केळी प्रक्रिया उद्योग सुरू करायचाय, ‘पीएमएफएमई’साठी अर्ज केला का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2022 12:50 PM2022-10-14T12:50:41+5:302022-10-14T12:51:07+5:30

जिल्ह्यात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगातून आतापर्यंत ६४ नवे उद्योग उभे राहिले आहेत. त्यात केळीवर आधारित प्रक्रिया उद्योग आणि इतर पिकांवर आधारित प्रक्रिया उद्योगांचा समावेश आहे.

Want to start a banana processing industry, have you applied for 'PMFME'? | केळी प्रक्रिया उद्योग सुरू करायचाय, ‘पीएमएफएमई’साठी अर्ज केला का ?

केळी प्रक्रिया उद्योग सुरू करायचाय, ‘पीएमएफएमई’साठी अर्ज केला का ?

Next

जळगाव : केळी प्रक्रिया उद्योग सुरू करायचा असेल तर त्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातून कर्ज आणि अनुदान मिळवता येते. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत पीएमएफएमई या योजनेतून ६४ आणि फक्त केळीवर प्रक्रियेसाठी २३ उद्योग सुरू करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगातून आतापर्यंत ६४ नवे उद्योग उभे राहिले आहेत. त्यात केळीवर आधारित प्रक्रिया उद्योग आणि इतर पिकांवर आधारित प्रक्रिया उद्योगांचा समावेश आहे. या योजनेत सरकारकडून उद्योगांना ३५ टक्के अनुदान दिले जाते. केंद्र सरकारनेच यात एक जिल्हा एक उत्पादन ही अट काढून टाकली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यासाठी केळीचा समावेश करण्यात आला होता. मात्र, आता ही अट निघाल्याने इतर उद्योगांनाही फायदा झाला आहे.

योजनेसाठी कोणाला अर्ज करता येईल ?

यात लाभार्थी हा वैयक्तिक किंवा बचत गटदेखील असू शकतो. त्यासोबतच त्याने वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असावी. यात महिला बचत गटांवर विशेष लक्ष दिले जाते. तसेच आधी फक्त एक जिल्हा एक उत्पादन योजनेत केळी प्रक्रिया उद्योगावरच लक्ष दिले जात होते. मात्र, आता सर्वच पिकांना त्यात स्थान मिळाले आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्जदेखील करता येतो.

जिल्ह्यात या योजनेंतर्गत ६४ उद्योग सुरू

जळगाव जिल्ह्यात या योजनेतून आतापर्यंत ६४ नवे उद्योग सुरू करण्यात आले आहेत. त्यात पापड उद्योग, केळी, लिंबू, दाळ उद्योगासाठी अर्ज केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात फक्त केळीवरच लक्ष दिले जात होते. मात्र, केंद्र शासनाने अट काढून टाकल्यानंतर इतर उद्योगांनाही फायदा होत आहे.

केळी उद्योगासाठी करा अर्ज

जळगाव जिल्ह्यात या योजनेतून केळीवर प्रक्रिया करणारे २३ उद्योग सुरू झाले आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनानेच केळी वेफर्स करणाऱ्या उद्योगांकडे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला होता. यात अनेक प्रस्ताव दाखल झाल्यावर बँका त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे.

बँकांनी नाकारले १८९ प्रस्ताव

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४६५ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. त्यातील फक्त ६४ प्रस्तावच मंजूर झाले आहेत, तर ११९ प्रस्ताव बँकांकडे प्रलंबित आहेत आणि १८९ प्रस्ताव बँकांनी नाकारले आहेत. त्यातही काही ठरावीक बँका हे प्रस्ताव नाकारत असल्याचे समोर येत आहे, तर एका बँकेने जिल्ह्यातील सर्व अर्जदारांना भुसावळला येण्याची अट घातली आहे.

अधिकारी काय म्हणतात....

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ४६५ प्रस्ताव बँकांकडे पाठवण्यात आले आहेत. त्यातील ६४ उद्योगांना कर्ज मंजूर झाले आहेत. त्यातील २३ उद्योग हे केळीशी संबधित आहेत. तसेच या योजनेत ज्यांना सहभागी व्हायचे असेल, त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा. - अनिल भोकरे, कृषी उपसंचालक.

Web Title: Want to start a banana processing industry, have you applied for 'PMFME'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.