औरंगाबाद: रस्त्यावरील लघू पुलाचा अंदाज न आल्याने भरधाव कंटेनर सरळ कठड्याला धडकडला. या भीषण अपघातात कंटेनरचा समोरच्या भागाचा चुरडा होत दोन जण जखमी झाले. यातील एक  जण मात्र कठडा आणि कंटेनरमध्ये अडकून पडला. सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर कटरने पत्रा कापून आणि क्रेनच्या सहायाने कंटेनर उचलून त्यास मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. जीवनमरणाच्या स्पर्धेत तरूणाने मृत्यूवर विजय मिळविला. ही घटना बीडबायपास रोडवरील बाळापुर फाट्याजवळ पहाटे ३.३०  वाजच्या सुमारास घडली.
अनिल हरी हराडे (२०,रा. बलसुर, ता.उमरगा,जि.लातुर) असे जखमी चालकाचे नाव आहे.  एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, जखमी अनिल हराडे हा वाहनचालक आहे.तो कंटेनरमध्ये मैदा घेऊन धुळे जिल्ह्यातील अमळनेर येथून अनंतापुरकडे(मध्यप्रदेश) जात होता. त्याच्यसोबत आणखी एक चालक आणि  क्लीनर होता. रात्रभर अनिल गाडी चालवित असल्याने औरंगाबादच्या बीडबायपासमार्गे पुढे जात असताना त्याला झोपेची डुलकी लागली आणि त्याचे कंटेनवरील नियंत्रण सुटले. यावेळी  बाळापुर फाट्याजवळील पुलाच्या क ठड्याला कंटेनर धडकून अडकला. या अपघातात अनिलशेजारी बसलेल्या एक जण किरकोळ जखमी झाला तर क्लिनरला कोणतीही दुखापत झाली नाही. हा अपघात एवढा भिषण होता की कंटेनरचा समोरच्या भागाचा चुरडा झाला आणि चालक अनिल याच्या पोटात स्टेअरिंग घुसले आणि हा कमेरेपासून खालीचा भाग  कंटेनरच्या केबिनमध्ये अडकला. त्याला जागेवरून हालचालही करताना प्रचंड वेदना होत. पहाटे साडेतीन चार वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे, उपनिरीक्षक सिताराम केदारे आणि कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकास बाहेर काढण्याचा प्रयत्न केला,मात्र ते त्यांना शक्य झाले नाही.शेवटी त्यांनी पत्रा कापणाºयास आणि क्रेनचालकास घटनास्थळी बोलावून घेतले. चार तासाच्या प्रयत्नानंतर कंटेनरच्या केबिनचा पत्रा कापल्यानंतर जखमी अनिलला बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. यावेळी अग्नीशमन दलाच्या जवानांनीही त्यास बाहेर काढण्यासाठी मदत केली. यानंतर चालकाला घाटी रुग्णालयात दाखल केले.