ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि 21 -   दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात हायकोर्टाजवळ असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला आज दुपारी आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.  बँकेच्या अंतर्गत भागात लागलेल्या या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले होते. मात्र सुदैवाना या आगीत कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी झाली नाही. 
 
आज दुपारी चार ते साडेचारच्या सुमारास ही आग लागली. आग लागल्यानंतर बँकेच्या कार्यालयात धावपळ उडाली मात्र तेथील कर्मचारी सुरक्षितरित्या बाहेर पडले. दरम्यान, सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग भडकल्याचे सांगण्यात येत आहे.  मात्र आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरुवात केली. या आगीमध्ये जीवित हानी झाली नसली तरी बँकेच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही आग लागल्यानंतर परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती.