अधिकाऱ्यांत बाचाबाची

By admin | Published: June 19, 2015 12:33 AM2015-06-19T00:33:47+5:302015-06-19T00:36:15+5:30

प्रदूषण नियंत्रण बैठक : प्रश्न बाजूलाच, अधिकाऱ्यांना झोडपले

In-charge of the officers | अधिकाऱ्यांत बाचाबाची

अधिकाऱ्यांत बाचाबाची

Next

कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भात जर तुम्ही महानगरपालिकेच्या बाबतीत एवढी आक्रमक भूमिका घेत असाल तर मग प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांच्या बाबतीत गप्प का बसता, अशी रोखठोक विचारणा करीत विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांनी येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी चांगलेच झोडपले. चोक्कलिंंगम् यांच्या भूमिकेमुळे प्रदूषणाच्या मुद्द्यापेक्षा वैयक्तिक प्रतिष्ठेवरूनच अधिकाऱ्यांत ‘तू-तू मैं-मैं’चा मुद्दा अधिक गाजला. विभागीय आयुक्त चोक्कलिंगम् यांनी गुरुवारी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पंचगंगा प्रदूषणाच्यासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत चोक्कलिंगम् यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी एन. एच. शिवांगी यांना चांगलेच फैलावर घेतले. ‘ज्या पद्धतीने तुम्ही कोल्हापूर महानगरपालिकेला नोटिसा पाठविता, कारवाईचा इशारा देता त्या पद्धतीने तुम्ही इतर कारखान्यांच्या बाबतीत का घेत नाही. तेथे का तुमचा आवाज गप्प राहतो’, अशा शब्दांत शिवांगी यांना सुनावले गेले.
‘रंकाळा तलावातील मासे मेले याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसताना त्याबाबत महापालिकेला कोणत्या मुद्द्यावर जबाबदार धरता. त्यांच्यावर क्लेम करता आणि कारवाईची भाषा कशी करता’, अशी विचारणा चोक्कलिंगम् यांनी केली.
आयुक्तांसारख्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी तुमच्या कार्यालयात बोलावणे ही पद्धत चुकीची आहे. तुम्ही आधी ‘डेकोरम’ पाळायला शिका. जर काही काम असेल तर तुम्हीच आयुक्तांच्या कार्यालयात जावे, असा सल्लाही चोक्कलिंगम् यांनी शिवांगी यांना दिला. त्यावेळी काहीसे संतप्त झालेले शिवांगी यांनीही त्यांना तशाच शब्दांत उत्तर देताना ‘माझ्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार आपण त्यांना बोलाविले होते,’ असे सांगितले.
चोक्कलिंगम् हे शिवांगी यांना झोडपत असताना महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी त्यात तोंड घातले. जैव वैद्यकीय कचऱ्याबाबतीत महानगरपालिकेकडे नोंद नसलेल्या साडेतीनशे डॉक्टरांना नोटिसा काढणे हा ‘नॉनसेन्स’ असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. मी वैद्यकीय प्रॅक्टिस करीत नसतानाही मलाही नोटीस बजावल्याचे डॉ. पाटील यांनी दिली. त्यावेळी कारवाईच्या नोटिसा कोणत्या कायद्यानुसार तुम्ही काढता ते एकदा सांगा, असे सांगत चोक्कलिंगम् यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले.
बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, आयुक्त पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांच्यासह चाळीसहून अधिक अधिकारी उपस्थित होते. बैठकीत आपली नेमकी बाजू मांडण्यात सर्वच अधिकारी असमर्थ ठरले. (प्रतिनिधी)


पंचगंगा प्रदूषणासारख्या संवेदनशील प्रश्नावर बैठक असल्याने यास पत्रकारही उपस्थित होते. ही बाब चोक्कलिंगम् यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सर्व पत्रकार व छायाचित्रकारांना बाहेर काढले आणि मगच बैठक सुरू केली.


प्रदूषणाला महापालिका जबाबदार, तर ‘पंचतारांकित’ कारखान्यांच्या बाबतीत गप्प का?
अडीच तास बैठकीत अधिकारी झाले अवाक

Web Title: In-charge of the officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.