भुजबळांच्या मालमत्तांवर टाच

By admin | Published: December 23, 2015 02:41 AM2015-12-23T02:41:33+5:302015-12-23T02:41:33+5:30

दिल्लीच्या महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्यात माजी मंत्री छगन भुजबळ यांना क्लीन चिट दिलेली नाही, या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवेदनास २४ तास उलटण्याच्या आत ईडीने भुजबळांच्या मालमत्तांवर टाच आणली.

Heck over the assets of Bhujbal | भुजबळांच्या मालमत्तांवर टाच

भुजबळांच्या मालमत्तांवर टाच

Next

मुंबई : दिल्लीच्या महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्यात माजी मंत्री छगन भुजबळ यांना क्लीन चिट दिलेली नाही, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवेदनास २४ तास उलटण्याच्या आत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) भुजबळांच्या मुंबईतील दोन मालमत्तांवर मंगळवारी टाच आणली. वांद्रा येथील खुला भूखंड व सांताक्रुजमधील नऊ मजली इमारत अशी ११० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. ही मालमत्ता प्रवेश कन्स्ट्रक्शन्स यांच्या नावे असून, ही कंपनी भुजबळांनीच काढलेली बेनामी कंपनी असल्याचे संचालनालय अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकरणातील संशयित आरोपी माजी मंत्री छगन भुजबळ यांची मालमत्ता जप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांच्या मालमत्तेवर टाच येण्याच्या शक्यतेचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने १८ नोव्हेंबरच्या अंकात दिले होते. याच संदर्भातील यापूर्वी चमणकर एंटरप्रायझेस यांच्या मालकीची सुमारे १७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
वांद्रे (पश्चिम) येथील संत मोनिका स्ट्रीटवरील रिकामा भूखंड, (जिथे एकेकाळी ‘हबीब मॅनोर’ उभी होती) तसेच सांताक्रुजची ‘सॉलिटेअर’ ही इमारत मंगळवारी जप्त करण्यात आली. सन २००८-०९मध्ये २६ ते २७ कोटी रुपयांना प्रवेश कन्स्ट्रक्शन्सने ही मालमत्ता खरेदी केली. माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज व पुतण्या समीर या कंपनीचे संचालक आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, या कंपनीचे शेअर्स जास्तीच्या दरांनी जवळच्या लोकांना विकण्यात आले व ही रक्कम मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आली. अन्यथा अशा कंपनीचे शेअर दुसरे कोण विकत घेणार, असा प्रश्न अधिकाऱ्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)
> भुजबळ यांची बाजू ऐकून घेणार
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही तात्पुरती जप्ती असून, यासंदर्भात न्यायाधिकाऱ्यांकडे ३० दिवसांच्या आत ही बाब नेली जाईल. त्यानंतर संबंधित अधिकारी भुजबळ यांची बाजू ऐकून घेतील व त्यानंतर अंतिम जप्ती प्रक्रिया होईल. न्यायाधिकाऱ्यांनी एकदा शहानिशा केली की, संबंधित मालमत्ता रिकाम्या करण्यासाठी नोटिसा बजावल्या जातील. त्यानंतर ताबा घेऊन सील लावले जाईल. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागेल.
> ईडीने याआधी अन्य एका प्रकरणात खारघरमधील ‘हेक्स वर्ल्ड’ ही इमारत जप्त केली होती. तिची किंमत १६० कोटी असून, या ‘हेक्स’ प्रकरणात छगन भुजबळ आरोपी नाहीत. महाराष्ट्र सदन भ्रष्टाचार प्रकरण व कालिना विद्यापीठ भ्रष्टाचार प्रकरणात त्यांच्यावर आरोप आहेत.
> जप्त केलेल्या संपत्तीशी माझा संबंध नाही. मला क्लीन चिट दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता चौकशीसाठी नवीन समिती बसविल्याचे ऐकले. आम्ही कोर्टाला सहकार्य करीत असताना ही समिती कशासाठी? सुडाचे राजकारण करूनये.
- छगन भुजबळ

Web Title: Heck over the assets of Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.