शेती वाटणीच्या वादातून भयंकर कृत्य; धूलिवंदनाला भर चौकात गाठून एकाचा खून  

By संदीप शिंदे | Published: March 26, 2024 03:28 PM2024-03-26T15:28:54+5:302024-03-26T15:29:50+5:30

शेतीच्या वादातून एकाचा खून; औसा तालुक्यातील टाका येथील घटना

Terrible act from farm sharing dispute; Killed one by meeting at Bhar Chowk | शेती वाटणीच्या वादातून भयंकर कृत्य; धूलिवंदनाला भर चौकात गाठून एकाचा खून  

शेती वाटणीच्या वादातून भयंकर कृत्य; धूलिवंदनाला भर चौकात गाठून एकाचा खून  

बेलकुंड (जि. लातूर) : शेती वाटणीच्या कारणावरून औसा तालुक्यातील टाका येथे टाका सोमवारी सायंकाळी ७:३० वाजता एकाचा खून झाल्याची घटना घडली असून, याबाबत भादा पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर शिंदे असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले, टाका येथील भास्कर दगडू शिंदे, संतोष दगडू शिंदे व रमाकांत दगडू शिंदे यांच्यात शेतीच्या वाटणीवरून वाद होता. सोमवारी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास भास्कर शिंदे हे गावातील मुख्य चौकात आले असता, संतोष शिंदे, रमाकांत शिंदे, सोन्या मोरे व विजया मोरे यांनी त्यांना गाठून शेतीच्या वाटणीच्या विषयावरून झटापट करून जखमी केले. त्यानंतर धारदार शस्त्राने शरीरावर वार केल्याने भास्कर शिंदे हे गंभीर जखमी झाले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

याप्रकरणी सदानंद भास्कर शिंदे यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध कलम ३०२, ३२३ अंतर्गत भादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी औशाचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी गोसावी, भादा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुलकुमार भोळ यांनी भेट दिली. पुढील तपास उपनिरीक्षक व्यंकट कुसमे करीत आहेत. दरम्यान, आरोपींच्या शोधासाठी पथके नियुक्त करण्यात आली असून, आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: Terrible act from farm sharing dispute; Killed one by meeting at Bhar Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.