कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोबोटिक प्रशिक्षण

By समीर देशपांडे | Published: November 4, 2023 12:17 PM2023-11-04T12:17:28+5:302023-11-04T12:17:59+5:30

जिल्हा नियोजन समितीमधून २ कोटी ७६ लाख २४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध

Students of Kolhapur Zilla Parishad will get robotic training | कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोबोटिक प्रशिक्षण

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोबोटिक प्रशिक्षण

समीर देशपांडे

कोल्हापूर : विद्यार्थ्यांना शालेय वयातच रोबोटिक्स तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, यासाठी कोल्हापूरजिल्हा परिषदेच्या ३३० शाळांना रोबोटिक्स किट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच फायदा १० हजार विद्यार्थ्यांना होणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून २ कोटी ७६ लाख २४ हजार रुपयांचा निधी उपलब्धही झाला आहे. याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या नावीन्यपूर्ण योजनेतून हे नियोजन करण्यात आले आहे. सहावी ते आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आखण्यात आली आहे. विविध संशोधकांच्या मते, प्रारंभिक शिक्षणातील स्टीम म्हणजेच सायन्स टेक्नाॅलाॅजी इंजिनिअरिंग अँड मॅथेमॅटिक्स रोबोटिक्स प्रशिक्षण हे भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्टीम एज्युकेशनच्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका पेपरमध्ये अनौपचारिक शिक्षणामुळे स्टीम विषयांमध्ये रस निर्माण होऊ शकते, असे स्पष्ट केले आहे.

प्राथमिक स्तरापासूनच शिक्षण पद्धतीचे आधुनिकीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना वर्गातील संकल्पना व्यावहारिक अनुप्रयोगांसह जोडण्यास उत्सुक बनवण्यासाठी आणि रोबोटिक्सच्या साहाय्याने मिळालेल्या ज्ञानाकडे विद्यार्थी जाण्यास शिकतो आणि प्रक्रियेत तर्क आणि तर्काची कौशल्ये मिळवून समाधान केंद्रित दृष्टिकोनाने शिकतो, असा दावा याबाबतच्या जिल्हा परिषदेच्या टिपणीमध्ये करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांची होणार पूर्वपरीक्षा

या किट्सच्या माध्यमातून १० हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. परंतु, ३३० शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या १८ हजार आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांची आधी पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे. त्यातून गणित, विज्ञान, तंत्रज्ञान विषयाकडे कल असणाऱ्या दहा हजार विद्यार्थ्यांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. यासाठी एकूण खर्च ३ कोटी ८६ लाख रुपये येणार असून त्यापैकी २ कोटी ७६ लाख रुपये जिल्हा परिषदेला उपलब्ध झाले आहेत. खरेदी समितीच्या १३ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत या प्रकल्पाबाबत चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यातील केंद्र शाळा पूर्ण सुसज्ज करण्यात येणार असून, त्यांना आदर्श शाळा बनवण्याचा संकल्प आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू असून या शाळांमध्ये प्राधान्याने रोबोटिक्स किट देण्याचा मानस आहे. -संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर

Web Title: Students of Kolhapur Zilla Parishad will get robotic training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.