कोल्हापूर : आरक्षणासाठी धनगर समाजाचा महामोर्चाद्वारे सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 05:07 PM2018-08-24T17:07:08+5:302018-08-24T19:28:07+5:30

धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या (एसटी)आरक्षणाची अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांसाठी समस्त धनगर समाज आरक्षण कृती समितीतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला.

Kolhapur: Warning to the Government through the democracy of Dhangar community for reservation | कोल्हापूर : आरक्षणासाठी धनगर समाजाचा महामोर्चाद्वारे सरकारला इशारा

कोल्हापूर : आरक्षणासाठी धनगर समाजाचा महामोर्चाद्वारे सरकारला इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देआरक्षणासाठी धनगर समाजाचा महामोर्चाद्वारे सरकारला इशारा ...अन्यथा हातात कुऱ्हाड अन शेळ्या मेंढ्या घेऊन रस्त्यावर उतरु: प्रकाश शेंडगे

कोल्हापूर : धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या (एसटी)आरक्षणाची अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांसाठी समस्त धनगर समाज आरक्षण कृती समितीतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. तर ८ सप्टेंबरपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास हातात कुऱ्हाड आणि शेळ्या मेंढ्या घेऊन रस्त्यावर उतरु असे, रणशिंग माजी आमदार रमेश शेंडगे यांनी यावेळी फुंकले.

जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून धनगर बांधवांनी सकाळपासूनच दसरा चौकात जमायला सुरुवात केली. दुपारी बाराच्या सुमारास महामोर्चाला सुरुवात झाली. कपाळी भंडारा व हातात पिवळे झेंडे घेतलेल्या धनगर बांधवांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...’, ‘राजर्षी शाहू महाराज की जय...’, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर की जय...’‘यळकोट...यळकोट...जय मल्हार...’, असा जयघोष करत मोर्चामार्ग दणाणून सोडला.

व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार रोडमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. सुरुवातीला धनगर समाजातील रणरागिणी व मावळ्यांना बोलण्याची संधी देण्यात आली. यामध्ये तनिष्का म्हैसाळे (अर्जुनवाडा), माऊली गावडे (शिरोली पुलाची ), विश्वनाथ पुजारी (नेर्ली), श्रद्धा पुजारी (कुंभोज), प्रज्ञा पुजारी (अब्दुलल्लाट), श्रुती बरगाले (हेरवाड), सायली पुजारी यांनी आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत माघार नाही असा इशारा सरकाला दिला.

त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी यळकोट यळकोट जय मल्हार च्या घोषणांनी दाद दिली. यानंतर मागण्यांचे निवेदन या रणरागिणींच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना सादर करण्यात आले. 

यावेळी माजी आमदर प्रकाश शेंडगे म्हणाले, कालेलकर आयोगाने धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश केला. परंतु नंतर ‘ध’ चा ‘मा’ झाल्याने धनगर समाज आरक्षणापासून वंचित राहीला. मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी बारामती येथील सभेत आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. परंतु चार वर्षे होत आली तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर २०१९ च्या निवडणुकीत भंडारा फुकून सरकार खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.

आंदोलनात विलासराव वाघमोडे, बाबूराव हजारे, अशोक कोळेकर, कल्लाप्पा गावडे, आप्पासो हजारे, तानाजी हराळे, बाबासो सावगावे, राजसिंह शेळके, संजय अनुसे, अभिजीत बत्ते, राजेंद्र कोळेकर, देवाप्पा चोपडे, जगन्नाथ माने, डॉ. संदीप हजारे, बयाजी शेळके, बाळासो मोटे, प्रा. लक्ष्मण करपे, उन्मेश वाघमोडे, संदीप कारंडे आदींसह धनगर समाज बांधव सहभागी झाले होते.
 

 

Web Title: Kolhapur: Warning to the Government through the democracy of Dhangar community for reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.