तुम्हाला काका-पुतण्या नातं धार्जिणं दिसतंय; लातूरमध्ये जयंत पाटलांचा खास शैलीत अजित पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 09:52 PM2024-02-18T21:52:54+5:302024-02-18T21:54:05+5:30

जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

Latur Jayant Patal taunted Ajit Pawar in a special style | तुम्हाला काका-पुतण्या नातं धार्जिणं दिसतंय; लातूरमध्ये जयंत पाटलांचा खास शैलीत अजित पवारांना टोला

तुम्हाला काका-पुतण्या नातं धार्जिणं दिसतंय; लातूरमध्ये जयंत पाटलांचा खास शैलीत अजित पवारांना टोला

Jayant Patil ( Marathi News ) : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीही फुटली आणि एकसंध असणाऱ्या पवार कुटुंबातही उभी फूट पडली. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पक्षावर दावा सांगितल्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच मूळ पक्ष असल्याचा निकाल दिला. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा त्यांचे काका आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्याशी राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राला काका-पुतण्या वादाचा नवा अंका पाहायला मिळत आहे. याचाच संदर्भ घेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील आज लातूर येथील कार्यक्रमात बोलताना अजित पवारांना टोला लगावला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण आज लातूर येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाला विलासराव देशमुखांचे बंधू दिलीपराव देशमुख हेदेखील उपस्थित होते. त्यांना उद्देशून जयंत पाटील यांनी मिश्किलपणे म्हटलं की, "तुम्हाला काका-पुतण्या नातं धार्जिणं दिसतंय. दिलीपराव देशमुख हे उत्तमपणे नेतृत्व करत आहेत. त्यांचे आणि अमितभैय्यांचे संबंध अतिशय मधुर आहेत. राजकारणात कोणी कसंही वागलं तरी चालतं, पण राजकारणासाठी व्यक्तिगत नातं तोडण्याची भूमिका कोणी घेता कामा नये. मात्र महाराष्ट्रात आता तेही होऊ लागलं आहे," असं म्हणत जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

"राजकारणाची पातळी घसरली आहे"

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "लोकं एखाद्या व्यक्तीला त्यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे स्मरणात ठेवतात. विलासराव देशमुख साहेब यांनी मराठवाड्यासाठी आणि संपूर्ण राज्यासाठी विस्तृत काम केले आहे. आटपाडीच्या साखर कारखान्याच्या उद्घाटनप्रसंगी ते आले होते. तेव्हा त्यांचे भाषण पहिल्यांदा ऐकलं. राजकारण्याने कसे भाषण करावे हे विलासरावांकडून शिकले पाहिजे. मी त्यांच्या मंत्रिमंडळात अधिकतम काम केले आहे. त्यामुळे त्यांचे आणि माझे घनिष्ट ऋणानुबंध होते. त्याकाळी फार वेगळे राजकीय संस्कार आम्ही अनुभवले. म्हणून महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेऊ शकलो. आज विलासराव देशमुख साहेब असते तर काँग्रेसच्या संकटाच्या काळात उभे ठाकले असते. आज राज्यातील काँग्रेस भक्कम पाय रोवून उभी आहे ती विलासराव देशमुख साहेबांमुळे. आता राजकारणाचा काळ फार बदलला आहे. भाषा, कृत्य सर्वच स्तरावर पातळी घसरली आहे. राजकारणात गुंडगिरी वाढली आहे. मंत्रिमंडळात सुसंवाद नाही. सर्वच बाबतीत राज्याचा आलेख उतरता आहे. लातूरकरांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती टिकवण्यासाठी पुढाकार घ्यावा," असं आवाहन यावेळी जयंत पाटील यांनी देशमुख बंधूंना केलं आहे.

Web Title: Latur Jayant Patal taunted Ajit Pawar in a special style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.