अपघात झाल्यास 'या' रक्तगटाच्या व्यक्तींना असतो मृत्यूचा जास्त धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2018 09:22 AM2018-05-04T09:22:55+5:302018-05-04T09:22:55+5:30

गंभीररित्या जखमी झालेल्या व्यक्तीसाठी ओ गटाचे रक्त धोकादायक ठरण्याचीही शक्यता असते.

Having Blood Type O Doubles Risk Of Dying From Serious Injury Research Finds | अपघात झाल्यास 'या' रक्तगटाच्या व्यक्तींना असतो मृत्यूचा जास्त धोका

अपघात झाल्यास 'या' रक्तगटाच्या व्यक्तींना असतो मृत्यूचा जास्त धोका

googlenewsNext

मुंबई: एखादी गंभीर इजा झाल्यास ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना इतरांच्या तुलनेत मृत्यूचा धोका जास्त असल्याची बाब एका संशोधनातून सिद्ध झाली आहे. या व्यक्तींच्या रक्तात गुठळ्या तयार करणारा घटक कमी प्रमाणात अस्तित्ताव असतो. परिणामी एखादी मोठी जखम झाल्यास त्यांच्या शरीरातून रक्त अधिक वेगाने वाहते, असे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या व्यक्तींना इतरांच्या तुलनेत मृत्यूचा जास्त धोका असतो.
यासाठी जपानच्या एका रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील 901 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी जखमींपैकी ओ रक्तगटाच्या 28 टक्के व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. इतर रक्तगटाच्या व्यक्तींमध्ये हेच प्रमाण 11 टक्के इतके होते. यावरूनच अतिरक्तस्त्रावाची समस्या ओ रक्तगटाच्या व्यक्तींसाठी धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

एखाद्या अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींचा मृत्यू  शक्यतो अतिरक्तस्त्रावामुळे होतो. त्यामुळे आम्ही विविध रक्तगटाच्या व्यक्तींनुसार याचा अभ्यास करायचा ठरवला. जेणेकरून गंभीर जखमी झालेल्या रुग्णांचा रक्तगट वेगवेगळा असल्यास होणाऱ्या परिणामांबाबत आम्हाला ठोस निष्कर्ष काढता येईल, असे डॉ. वाटुर ताकायामा यांनी सांगितले. 

ओ हा सर्वसाधारण रक्तगट मानला जातो. रक्तपेशींमध्ये असणाऱ्या प्रोटीन्सच्या प्रमाणावर व्यक्तीचा रक्तगट ठरतो. त्यानुसार ओ, ए, बी आणि एबी अशी रक्तगटांची विभागणी केली जाते. ओ रक्तगटाच्या व्यक्तींचे रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तींना चालते. मात्र, गंभीररित्या जखमी झालेल्या व्यक्तीसाठी ओ गटाचे रक्त धोकादायक ठरण्याचीही शक्यता असते. यामुळे संबंधित व्यक्तीला अपंगत्त्व किंवा त्याचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असल्याची बाब या अभ्यासातून समोर आली आहे.
 

Web Title: Having Blood Type O Doubles Risk Of Dying From Serious Injury Research Finds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.