सेना-भाजपाचा मित्रपक्षांना ठेंगा

By admin | Published: July 29, 2014 03:01 AM2014-07-29T03:01:36+5:302014-07-29T03:01:36+5:30

विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांची बैठक आयोजित केली

BJP-BJP alliance will beat | सेना-भाजपाचा मित्रपक्षांना ठेंगा

सेना-भाजपाचा मित्रपक्षांना ठेंगा

Next

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांची बैठक आयोजित केली खरी, पण मूळ विषयाला बगल देत निवडणूक तयारीचे प्रवचन ऐकवून आणि नुसत्या याद्या घेऊन भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांनी मित्रपक्षांची बोळवण केली.
जागावाटपावर भाजपा-शिवसेना नेत्यांचेच अजून एकमत झालेले नसताना आज रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्रामच्या नेत्यांसह महायुतीची एकत्रित बैठक झाली. ही बैठक जागावाटपासंदर्भात आहे, असे सर्वांना सांगण्यात आले होते, पण प्रत्यक्षात भाजपा, शिवसेनेच्या नेत्यांनी निवडणुकीच्या तयारीसाठी काय करायला हवे, हेच चऱ्हाट लावले. वास्तविक घटक पक्षांचे नेते आपापल्या याद्या घेऊन आलेले होते. पण त्यांना बोलण्याची संधीच देण्यात आली नसल्याचे समजते.
सूत्रांनी सांगितले की, रिपाइंला ४०, महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला २४, राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ३० तर शिवसंग्रामला किमान ३० जागा हव्या आहेत. महायुतीतील घटक पक्षांकडे जागांची यादी मोठी असल्याचे समजल्याने त्यावर चर्चा टाळण्यात आली. शिवसंग्राम वगळता इतर घटक पक्षांनी आपापल्या याद्या सेना-भाजपा नेत्यांकडे सादर केल्या, पण चर्चाच न झाल्याने त्यांचा हिरमोड झाला. खा. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत या स्वाभिमानी संघटनेच्या दोन नेत्यांमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद असल्याचे बैठकीत दिसून आले.
यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना विनायक मेटे म्हणाले, महायुती सत्तेत आली पाहिजे ही आमची भूमिका आहे, त्यासाठी अडवणुकीची भूमिका घेणार नाही. नेमक्या कोणत्या जागा हव्या आहेत त्यांची नावे द्या, असे आजच्या बैठकीत सांगण्यात आले.
महायुतीतील पक्षांपैकी कोणाला भाजपाच्या चिन्हावर लढायची इच्छा असेल तर आमची हरकत असणार नाही, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: BJP-BJP alliance will beat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.