जॉर्ज फर्नांडिस यांचा कोल्हापुरातही गोतावळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:59 AM2019-01-30T00:59:04+5:302019-01-30T00:59:09+5:30

कोल्हापूर : जनता दलाचे दिवंगत आमदार रवींद्र सबनीस, शंकर धोंडी पाटील, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, व्यंकाप्पा भोसले हा जॉर्ज ...

George Fernandes's Gokhav in Kolhapur | जॉर्ज फर्नांडिस यांचा कोल्हापुरातही गोतावळा

जॉर्ज फर्नांडिस यांचा कोल्हापुरातही गोतावळा

googlenewsNext

कोल्हापूर : जनता दलाचे दिवंगत आमदार रवींद्र सबनीस, शंकर धोंडी पाटील, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, व्यंकाप्पा भोसले हा जॉर्ज यांचा कोल्हापुरातील गोतावळा.
कोल्हापुरात १९७२ च्या सुमारास एस.टी. कर्मचारी युनियनच्या परिषदेसाठी जॉर्ज कोल्हापुरात आले होते. हॉटेल सह्याद्रीमध्ये ते उतरले होते. पेटाळ्यालाही त्यांच्या उपस्थितीमध्ये एक कामगार परिषद झाली होती. त्यानंतर इचलकरंजीला जात असताना पाटोळेवाडीत शिवाजीराव पाटोळे आणि राजाराम पाटोळे यांनी त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता.
बिंदू चौकातही त्यांची शंकर धोंडी पाटील यांनी जाहीर सभा आयोजित केल्याची आठवण यावेळी सांगण्यात आली. उत्तूर (ता. आजरा) येथील सेवा संस्थेच्या इमारतीचे उद्घाटन जॉर्ज फर्नांडिस यांच्या हस्ते १८ मे १९८५ रोजी केले होते.
आजरा तालुक्यातील हाजगोळी बुद्रुक येथील जगदीश देशपांडे हे जॉर्ज फर्नांडिस यांचे सहकारी. ते रेल्वे युनियनचे काम पाहत होते. बिहारमधील जॉर्ज यांच्या मतदारसंघामध्ये नेहमी त्यांचा वावर असे. संरक्षणमंत्री असताना जगदीश यांच्या विनंतीनुसार १९९९ साली जॉर्ज हाजगोळी येथे आले होते. सामान्य नागरिकाप्रमाणे जाजमावर बसून भाजी-भाकरीचा आस्वाद घेणाऱ्या या देशाच्या संरक्षणमंत्र्यांचे असे दर्शन नागरिकांना नवीन होते. संरक्षणमंत्री असल्याने तत्कालीन जिल्हाधिकाºयांपासून ते जिल्हा पोलीसप्रमुखांपर्यंत सर्वांनी त्यांना तेथे जाणे टाळण्याबाबत सूचना दिली होती. मात्र, ही सूचना झुगारून धुरळ्याच्या रस्त्याने जॉर्ज यांनी पूर्ण दिवस हाजगोळीत घालविला.
निष्ठेचे मोजमाप : दिवंगत माजी आमदार शंकर धोंडी पाटील यांचे जॉर्ज यांच्याशी अत्यंत जवळचे ऋणानुबंध होते; परंतु जॉर्ज अखेरच्या राजकीय प्रवासात भाजपसोबत गेले हे शंकर धोंडी यांना रुचले नव्हते. पक्षीय निष्ठा कशा जोखायच्या या प्रश्नांवर त्यांनी मार्मिक टिप्पणी केली होती. एका व्यक्तीला आठ मुले होती. सात मुलांची लग्ने वाजतगाजत झाली. आठव्या मुलाच्या लग्नात त्या व्यक्तीची बायको वाजंत्र्याबरोबर पळून गेली, तर आपणतरी काय करायचे? असे शंकर धोंडी म्हणायचे. पक्षीय निष्ठा प्राणपणाने जपण्याचा तो काळ होता.
प्रभाव असाही : जॉर्ज फर्नांडिस यांच्याबद्दल अशीही एक आठवण सांगितली जाते, की ते सभेत बोलायला उभे राहिले, की इंदिरा गांधी त्यांचे भाषण कधीच ऐकायच्या नाहीत; कारण जॉर्ज यांच्यामध्ये आपला मुद्दा दुसºयाला पटवून देण्याची प्रचंड हातोटी होती; त्यामुळे जॉर्ज सांगतात ते कदाचित आपल्याला खरे वाटू लागेल, अशी भीती इंदिरा गांधी यांना वाटत असे.

मृणालतार्इंबरोबरच जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी माझे जवळचे नाते होते. त्यांच्या जाण्याने घरातील वडीलधारी व्यक्ती गेल्याचे दु:ख झाले. ‘बंद सम्राट’ म्हणून त्यांनी मुंबई गाजवली. अतिशय सामान्य परिस्थितीतून आलेल्या, प्रसंगी फूटपाथवर झोपून दिवस काढलेल्या जॉर्जनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देशाचे राजकारण आपल्या कवेत घेतले. त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत विलक्षण होते.
- अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, राष्ट्रीय उपाध्यक्ष,
जनता दल -सेक्युलर
जॉर्ज एकदा असेच अचानक कोल्हापुरात आले होते. शंकर धोंडी पाटील, रवींद्र सबनीस, मला त्यांचे फोन आले. आम्ही त्यांना भेटायला गेलो. पाटील आणि सबनीस कामानिमित्त परत गेले आणि मी त्यांच्याबरोबर थांबलो. इतका वेळ काय करायचा म्हणून त्यांना मी आमच्या माकडवाला वसाहतीत नेले. तेथे त्यांनी दीड तास भाषण केले. माझ्या घरी भोजन घेतले.
- व्यंकाप्पा भोसले, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: George Fernandes's Gokhav in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.