काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 03:48 PM2024-05-13T15:48:51+5:302024-05-13T15:51:24+5:30

लोकसभा निवडणुकीदरम्यान आता काँग्रेसने 'मराठी कार्ड' खेळल्याची चर्चा रंगत आहे.

The Indian National Congress promises that Marathi will be given the status of a classical Indian language as soon as the All India Government is formed | काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन

काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन

Congress Jairam Ramesh ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडत असताना काँग्रेसकडून मराठी भाषेसंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे. "इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भारतीय भाषेचा दर्जा दिला जाईल, हे वचन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देत आहे," असं काँग्रेस नेते आणि खासदार जयराम रमेश यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत आता काँग्रेसने 'मराठी कार्ड' खेळल्याची चर्चा रंगत आहे.

जयराम रमेश यांनी एक्सवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलगू, मल्याळम आणि ओडिया या भाषांना अभिजात भारतीय भाषा म्हणून दर्जा देण्यात आला होता. ११ जुलै २०१४ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठीला अभिजात भारतीय भाषा म्हणून घोषित करण्यासाठी अहवाल सादर केला होता. सदर अहवालावर आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांपासून काहीही निर्णय घेतला नाही. इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भारतीय भाषेचा  दर्जा दिला जाईल, हे वचन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देत आहे."

केंद्र सरकारवर टीकास्त्र

मराठी भाषेला अभिजात भारतीय भाषेचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून जयराम रमेश यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "मराठीच्या समृद्ध अभिजात इतिहासाचा पुरावा देणारा सबळ अहवाल यूपीएच्या अखेरीस सादर शासनाकडे करण्यात आला. असं असूनही मागील १० वर्षातील काळात नरेंद्र मोदींनी एकाही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही किंवा नोंद केलेली नाही. मार्च २०२२ मध्ये काँग्रेस खासदार श्रीमती रजनी पाटील यांनी याबद्दल  राज्यसभेत आवाज उठवला होता. तरी पण या बाबतीत पूर्ण २ वर्षे उलटूनही पंतप्रधान मौन आणि निष्क्रिय आहेत," असा हल्लाबोल जयराम यांनी केला आहे.

दरम्यान, "काँग्रेस पक्ष सर्व भारतीय भाषांचा आदर करतो आणि‌ १० वर्षातील काळात डॉ. मनमोहन सिंग यांनी ६ वेगवेगळ्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्यांनी निरंतर भाषा विकासाला आणि संशोधनाला पाठिंबा दिला. आम्हाला विश्वास आहे की, महाराष्ट्रातील मतदार या पंतप्रधानांना त्यांच्या मराठीबद्दलच्या असलेल्या त्यांच्या उदासीनतेबद्दल चांगलाच धडा शिकवतील," असंही जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

Web Title: The Indian National Congress promises that Marathi will be given the status of a classical Indian language as soon as the All India Government is formed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.