लोकसभेचे रणांगण : पवार फॉर्म्युल्याने कोल्हापुरात काँग्रेसचा दावा बळकट, महायुतीची अडचण काय? जाणून घ्या

By विश्वास पाटील | Published: August 28, 2023 05:22 PM2023-08-28T17:22:26+5:302023-08-28T17:23:32+5:30

महायुतीत काय सुरू आहे.. जाणून घ्या

Sharad Pawar formula strengthens Congress claim for Kolhapur Lok Sabha seat | लोकसभेचे रणांगण : पवार फॉर्म्युल्याने कोल्हापुरात काँग्रेसचा दावा बळकट, महायुतीची अडचण काय? जाणून घ्या

लोकसभेचे रणांगण : पवार फॉर्म्युल्याने कोल्हापुरात काँग्रेसचा दावा बळकट, महायुतीची अडचण काय? जाणून घ्या

googlenewsNext

विश्वास पाटील

कोल्हापूर : ज्या मतदारसंघात ज्या पक्षाची उमेदवार निवडून आणण्याची क्षमता आहे, त्यांनीच त्या जागेचा आग्रह धरावा असे सूत्र निश्चित केले जाणार असल्याचे महाविकास आघाडीचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच स्पष्ट केल्याने कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसचा दावा अधिक मजबूत झाला आहे. उमेदवारांच्या पातळीवर आजच्या घडीला तरी शाहू महाराज आणि आमदार पी. एन. पाटील यांच्यावरच महाविकास आघाडीची मदार आहे. हातकणंगले मतदारसंघात या निकषात बसू शकेल असा उमेदवार तिन्ही पक्षांकडे नसल्याने तिथे प्रागतिक पक्षांच्या आघाडीतून राजू शेट्टी यांना बळ दिले जाण्याची शक्यता आहे.

पवार हे नेहमीच जमिनीवरील राजकारण करणारे नेते आहेत. त्यानुसारच त्यांनी लोकसभेबाबत जागा वाटपाचे सूत्र निश्चित करण्याचे जाहीर केले आहे. जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी पाच विधानसभा व एक लोकसभा लढवण्याची तयारी असल्याचे जाहीर केले असले तरी वास्तव वेगळे आहे. कोल्हापूर लोकसभेत सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. शिवाय विधान परिषदेचे दोन आमदार आहेत. राष्ट्रवादी (पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांचा एकही आमदार नाही.

सद्य:स्थितीत महाविकास आघाडीतून शिवसेनेतून विजय देवणे, संजय घाटगे, काँग्रेसकडून चेतन नरके, बाजीराव खाडे आणि राष्ट्रवादीतून व्ही. बी. पाटील यांची नावे चर्चेत आहेत. हे सर्वजण कार्यकर्ते म्हणून चांगले असले तरी लोकसभेला किमान एक विधानसभा मतदारसंघ तुमच्या पाठीशी असावा लागतो. व्यक्तिगत लाखभर मतांची जोडणी असेल तरच लोकसभेचे गणित सोपे होते. त्या पातळीवर या उमेदवारांच्या मर्यादा आहेत. नरके यांनी तिन्ही पक्षांकडे चाचपणी केल्याने कोणताच पक्ष त्यांना आपले मानायला तयार नाही.

व्ही. बी. पाटील वगळता इतर उमेदवार आर्थिक ताकदीच्या पातळीवरही मर्यादा असणारे आहेत. विरोधात भाजपचा उमेदवार असणार आहे. त्यांच्याकडे देश व राज्याची सत्ता आहे. ते कशी यंत्रणा राबवतात, याची झलक कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत अनुभवास आली आहे. त्यामुळे त्यांना सर्वच पातळीवर पुरून उरेल, अशा ताकदीचा उमेदवार आवश्यक आहे.

काँग्रेसकडून आमदार पी. एन. पाटील यांनी लढावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु त्यांनी अजून होकार दिलेला नाही. कोल्हापुरातील मोठ्या समूहाला या लढतीत शाहू महाराज यांनीच उतरावे असे वाटते. त्यांनी आजतरी त्यास ठाम नकार दिला आहे. परंतु पी. एन. किंवा शाहू महाराज हे उमेदवार असतील तर महाविकास आघाडीला ही लढत सोपी जाऊ शकते.

हातकणंगले मतदारसंघात माजी खासदार राजू शेट्टी यांची भूमिका ‘एकला चलो रे..’ची आहे. परंतु ते प्रागतिक पक्षांच्या आघाडीत सहभागी झाले आहेत. ही आघाडी महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या हालचाली आहेत. तसे झाले तर हातकणंगलेची जागा शेट्टी यांच्यासाठी सोडली जाऊ शकते. तिथे शेट्टी यांच्याव्यतिरिक्त लोकसभा लढवू शकेल, असा उमेदवार तिन्ही पक्षांकडे नाही. टोकाचा मोदी विरोध असणारे शेट्टी ही सुद्धा महाविकास आघाडीची गरज आहे.

महायुतीत काय सुरू आहे..?

महायुतीत सद्य:स्थितीत शिंदे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने हेच उमेदवार असतील, असे चित्र आहे. परंतु भाजप सातत्याने मतदारसंघांचा सर्व्हे करून घेत आहे. त्यामध्ये या दोघांच्या विरोधात जनमत आहे, असे निष्कर्ष आले तर त्यांच्या उमेदवारीबाबत काहीही घडू शकते. अजित पवार गट सत्तेत आल्याने तसाही मुख्यमंत्री गट बचावात्मक स्थितीत आहे.

भाजपला या निवडणुकीत एकेक जागा महत्त्वाची आहे. खासदार मंडलिक यांना थांबवून अन्य कोण उमेदवार देणे ही सुद्धा सोपी गोष्ट नाही. कारण कागल, राधानगरी, चंदगड विधानसभा मतदारसंघात मंडलिक गटाची ताकद आहे. असे काही झाल्यास त्यातून भाजपच्या अडचणीच वाढतील. खासदार माने यांचाही पर्याय कोण याचे उत्तर आजच्या घडीला सापडत नाही.

Web Title: Sharad Pawar formula strengthens Congress claim for Kolhapur Lok Sabha seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.