नवी मुंबई : वृद्धाचा खून करणा-या आरोपीला जन्मठेप, पाच वर्षांपूर्वी पैशासाठी झाली होती हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 03:30 AM2018-02-26T03:30:07+5:302018-02-26T03:30:07+5:30

नवी मुंबईतील महापे येथील एका वृद्धाच्या खून प्रकरणातील आरोपीस ठाणे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मोबाइल फोन आणि सोनसाखळीसाठी पाच आरोपींनी सहा वर्षांपूर्वी हा खून केला होता.

 Navi Mumbai: The accused who committed the murder of the old man, was given life imprisonment five years ago for murder | नवी मुंबई : वृद्धाचा खून करणा-या आरोपीला जन्मठेप, पाच वर्षांपूर्वी पैशासाठी झाली होती हत्या

नवी मुंबई : वृद्धाचा खून करणा-या आरोपीला जन्मठेप, पाच वर्षांपूर्वी पैशासाठी झाली होती हत्या

Next

ठाणे : नवी मुंबईतील महापे येथील एका वृद्धाच्या खून प्रकरणातील आरोपीस ठाणे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मोबाइल फोन आणि सोनसाखळीसाठी पाच आरोपींनी सहा वर्षांपूर्वी हा खून केला होता.
महापे येथील हनुमाननगरात राहणारे अ‍ॅड. बलराज वाघमारे हे नवी मुंबई न्यायालयात वकिली करतात. त्यांचे वडील भीमराव वाघमारे (६२) हे महापे येथील एमआयडीसीतील केम बॉण्ड केमिकल्स लिमिटेडमध्ये माळी काम करायचे. सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० ही त्यांची नोकरीची वेळ होती. ११ मे २०१२ रोजी भीमराव वाघमारे नेहमीप्रमाणे सकाळी ८ वाजताच्या सुमारास कंपनीमध्ये कामाला गेले. वाटेत मार्कवन कंपनीजवळ त्यांना आरोपींनी अडवले. त्यांच्याजवळील मोबाइल फोन, दीड तोळ्याची सोन्याची चेन आणि मनगटी घड्याळ घेऊन धारदार शस्त्रांनी आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्याच दिवशी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास अ‍ॅड. बलराज वाघमारे हे वाशी-सीबीडी न्यायालयात असताना तुर्भे पोलिसांनी मोबाइल फोनवर संपर्क साधून त्यांच्या वडिलांच्या खुनाची माहिती दिली. अ‍ॅड. वाघमारे हे घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांच्या वडिलांचा मृतदेह मार्कवन कंपनीजवळ आढळला. त्यांच्या छातीजवळ आणि कमरेवर तीक्ष्ण शस्त्राने भोसकल्याच्या ७ खुणा होत्या.
तुर्भे पोलिसांनी या प्रकरणी भादंविचे कलम ३९७ आणि ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून तपास केला. डोंबिवली येथील अंकुश संजय मेढेकर (२२) आणि सुधीर वसंत शेलार (२२), कल्याण येथील प्रीतेश प्रल्हाद मोरे (२५), तसेच तुर्भे येथील राजू प्रल्हाद पोळ (३०) याच्यासह दिवा येथील एका बाल गुन्हेगारास पोलिसांनी या प्रकरणी काही दिवसांतच अटक केली. तेव्हापासून खटल्याचा निकाल लागेपर्यंत ते तुरुंगातच होते. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस. भैसारे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. जिल्हा सरकारी वकील संगीता फड यांनी १२ साक्षीदार तपासले. सर्व साक्षीदार शेवटपर्यंत त्यांच्या साक्षीवर कायम होते.
उर्वरित आरोपी दोषमुक्त -
भीमराव वाघमारे यांच्या गळ्यातील सोनसाखळी, त्यांचा मोबाइल फोन आदी साहित्य पोलिसांनी आरोपींजवळून हस्तगत केले. ते आरोपींजवळ कसे आले, हा प्रश्न आरोपींकडून शेवटपर्यंत अनुत्तरित राहिला. साक्षीदारांचे जबाब व पुरावे ग्राह्य धरून न्या. ए.एस. भैसारे यांनी शुक्रवारी अंकुश मेढेकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. उर्वरित आरोपींना न्यायालयाने दोषमुक्त केले.

Web Title:  Navi Mumbai: The accused who committed the murder of the old man, was given life imprisonment five years ago for murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.