कोल्हापूर :‘ईएसआयसी’चा बाह्यरुग्ण विभाग मार्चअखेर होणार सुरू, कामाचा प्रारंभ; दुसऱ्या टप्प्यात रुग्णालयाची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 06:41 PM2017-12-22T18:41:42+5:302017-12-22T18:46:23+5:30

 कोल्हापूर येथील राज्य कामगार विमा योजनेचे रुग्णालय (ईएसआयसी) हे नवी दिल्लीतील राज्य कर्मचारी बिमा निगमकडे (एम्लॉईज स्टेट इन्शुरन्स् कॉर्पोरेशन) हस्तांतरित झाल्यानंतर आठ महिन्यांनी आता आणखी एक सकारात्मक पाऊल पडले आहे. या ‘ईएसआयसी’मधील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) मार्च २०१८ अखेर पर्यंत सुरू होणार आहे. त्यादृष्टीने कामाचा प्रारंभ झाला आहे.

Kolhapur: The outer post of 'ESIC' will start at the end of March, start of work; In the second phase, the hospital started | कोल्हापूर :‘ईएसआयसी’चा बाह्यरुग्ण विभाग मार्चअखेर होणार सुरू, कामाचा प्रारंभ; दुसऱ्या टप्प्यात रुग्णालयाची सुरुवात

कोल्हापुरातील ईएसआयसी रुग्णालयाच्या इमारतीमध्ये बाह्यरुग्ण विभागाचा मार्चअखेरपर्यंत प्रारंभ केला जाणार आहे. (छाया : दीपक जाधव)

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर :‘ईएसआयसी’चा बाह्यरुग्ण विभाग मार्चअखेर होणार सुरूकामाचा प्रारंभ; दुसऱ्या टप्प्यात रुग्णालयाची सुरुवाततपासणी होणार, औषधे मिळणार

संतोष मिठारी

 कोल्हापूर : येथील राज्य कामगार विमा योजनेचे रुग्णालय (ईएसआयसी) हे नवी दिल्लीतील राज्य कर्मचारी बिमा निगमकडे (एम्लॉईज स्टेट इन्शुरन्स् कॉर्पोरेशन) हस्तांतरित झाल्यानंतर आठ महिन्यांनी आता आणखी एक सकारात्मक पाऊल पडले आहे. या ‘ईएसआयसी’मधील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) मार्च २०१८ अखेर पर्यंत सुरू होणार आहे. त्यादृष्टीने कामाचा प्रारंभ झाला आहे.


निधीची उपलब्धता, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, राज्य शासनाकडून अडलेले हस्तांतरण आदी कारणांमुळे कोल्हापुरातील ईएसआयसी रुग्णालय हे पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची प्रतीक्षा गेल्या १७ वर्षांपासून विमाधारक कामगार करत आहेत. यातील हस्तांतरणाचा अडथळा मे २०१७ मध्ये दूर झाला.

राज्य शासनाने मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे रुग्णालय ईएसआय कॉर्पोरेशनकडे हस्तांतरित केले. ईएसआय कॉर्पोरेशनच्या बांधकाम विभागातील पथकाने या रुग्णालयाची इमारत, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची पाहणी करून डागडुजी आणि अपुऱ्या कामांची माहिती घेतली.

त्यानंतर आॅक्टोबरमध्ये केंद्र सरकारचे प्रतिनिधी राज्याचे वरिष्ठ आरोग्य आयुक्त डॉ. रेश्मा वर्मा, मुंबईतील अतिरिक्त आयुक्त एस. के. सिन्हा यांनी या रुग्णालय आणि प्रशासकीय कार्यालयाची पाहणी केली.

यावेळी कोल्हापुरातील विविध उद्योजकीय संघटनांच्या शिष्टमंडळाने संबंधित रुग्णालय लवकर सुरू करण्याची मागणी केली. यावर डॉ. वर्मा आणि सिन्हा यांनी सहा महिन्यांत या रुग्णालयाची दुरूस्ती, नूतनीकरणाचा प्रारंभ सहा महिन्यांत करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार पहिला टप्पा म्हणून या रुग्णालयात ओपीडी सुरू करण्याचे काम सुरू झाले आहे.

हा विभाग रुग्णालयाच्या इमारतीतील डाव्या बाजूच्या जागेत सुरू होणार आहे. यासाठी रुग्णालय परिसरातील साफसफाई आणि झुडपे काढण्याचे काम बुधवारी (दि. २०) पासून सुरू झाले आहे. साफसफाईचे काम दहा दिवसांत पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर ओपीडीतील आवश्यक साहित्य, यंत्रसामग्रीची व्यवस्था केली जाणार आहे. ओपीडीनंतर शंभर बेडचे रुग्णालय सुरू करण्याची कार्यवाही होणार आहे.

तपासणी होणार, औषधे मिळणार

या रुग्णालयातील ‘ओपीडी’ मार्च अखेरपर्यत सुरू होईल. याठिकाणी दहा डॉक्टरांसह इतर दहा कर्मचारी कार्यरत असतील. येथे नियमित आरोग्य तपासणी होण्यासह औषधेदेखील मिळणार आहेत. रक्त, लघवी तपासणी सुविधा उपलब्ध असेल, अशी माहिती ईएसआयसी रुग्णालयाचे अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील झोडे यांनी सांगितले.

ते म्हणाले, ईएसआय कॉर्पोरेशनच्या सूचनेनुसार या रुग्णालय इमारतीची डागडुजी, आवश्यक वैद्यकीय उपकरणे, आदींबाबतच्या खर्चाचा सुधारित प्रस्ताव सादर केला आहे. त्यासह सन २०१८-१९ मधील या खर्चासाठी २५ कोटींची मागणी केली आहे.

 

ईएसआय कॉर्पोरेशनच्या सूचनेनुसार या रुग्णालयात ‘ओपीडी’ सुरू होणार आहे. याबाबतच्या कामाचा प्रारंभ बुधवारी झाला आहे. मार्चअखेरपर्यंत ओपीडी सुरू करण्याचे अंतिम मुदत ईएसआय कॉर्पोरेशन दिली आहे.
- संदीपकुमार,
व्यवस्थापक, ईएसआयसी कोल्हापूर

 

ईएसआयसी रुग्णालयाची वाटचाल दृष्टिक्षेपात

* सन २००० : रुग्णालयाची उभारणी
* रुग्णालय सुरू होण्यासाठी श्रमिक संस्था, कामगार, उद्योजकांचा गेल्या १५ वर्षांपासून लढा
* सन २०१४ : राज्य कामगार विमा महामंडळाचे उपक्षेत्रीय सहसंचालक राजशेखर सिंग यांच्याकडून रुग्णालयाची पाहणी
* सन २०१५ : ईएसआय कॉर्पोरेशनच्या पथकाकडून पाहणी
* सन २०१६: रुग्णालय सुरू करण्याचा कृती आराखडा सरकारला सादर
* मे २०१७ : रुग्णालयाचे ईएसआय कॉर्पोरेशनकडे हस्तांतरण
* आॅक्टोबर : राज्याचे वरिष्ठ आरोग्य आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी
* डिसेंबर : ओपीडी सुरू करण्याच्या कामाचा प्रारंभ

 

Web Title: Kolhapur: The outer post of 'ESIC' will start at the end of March, start of work; In the second phase, the hospital started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.