा 'भाव वधारेल', अशी आशा मतदारांना होती. परंतु काँग्रेसने 'निरुत्साही' उमेदवार दिल्याने स्पर्धाच निर्माण झाली नाही. पोटे यांना विरोध करणाऱ्या आमदार रवि राणा (युवा स्वाभिमान) यांना मुख्यमंत्र्यांनी शांत केले. विरोधकच न उरल्याने ४७५ वैध मतांपैकी पोटे यांनी ४५८ मते मिळविली. १३ मते बाद ठरली. एक मत न्यायालयाने गोठविले.

अमरावती मतदारसंघ
काँग्रेसची १७ मते वगळता इतर सर्वच मते पोटे यांनी स्वत:कडे वळविली. सर्वच विरोधी पक्षांची मते फुटली. मताधिक्याचा हा राज्यातील विक्रमच होय. 'सर्वांना चालणारा उमेदवार' या पोटे पाटील यांच्या छबीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.

Web Title: Pravin Pote's BJP's record victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.