बोदवड शहरासह ८० गावात पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 01:18 AM2018-11-21T01:18:35+5:302018-11-21T01:19:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बोदवड , जि.जळगाव : ऐन हिवाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बोदवड तालुक्यासह भुसावळ, मुक्ताईनगरच्या ओडीएच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या ...

Waterproofing in 80 villages, including Bodhwaad city | बोदवड शहरासह ८० गावात पाण्याचा ठणठणाट

बोदवड शहरासह ८० गावात पाण्याचा ठणठणाट

googlenewsNext
ठळक मुद्देअजून आठ दिवस पाणीपुरवठा होणे अशक्यपाण्यासाठी दुष्काळात वसुली सुरू, साडेसहा लाख गोळालोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप







लोकमत न्यूज नेटवर्क
बोदवड, जि.जळगाव : ऐन हिवाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बोदवड तालुक्यासह भुसावळ, मुक्ताईनगरच्या ओडीएच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांना बसत आहेत. अजून किमान आठ दिवस ओडीएचा पाणीपुरवठा सुरू होणे अशक्य आहे.
१२ रोजी बोदवड, मुक्ताईनगर व भुसावळ या तिन्ही तालुक्यातील ८० गावांना पाणीपुरवठा करणारी प्रादेशिक पाणीपुरवठा (ओडीए) योजनेचे वीज बिल थकल्याने कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित करण्यात आला, तर बिल भरण्यास जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे निधी नसल्याने या योजनेच्या संबंधित गावांना पाणीपट्टी वसुली करून निधी गोळा करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानुसार ते कामाला लागले आहेत.
आजपावेतो बोदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर.ओ.वाघ यांनी बोदवड तालुक्यातील राजूर, कोल्हाडी, निमखेड, जामठी, शेलवड, विचवा, येवती या गावातून एक लाख २५ हजार गोळा करून जिल्हा परिषदेच्या खात्यात जमा केले आहेत, तर बोदवड नगर पंचायतीने पाच लाखांचा धनादेश दिल्याचे कार्यालय अधीक्षक राजूसिंग चव्हाण यांनी सांगितले. असे एकूण सहा लाख २५ हजार अद्यापपावेतो जमा झाले आहेत. अजून पाणीपट्टी गोळा करणे सुरू असल्याचे गटविकास अधिकारी वाघ यांनी सांगितले.
१६ रोजी ओडीएच्या जलशुद्धीकरणच्या सारोळा केंद्रावरून वीजपुरवठा खंडित असल्याचा फायदा उचलत चोरट्यांनी सुमारे साडेआठ लाख रुपये किमतीचे रोहित्र चोरून नेल्याने अडचणीत आणखी भर पडली आहे. आजघडीला बोदवड शहरात १७ दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. ९० टक्के ओडीएच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या बोदवड शहरात काही प्रभागात १७ ते १८ दिवस उलटत आले आहेत. नळाला पाणी आले नाही तर नगरपंचायत शहरातील विहिरीचे पाणी गोळा करून पुरवत आहे. पण या विहिरीच्या पाण्यावर शहराची तहान दोन महिनेही सलग भागणे अवघड आहे.
सोशल मीडियावर मात्र राजकारण सुरू झाले, पण पाण्यासाठी कोणीच पुढे येण्यास तयार नाही. लोक प्रतिनधींनाही पाणी टंचाईबाबत काहीच घेणे-देणे नसल्याचे चित्र दिसत आहे.
१० दिवस उलटूनही जलसंपदा मंत्र्यांच्या जिल्ह्यातील ८० गावे पाण्यासाठी वणवण करीत आहे, तर लोकप्रतिनिधीही गप्प का, हे समजेनासे झाले आहे, तर खासदारही पाहण्यास तयार नाही व नागरिक घटकाभर पाण्यासाठी कासावीस होत आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला जिल्हा परिषदेचे साकडे, बैठक निष्फळ
ओडीएचे चोरीस गेलेले रोहित्र घेण्यासाठी व या योजनेचे थकीत बिल भरण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अधिकारी (अभियंता) साधना नरवाडे यांनी १९ रोजी नाशिक येथील जीवन प्राधिकरण कार्यालय गाठले. वरिष्ठांना या योजनेचे रोहित्र चोरीस गेले असून, नवीन रोहित्र अथवा दुरुस्तीसाठी व वीज बिलसाठी साकडे घातले. परंतु त्यांनीही सदर नवीन रोहित्रासाठी टंचाईच्या निधीत मागणी करावी, असे सांगून जीवन प्राधिकरणकडे तजवीजसाठी नकार दिला आहे. आता टंचाईग्रस्त निधीत जिल्हा परिषद रोहित्रसाठी निधी मागणार असल्याचे या योजनेच्या कार्यकारी अधिकारी साधना नरवाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
अडीअडचणी
टंचाईग्रस्तमधून निधी मिळाला तरी या योजनेसाठी लागणारे ३१५ अश्वशक्तीचे रोहित्र वीज वितरण कंपनीकडे नाही. यासाठी टेंडर करावे लागेल तोपर्यंत वीज बिल भरूनही फायदा नाही, तर नवीन रोहित्र किती दिवसात मिळते यावर सर्व अवलंबून आहे. तोपर्यंत पाणी मिळणे अशक्य आहे तर पाण्यासाठी नागरिक पायपिट करीत आहे.

Web Title: Waterproofing in 80 villages, including Bodhwaad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.