इचलकरंजीच्या नगराध्यक्षांना अभय

By admin | Published: June 19, 2015 12:30 AM2015-06-19T00:30:33+5:302015-06-19T00:36:33+5:30

सुरेश हाळवणकर यांची माहिती : मुख्याधिकाऱ्यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त

Ichalkaranji's city chief | इचलकरंजीच्या नगराध्यक्षांना अभय

इचलकरंजीच्या नगराध्यक्षांना अभय

Next

इचलकरंजी : नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांना शहर विकास आघाडीचा पाठिंबा कायम आहे, असे म्हणत आमदार सुरेश हाळवणकर यांनी मुख्याधिकारी सुनील पवार यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. पवार यांच्या जागी ‘आयएएस’ दर्जाचा मुख्याधिकारी इचलकरंजी नगरपालिकेस द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.आठवड्यांच्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आमदार हाळवणकर यांनी नगराध्यक्षा बिरंजे यांना अभय दिले. ते म्हणाले, पालिकेतील विकासकामे, पारदर्शीपणा आणि नागरी सेवा-सुविधांसाठी ‘शविआ’ ने त्यांना पाठिंबा दिला आहे; पण काही गैरव्यवहार दिसल्यास तो ‘शविआ’ हाणून पाडेल. त्यासाठी उदाहरण देताना कूपनलिकांवर पाणबुडे पंप व पाण्याच्या टाक्या बांधण्याच्या निविदेत भ्रष्टाचार दिसताच ती निविदा ‘शविआ’ ने हाणून पाडल्याचे आमदार हाळवणकर यांनी स्पष्ट केले.मुख्याधिकारी पवार यांचा प्रशासनावर वचक नसल्याने नगरपालिकेच्या कामकाजामध्ये वारंवार गोंधळ उडत आहे. कर्मचाऱ्यांच्या शिस्तीसाठी नगरपालिकेमध्ये बसविण्यात आलेल्या बायोमेट्रिक यंत्रामध्ये कुणीतरी पाणी ओतले; पण त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. नागरिकांची कामे वेळेत होण्यासाठी ‘नागरिकांची सनद (सिटीजन चार्टर)’ नगरपालिकेने स्वीकारला असली, तरी त्याची प्रशासनाकडून अंमलबजावणी होत नाही. नागरिकांची कामे वेळेत व्हावीत, यासाठी आयएएस दर्जाचा मुख्याधिकारी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)


सीसीटीव्ही कॅमेरे न बसविण्याचे गौडबंगाल
शहरातील काही प्रमुख ठिकाणी, तसेच नगरपालिका कार्यालयात पालिकेकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार होते. मात्र, फक्त घोषणा करून कॅमेरे न बसविण्यामागे कोणते गौडबंगाल आहे, असा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला. ते म्हणाले, नगरपालिका कार्यालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास गैरव्यवहारांना आळा बसेल. हाणामारी होणार नाही. ज्यामुळे नगरपालिकेची पर्यायाने शहराची प्रतिष्ठा वाढेल म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे मी माझ्या आमदार फंडातून बसविणार आहे.


मक्तेदार नगरसेवकांमुळे दर्जाहीन कामे
नगरपालिकेमध्ये मूठभर नगरसेवक हे मक्तेदार झाले आहेत. त्यांनी त्यांच्या सग्या-सोयऱ्यांच्या नावावर मक्ता घेतल्याने पालिकेची कामे दर्जाहीन होत असून, बिले मंजूर करून घेण्यासाठी दबाव टाकला जातो. प्रसंगी वाद घालत हाणामारी केली जाते. शिवीगाळ व धक्काबुक्की होण्यासारख्या प्रसंगाने इचलकरंजी नगरपालिकेचे सभागृह बदनाम होत आहे. म्हणून मुख्याधिकाऱ्यांना अशा नगरसेवकांचा गोपनीय अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यास सांगितले आहे. मात्र, त्यांच्याकडून हे काम होत नसल्याचे निदर्शनास येत आहे, असाही आरोप हाळवणकरांनी पत्रकारांशी बोलताना केला.

Web Title: Ichalkaranji's city chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.