मोदामृत उपचारपद्धती एक लाख मुलांपर्यंत पोहोचवू : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 12:30 AM2019-02-07T00:30:22+5:302019-02-07T00:33:03+5:30

भारतीय आयुर्वेद ही उपचाराची सर्वोेत्तम पद्धती आहे. भावी पिढी सुदृढ असणे ही काळाची गरज आहे; त्यामुळे विश्ववती आयुर्वेद चिकित्सालयामध्ये तयार करण्यात आलेली ‘मोदामृत’ ही कुपोषणावरील उपचारपद्धती एक लाख मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू

Chandramukt Patil will deliver the modem treatment system to one lakh children | मोदामृत उपचारपद्धती एक लाख मुलांपर्यंत पोहोचवू : चंद्रकांत पाटील

मोदामृत उपचारपद्धती एक लाख मुलांपर्यंत पोहोचवू : चंद्रकांत पाटील

googlenewsNext
ठळक मुद्देविश्ववती आयुर्वेद चिकित्सालय, संशोधन केंद्राचे उद्घाटन

कोल्हापूर : भारतीय आयुर्वेद ही उपचाराची सर्वोेत्तम पद्धती आहे. भावी पिढी सुदृढ असणे ही काळाची गरज आहे; त्यामुळे विश्ववती आयुर्वेद चिकित्सालयामध्ये तयार करण्यात आलेली ‘मोदामृत’ ही कुपोषणावरील उपचारपद्धती एक लाख मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली.

विश्वपंढरी येथे विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय व संशोधन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते. यावेळी आमदार सतेज पाटील, सुजित मिणचेकर, आनंदनाथ महाराज, रामराया सांगवडेकर, वैद्य समीर जमदग्नी, कैलास काटकर उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, बालपणातच मुलांचे व्यवस्थित पोषण होणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्राने संशोधनातून तयार केलेल्या ‘मोदामृत’चा प्रयोग आपण शहरातील २५ झोपडपट्ट्यांमधील ५०० मुलांवर करू. त्याचा चांगला परिणाम दिसला तर जूननंतर १ लाख मुलांपर्यंत ते पोहोचवले जाईल.

आमदार सतेज पाटील म्हणाले, आजाराचे योग्य निदान आणि उपचार ही माणसाची गरज आहे. जिथे सगळे उपचार संपतात तिथे आयुर्वेदाचा दरवाजा उघडतो. आमदार सुजित मिणचेकर यांनीही आयुर्वेद चिकित्सापद्धतीचा शासनाने प्रचार व प्रसार करावा, असे आवाहन केले.
यावेळी आनंदनाथ महाराज, वैद्य समीर जमदग्नी, कैलास काटकर यांनी मनोगत व्यक्त केले. राहुल शेलार यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद पानकर यांनी केंद्रात होत असलेल्या संशोधनाची माहिती दिली. परेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

राजकारणात ठरवून अपघात
यावेळी आमदार सतेज पाटील यांनी आम्हा राजकारणी मंडळींना अनेक ताणतणाव आणि धकाधकीला सामोरे जावे लागते; त्यामुळे आमच्यासाठी काही उपचारपद्धती सांगा, असे सांगितले. हा धागा पकडत मंत्री पाटील म्हणाले, राजकारणात ठरवून अपघात केले जातात. राजकीय मंडळींना सकारात्मक विचारांचे इंजेक्शन द्या. आचारसंहितेच्या ४५ दिवसांत एकमेकांवर वाट्टेल ते आरोप करूया; पण निवडणूक संपली की सगळं विसरून एकमेकांना मदत केली पाहिजे असे इंजेक्शन आणि सॉफ्टवेअर तयार करा. त्यांच्या या वाक्यावर एकच हशा पिकला.

विश्वपंढरी येथे बुधवारी विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय व संशोधन केंद्राचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सतेज पाटील, समीर जमदग्नी, माणिक पाटील-चुयेकर, आनंदनाथ महाराज, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, सुजित मिणचेकर उपस्थित होते.

Web Title: Chandramukt Patil will deliver the modem treatment system to one lakh children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.