‘ईएसआयसी’ रुग्णालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 06:17 PM2017-07-24T18:17:25+5:302017-07-24T18:17:25+5:30

राज्य शासनाकडून हस्तांतरण; इमारतीची डागडुजी, वैद्यकीय उपकरणांबाबतचा प्रस्ताव सादर

Free the 'ESIC' hospital | ‘ईएसआयसी’ रुग्णालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा

‘ईएसआयसी’ रुग्णालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा

Next

  आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि.२४ : राज्य शासनाने कोल्हापुरातील राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालय (ईएसआयसी) हे राज्य कर्मचारी बिमा निगमकडे (ईएसआय कॉर्पोरेशन) हस्तांतरीत केले आहे. यावर ईएसआय कॉर्पोरेशनच्या सूचनेनुसार या रुग्णालय इमारतीची डागडुजी,आवश्यक वैद्यकीय उपकरणे, आदींबाबतच्या खर्चाचा प्रस्ताव स्थानिक व्यवस्थापनाने गेल्या दहा दिवसांपूर्वी सादर केला आहे. त्यामुुळे आता हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ईएसआयसी रुग्णालय हे पूर्ण क्षमतेने सुरू होण्यात निधीची उपलब्धता, बांधकाम पूर्णत्वाचा दाखल, राज्य शासनाकडून अडलेले हस्तांतरण आदी अडथळे होते. यातील सर्वात महत्त्वाचा असलेला हस्तांतरणाचा अडथळा गेल्या दोन महिन्यांपूर्वी दूर झाला आहे.

राज्य शासनाने मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे रुग्णालय दिल्लीतील ईएसआय कॉर्पोरेशनकडे हस्तांतरीत केले आहे. यानंतर संबंधित कार्पोरेशनच्या बांधकाम विभागातील पथकाने कोल्हापुरातील या रुग्णालयाची इमारत, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची पाहणी करुन डागडुजी आणि अपुऱ्या कामांची माहिती घेतली आहे.

या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदाची अतिरिक्त जबाबदारी बिबेवाडी (जि. पुणे) येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिल झोडे यांच्यावर गेल्या आठवड्यात सोपविली आहे. रुग्णालयासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे आणि अन्य साहित्य उपलब्धतेबाबतच्या सुमारे दहा कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने कार्पोरेशनला सादर केला आहे. त्यामुळे संबंधित रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होण्याबाबत गेल्या १७ वर्षांपासून विमाधारक कामगारांची प्रतिक्षा आता संपणार असल्याचे दिसत आहे.

कोल्हापुरातील ईएसआयसी रुग्णालयाचे राज्य शासनाकडून कार्पोरेशनकडे हस्तांतरण झाले आहे. यानंतर कार्पोरेशनच्या पथकांनी दोनवेळा याठिकाणी भेट दिली आहे. रुग्णालय सुरू होण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊले पडत आहेत.

- संदीपकुमार,
व्यवस्थापक, ईएसआयसी कोल्हापूर

या रुग्णालयासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे, औषधे, निधीची उपलब्धता याबाबतचा प्रस्ताव ईएसआय कॉर्पोरेशनला गेल्या दहा दिवसांपूर्वी सादर केला आहे. इमारतीच्या डागडुजीसाठीच्या खर्चाचा प्रस्ताव कार्पोरेशनच्या बांधकाम विभागाने दिला असल्याचे समजते. लवकरात लवकर रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - डॉ. सुनिल झोडे,
अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक, ईएसआयसी रुग्णालय 

Web Title: Free the 'ESIC' hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.