पाणी चोरीसाठी आता सिंगल फेज यंत्रणा

By admin | Published: March 16, 2017 12:20 AM2017-03-16T00:20:18+5:302017-03-16T00:20:18+5:30

चिकोत्रा खोेऱ्यातील अवस्था : पाटबंधारे विभागाचे अधिकारीच हतबल; उत्तर किनारा तहानलेलाच

Single phase system now for water theft | पाणी चोरीसाठी आता सिंगल फेज यंत्रणा

पाणी चोरीसाठी आता सिंगल फेज यंत्रणा

Next



दत्तात्रय पाटील ल्ल म्हाकवे
चिकोत्रा प्रकल्पातून येणाऱ्या पाण्यावरच चिकोत्रा खोऱ्यातील ३० ते ३५ गावांची तहान भागते. मात्र, चिकोत्रा धरणामध्येच अपुरा पाणीसाठा होत असल्यामुळे आणि या परिसरात बागायती क्षेत्र वाढल्यामुळे त्याचा परिणाम थेट पिण्याच्या पाण्यावर होत आहे. विशेष म्हणजे या नदीकाठावरील अगदी शेवटच्या टोकावर असणाऱ्या खडकेवाडा, बेळुंकी, गलगले, हमीदवाडा, मेतगे, लिंगनूर (कापशी) या गावांना महिन्यातून केवळ १० ते १२ दिवसच पाणी मिळते आणि इतरवेळी पाण्यासाठी वणवण करावी लागते.
यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी काटेकोर नियोजन करीत असून, महावितरणनेही उपसाबंदी करून सहकार्याचे हात पुढे केले आहेत; परंतु आता काही बडे शेतकरी सिंगल फेजवर चालणाऱ्या यंत्रणांचा वापर करून पाणी उपसा करीत आहेत. त्यामुळे शेवटच्या गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यात हा नव्याने अडथळा निर्माण झाला असून, त्याच्यावर नियंत्रण आणण्याचे पाटबंधारे व महावितरणसमोर नव्याने आवाहन तयार झाले आहे. शाश्वत पाण्यासाठी उपाययोजना होणे गरजेच्या असल्याच्या येथील जनतेच्या भावना आहेत.
म्हातारीच्या पठारावर बांध घालून वाया जाणारे पाणी चिकोत्राकडे वळविल्यामुळे यंदा या धरणात अल्पसा पाणीसाठा वाढला आहे. पावसाळ्यानंतर या धरणात ६२ टक्के पाणीसाठा होता. चिकोत्रा नदीतून खडकेवाडा, बेळुंकी पर्यंत
२८ कोल्हापुरी बंधारे आहेत. ते भरण्यासाठी प्रत्येक महिन्यातून एकदा पाणी सोडले जाते. म्हणजेच साधारणत: एका आवर्तनाला ९० एम. सी. एफ. टी. इतके पाणी लागते. धरणातून सोडलेले पाणी खडकेवाडा- बेळुंकी बंधाऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी उपसाबंदी लागू केली जाते. मात्र, काही शेतकरी रात्री- अपरात्री अवैधपणे पाणी उपसा करीत असल्याचेही निदर्शनास आले आहे. तर काहीजण राजकीय आश्रय घेऊन अधिकाऱ्यांवरच दबाव तंत्राचा अवलंब करीत असल्याचेही बोलले जात आहे.
मात्र, उपसाबंदी काटेकोर व्हावी यासाठी काही ग्रामस्थांनी आंदोलनेही केली. त्यामुळे पाटबंधारे विभागाने मध्यरात्री कार्यवाही करून उपसा सुरू असणारे विद्युत पंप सील केले होते. त्यामुळे या पाण्याचे नियंत्रण व रखवाली करणारे पाटबंधारे विभागाचे अधिकारीच (रखवालदार) हतबल होताना दिसत आहेत; परंतु काही अतिहुशार मंडळी थ्री फेजवर उपसाबंदी केल्यामुळे थ्री फेजऐवजी सिंगल फेजवर विद्युत पंप चालणारी यंत्रणा इलेक्ट्रिशियन तज्ज्ञांकडून कार्यरत करून अवैधपणे पाणी उपसा करीत आहेत. त्यामुळे धरणाच्या उत्तरेकडील शेवटच्या टोकाला आवर्तनाचे पाणी मिळायला अधिकच वेळ लागत असून, याबाबत ग्रामस्थांसह येथील शेतकऱ्यांमध्ये संतापाचाही लाट उसळली आहे.
बागायतीवर मर्यादा हाच एकमेव पर्याय
धरणातील अल्प पाणीसाठा आणि या खोऱ्यातील लोकसंख्येचा विचार करता हे पाणी पिण्यासाठीच पुरेसे आहे. त्यातून थोडेफार शिल्लक राहिल्यास शेतीसाठी देता येऊ शकते. मात्र, पाण्याचा अंदाज न घेता उसासारख्या बागायती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पाण्याचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे पाण्याची शाश्वत उपलब्धता होईपर्यंत बागायती क्षेत्र मर्यादित ठेवणे, तसेच ठिबक सिंचनचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे जाणकारांतून बोलले जात आहे.
अशी होते वीज चोरी : चिकोत्राचे पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहोचविण्यासांठी उपसाबंदी केली आहे. या काळात विद्युत पंपाची थ्री फेज कनेक्शन वीजपुरवठा बंद असतो. मात्र, सिंगल फेज सुरू असते. याचा फायदा उठवत काही शेतकऱ्यांनी तज्ज्ञ इलेक्ट्रिशियनकडून एका फ्युजला कनव्हर्टर (गट्टू) जोडला जातो. यामुळे याचे रूपांतर थ्री फेजमध्ये होऊन विद्युत पंप नेहमीप्रमाणे पाणी खेचतो. यासाठी ५00 ते एक हजार रूपये इतका नाममात्र खर्च येत असल्याने अनेकांनी हा पर्याय अवलंबिला आहे. तसेच, मोटर पाण्यात असते, त्यामुळे त्याचा आवाज येत नाही.
शाश्वत पाण्यासाठी असाही पर्याय...
चिकोत्रा खोऱ्याच्या उत्तरेकडील वर्षानुवर्षे अवर्षणग्रस्त असणाऱ्या खडकेवाडा, हमीदवाडा, गलगले, लिंगनूर, बेळुंकी या गावांच्या पिण्याच्या पाण्यासह येथील शेतीच्या पाण्यासाठी वेदगंगा या बारमाही वाहणाऱ्या नदीतून शासकीय पातळीवर अथवा साखर कारखान्यांमार्फत बस्तवडे ते हमीदवाडापर्यंत केवळ (३ कि.मी) एखादी मोठी पाणी योजना करून हमीदवाडा गावच्या दक्षिण बाजूला असणाऱ्या ओढ्यापर्यंत पाणी टाकायचे आणि तेथून ते ओढ्यातून थेट चिकोत्रा नदीत मेतगे बंधाऱ्यात पोहोचू शकते. त्यामुळे या अवर्षणग्रस्त भागाला शाश्वत पाण्याची उपलब्धता होऊ शकते. यासाठी येथील शेतकऱ्यांनी एकसंघ होऊन शासनासह कारखानदारांकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे.

Web Title: Single phase system now for water theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.