भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद; ठाण्यात भीमसैनिक उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 05:12 AM2018-01-03T05:12:24+5:302018-01-03T05:12:54+5:30

भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद ठाणे जिल्ह्यातही उमटले. कोपरी, कासारवडवली आणि मानपाडा हे मार्ग रोखून धरण्यात आले, तसेच रस्त्यावर उतरलेल्या भीमसैनिकांनी शहरातील दुकाने बंद केली होती, तर मानपाडा ब्रीजखाली टायर जाळला.

 Bhima-Koregaon incident; Thane ghammasin landed on the road | भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद; ठाण्यात भीमसैनिक उतरले रस्त्यावर

भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद; ठाण्यात भीमसैनिक उतरले रस्त्यावर

Next

ठाणे - भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद ठाणे जिल्ह्यातही उमटले. कोपरी, कासारवडवली आणि मानपाडा हे मार्ग रोखून धरण्यात आले, तसेच रस्त्यावर उतरलेल्या भीमसैनिकांनी शहरातील दुकाने बंद केली होती, तर मानपाडा ब्रीजखाली टायर जाळला. ठाणे पालिका परिवहन सेवेच्या ५ बस फोडल्याची माहिती ठामपा प्रशासनाने दिली.
ठाण्यात दुपारी घोडबंदर रोड कासारवडवली, मानपाडा, नितीन कंपनी आणि ठाण्यातील पूर्व द्रुतगती मार्ग भीमसैनिकांनी रोखून धरला. या ‘रस्ता रोको’मुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता, तसेच कासारवडवली, मानपाडा, कोपरी, वागळे इस्टेट, सावरकरनगर, लोकमान्यनगर परिसरातील दुकाने बंद केली होती. कोपरी पूर्व येथे गावदेवी जत्रोत्सव सुरू असल्याने आगरी बांधवांनी रस्त्यावर उतरून बंद केलेली दुकाने दुकानदारांना पुन्हा उघडायला लावली. दरम्यान, बुधवारी महाराष्टÑ बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यातील व्यापारी आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही ठाण्यातील रिपाइंच्या नेत्यांनी केले आहे.

कल्याणमध्ये मोर्चा, दुकाने बंद
कल्याण : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी कल्याण पूर्व आणि पश्चिम परिसरात आंबेडकरी अनुयायांनी मोर्चा काढला. शहरातील दुकानेही बंद करण्यात आली. पूर्वेतील कोळसेवाडी, श्रीराम टॉकीज, पुणे लिंक रोड, सिद्धार्थनगर, काटेमानिवली, चक्कीनाका, सूचकनाका, नेतिवली या परिसराबरोबरच पश्चिमेतील स्टेशन परिसर, शिवाजी चौक, लालचौकी, रमाबाई आंबेडकर नगर, बिर्ला महाविद्यालय, चिकणघर, मोहने, आंबिवली या परिसरातील दुकाने बंद करण्यात आली होती.
पत्री पुलाजवळ आंबेडकरी अनुयायांनी या घटनेचा निषेध करत घोषणाबाजी केली होती. वालधुनी, उल्हासनगरकडे जाणाºया रिक्षा बंद होत्या. मात्र, कल्याणमध्ये तुरळक प्रमाणात रिक्षा सुरू होत्या. सोमवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास वालधुनी सर्कल परिसरातून जाणाºया एका एसटी बसवर कार्तिक जोंधळे, किरण काऊतकर आणि त्यांच्या दोन मित्रांनी दगडफेक केली, तसेच बसची काच फोडली. महात्मा फुले चौक पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पाच टीएमटी फोडल्या
ठाणे महापालिक ा परिवहन सेवेच्या ५ बसच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. यामध्ये वागळे ईस्टेट येथे एक तर मुलुंंड डम्पिंग रोड या परिसरात ४ अशा ५ बसच्या काचा फोडण्यात आल्या. दरम्यान, ठाणेकर नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी बसच्या काही मार्गात बदल क रून टीएमटीची सेवा सुरू ठेवल्याचे परिवहन व्यवस्थापक व उपायुक्त संदीप माळवी यांनी सांगितले.

