एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी; मंत्री गिरीश महाजन म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 04:06 PM2024-04-17T16:06:02+5:302024-04-17T16:06:56+5:30

Girish Mahajan reaction on Eknath Khadse death threat : एकनाथ खडसे यांना मिळेलेल्या धमकीनंतर भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रक्रिया देत त्यांना चिमटा काढला आहे.

Death threat to Eknath Khadse; Minister Girish Mahajan said... | एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी; मंत्री गिरीश महाजन म्हणाले...

एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी; मंत्री गिरीश महाजन म्हणाले...

जळगाव : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. याचदरम्यान, भाजपाच्या वाटेवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे समोर आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांना मिळेलेल्या धमकीनंतर भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रक्रिया देत त्यांना चिमटा काढला आहे.

गिरीश महाजन म्हणाले, "याबाबतीत मला काही जास्त सांगता येणार नाही. मागील काळामध्ये त्यांना (एकनाथ खडसे) दाऊदकडून धमक्या आल्या असल्याचे ते सांगतात. मात्र, मला माहित नाही. त्यामुळे  याबद्दल तेच सांगू शकतील. एकनाथ खडसे मोठे नेते असल्यामुळे त्यांना मोठ्या धकम्या येतात. पोलीस यंत्रणेकडे तक्रार केली असेल तर चौकशी करतील."

याचबरोबर, "मी राज्याचा गृहमंत्री नाही. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ होईल की नाही, याबद्दल जास्त काही सांगू शकत नाही. त्यांना फोन कोठून आले? कुणी केले? हा सर्व चौकशीचा भाग आहे. परंतू दाऊदचे आणि त्याच्या गँगच्या सदस्यांचे यांच्याशी काही संबंध असल्याचे कुठे दिसत नाही. तसेच, खडसे भाजपामध्ये आले म्हणून दाऊद त्यांना काही धमक्या देईल, अशी काही परिस्थिती नाही. कारण, अनेक लोक हे भाजपामध्ये आलेले आहेत. त्यांना काही अजून धकम्या आल्या नाही", असे म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांना आतापर्यंत धमकीचे चार ते पाच फोन आले आहेत. वेगवेगळ्या नंबरवरुन एकनाथ खडसे यांना हे धमकीचे फोन आले आहेत. त्यामुळे जळगावच्या मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. या धमकीचे कारण अद्याप समोर आलेला नाही. 

धमकीच्या फोनवर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया
"दोन दिवसांपासून मला विदेशासह परराज्यातून धमकीचे कॉल आले आहेत. दाऊद व छोटा शकीलच्या नावांचा उल्लेख करत 'आपको मारना है' अशा स्वरूपाच्या धमक्या देण्यात येत आहेत. सुरुवातीला मला वाटले की कोणीतरी खोडसाळपणा करत असेल पण सातत्याने फोन आल्याने मी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. या घटनेचा राजकीय संबंध असेल असे मला वाटत नाही, मात्र पोलीस चौकशी करत आहेत. त्यामुळे तथ्य बाहेर येईल. अशा धमक्या मला अनेक वेळा आल्या आहेत. त्यामुळे परिवारात कुठेही भीतीचे वातावरण नाही. खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांना सुचित केले आहे आणि आम्हीही आवश्यक ती काळजी घेत आहोत," अशी प्रतिक्रिया जीवे मारण्याची धमकीचे कॉल आल्याप्रकरणी एकनाथ खडसेंनी दिली.
 

Web Title: Death threat to Eknath Khadse; Minister Girish Mahajan said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.