आणखी एक रेल्वे अपघात : आसनगावजवळ दुरांतो एक्स्प्रेस घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 05:01 AM2017-08-30T05:01:25+5:302017-08-30T05:01:46+5:30

नागपूरहून मुंबईकडे येत असलेल्या दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिनसह सहा डबे आसनगावजवळ रेल्वे रूळावरून घसरल्याने कल्याण-कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी काही प्रवासी जखमी झाले.

Another train accident: Duranto Express near Asangaon dropped | आणखी एक रेल्वे अपघात : आसनगावजवळ दुरांतो एक्स्प्रेस घसरली

आणखी एक रेल्वे अपघात : आसनगावजवळ दुरांतो एक्स्प्रेस घसरली

Next

श्याम धुमाळ 
कसारा : नागपूरहून मुंबईकडे येत असलेल्या दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिनसह सहा डबे आसनगावजवळ रेल्वे रूळावरून घसरल्याने कल्याण-कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी काही प्रवासी जखमी झाले.
मंगळवारी सकाळी ६.३०च्या सुमारास नागपूरहून मुंबईकडे निघालेली दुरांतो एक्स्प्रेस आसनगाव रेल्वेस्थानकापुढे आली असता अचानक रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळल्याने सर्व मातीचा ढिगारा व दगड रेल्वे ट्रॅकवर आला होता. तेवढ्यात दुरोंतो एक्स्प्रेस आली. समोर दरडी पडल्याचे लक्षात येताच दुरांतोचालकाने प्रसंगावधान साधून अचानक ब्रेक दाबला व गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता इंजिन रुळावरून घसरून विजेच्या खांबावर धडकले व पलटले. त्या पाठोपाठ गाडीचे बी-१, बी-२, बी-३, बी-४, बी-५, बी-६ हे डबेही घसरून पलटी झाले. अपघात इतका भयानक होता की, रेल्वेचे विजेचे पोल, ओव्हरहेड तारा रेल्वे ट्रॅकवर आडव्या झाल्या होत्या. एकीकडे पाऊस व दुसरीकडे दरडींचा ढिगाराा यामुळे मदतकार्यास विलंब होत होता. अपघात झाल्यानंतर रेल्वेची आसनगाव ते वासिंददरम्यानचा वीज पुरवठा बंद करून डब्यांमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम करण्यात आले.
दरम्यान अपघातस्थळ जंगलात असल्यामुळे आपत्कालीन यंत्रणा पोहोचण्यास उशीर झाला. रेल्वे प्रशासनाने तसेच शहापूर तहसीलदार रवींंद्र बाविस्कार यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देत घटनास्थळी आढावा घेतला.
दुरांतो एक्स्प्रेसमध्ये नागपूरहून मुंबईला उपचारासाठी निघालेले ६ रुग्ण होते. त्यात फ्रॅक्चरचे २ रुग्ण तर डायलेसीससाठी मुंबईकडे निघालेले ३ रुग्ण तर एक हार्ट पेशंट होते. या रुग्णांना शहापूर येथील आपत्ती व्यवस्थापन ग्रुपच्या सदस्यांनी खासगी रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात हलविले. या रुग्णांपैकी नंदकिशोर मधुकर जिसकर (रा. अमरावती, भरतवाडी) यांना जसलोक हॉस्पिटल मुंबई येथे हलविण्यात आले तर गंगूबाई जोरदेवर (६०) रा. चंद्रपूर यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अन्य ४ प्रवाशांना कल्याण येथे पाठविण्यात आले असून, त्यांची नावे समजू शकली नाहीत.
दुरुस्तीसाठी आलेल्या रेल्वे कर्मचाºयांना रेल्वे ट्रॅकवरील ओव्हरहेड वायरचे काम करताना अचानकपणे शॉक लागला. त्यात रामा राघो मेंगाळ, यशवंत भगत, मंगळू वारघडे, रामा वाघ, सखाराम मांगे, शिवराम ठाकरे हे जखमी झाले. या दरम्यान प्रवाशांचे हाल झाले. डोक्यावर बॅगा घेऊन जो-तो सुमारे २ किमी. पायपीट करीत महामार्ग गाठत होते. तेथून मिळेल त्या वाहनाने प्रवाशांनी कल्याण, ठाणे गाठले. अपघाताची माहिती मिळताच खासदार कपिल पाटील, आमदार पांडुरंग बरोरा यांनी घटनास्थळी धाव घेतली.
 

Web Title: Another train accident: Duranto Express near Asangaon dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.