भिवंडीत ‘रास्ता रोको’ : भिवंडी महापालिका कार्यालयासमोर आंबेडकर अनुयायांनी हल्ल्याचा निषेध केला, तर आरपीआय सेक्युलरच्या पदाधिकाºयांनी लेखी पत्र पाठवून हल्लेखोरांवर कारवाईची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शहरातील नदीनाका व कोनगाव येथे ‘रास्ता रोको’ केला. हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी आरपीआय सेक्युलरचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड.किरण चन्ने यांनी केली आहे.

डोंबिवलीत तणावपूर्ण शांतता
डोंबिवली : येथील शेलार नाका परिसरात रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी रात्री ९.३० ते १० च्या सुमारास काही गाड्यांची तोडफोड केली, तसेच थोडा वेळ ‘रास्ता रोको’ केला. त्यात काही नागरिक जखमी झाले, तर पोलिसांवरही हल्ल्याचा प्रयत्न झाल, पण रामनगर व टिळकनगर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार केले गेले. घटनेची माहिती मिळताच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह इतर नेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मंगळवारी दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दिवसभरात पाच जणांच्या तक्रारी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल करून घेण्यात आल्या.

तासाभरातच अंबरनाथमधील बंद मागे
अंबरनाथ : भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध करण्यासाठी काही दलित संघटनांनी अंबरनाथ बंदची हाक दिली होती. वातावरण तंग होण्याची भीती पाहता, व्यापा-यांनी दुपारी २नंतर बंद पाळला. तासाभरातच तो मागे घेण्यात आला. त्यानंतर, शहरातील वातावरण पूर्ववत झाले. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

बदलापुरात निदर्शने
बदलापूर : बदलापूरमधील भीमसैनिक मोठ्या संख्येने बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ जमले होते. बदलापूर शहर बंदची हाक दिल्यावर सर्व व्यापा-यांनी बंद पाळला, तर जमलेल्या भीमसैनिकांनी शहरात रॅली काढत, या घटनेचा निषेध केला.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. भीमसैनिकांनी एकत्र येत, त्या घटनेचा निषेध करण्याकरिता शांतता रॅली काढली. सकाळी ९ वाजता काढलेल्या रॅलीचा समारोप २ तासांनंतर झाला. बदलापूर शहरातील दुकाने बंद राहिल्याने नागरिकांची मात्र गैरसोय झाली.

उल्हासनगरमध्ये कडकडीत बंद
उल्हासनगर : भीमा-कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ तरुण सकाळी रस्त्यावर उतरल्यावर दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली. रिक्षा संघटनेनेही बंदमध्ये सहभाग घेतल्याने चाकरमान्यांसह शालेय विद्यार्थी, ज्येष्ठांचे हाल झाले. दरम्यान, कॅम्प नं ४ येथील सेंट्रल पार्क हॉटेलसमोर आंदोलकांनी दगड ठेऊन रस्ता बंद केला होता. ते उचलण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आंदोलकांनी दगडफेक केली. यात ३ पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यापैकी दोघांच्या डोक्याला मार लागला आहे.

नवी मुंबईत वाहतुकीचा बोजवारा 
नवी मुंबई : भीमा कोरेगाव, सणसवाडी येथे दोन गटांमध्ये उफाळलेल्या संघर्षाचे लोण नवी मुंबई, पनवेल येथेही पसरले़ आंदोलक थेट रस्त्यावर उतरल्याने काही भागांत वाहतूककोंडी झाली. चेंबूर, गोवंडी येथे ‘रेल रोको’ झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली़ पनवेल ते वाशी लोकल धिम्या गतीने सुरू होत्या. पनवेलहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाºया प्रवाशांचे हाल झाले.
चेंबूर, सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. याचा परिणाम सायन-पनवेल मार्गावर झाला, तसेच महत्त्वाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नवी मुंबईमधील ऐरोली व तुर्भे येथे मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याने काही काळ तणावपूर्वक वातावरण निर्माण झाले होते. ऐरोलीमध्ये निषेध मोर्चात सामील झालेले गौतम सूर्यवंशी हे किरकोळ जखमी झाले.

महामार्गावर वाहतूककोंडी
हार्बर मार्गावरील वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांनी प्रवासी बस व इतर खासगी वाहनांचा आधार घेतला. मात्र, या मार्गावरही जाम झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. संध्याकाळी ५ नंतर वाहतूक पूर्ववत झाली असून, रस्त्यांवरील वाहतूककोंडी कमी झाली.

Web Title:  Bhima-Koregaon incident; Thane ghammasin landed on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.