रेशीमगाठीने सुखकर झाली अपंगत्वाची खडतर वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:22 PM2018-05-24T12:22:22+5:302018-05-24T12:22:22+5:30

वॉकरवरून घेतले सात फेरे

Happiness and there was a difficult way of disability | रेशीमगाठीने सुखकर झाली अपंगत्वाची खडतर वाट

रेशीमगाठीने सुखकर झाली अपंगत्वाची खडतर वाट

ठळक मुद्देनिकुंजची कौटुंबिक ‘आस्था’व्हील चेअरवरुन नृत्य करून जोपासली नृत्याची आवड

विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २४ - एकीकडे अपघातात दोन्ही पाय निकामी झालेला तरुण व्हील चेअरवरून तर दुसरीकडे एक तरुणी कृत्रिम पायाचा आधार घेत आपापल्या जिद्दीने अडचणींवर मात करीत खडतर वाट पार करीत असताना दोघांनाही एकमेकांची साथ मिळाली. या एकमेकांच्या साथीने ही खडतर वाट आता सुखकर झाल्याचा सुखद अनुभव जळगावातील अग्रवाल तर अमरावती येथील गणेरीवाल कुटुंब घेत आहे.
चित्रपटाला साजेशी वाटणारी ही कथा आहे जळगावातील प्रसिद्ध उद्योजक अनिल अग्रवाल यांचा मुलगा निकुंज अग्रवाल व अमरावती येथील वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. राजेंद्र गणेरीवाल यांची कन्या डॉ. आस्था गणेरीवाल यांच्या अनोख्या विवाह सोहळ््याची. या विवाह सोहळ््याचे वैशिष्ट्य म्हणजे जोडीदारासोबत घेतले जाणारे सात फेरे निकुंजने वॉकरवर बसून घेतले तर आपल्या नृत्याच्या आवडीला दाबून न ठेवता व्हीलचेअरवरून आपली ‘जीवनसंगीनी’ आस्थासोबत बहारदार नृत्य करीत सर्वांना अवाक् केले. या उत्साही व उच्च शिक्षित जोडप्यातील निकुंजला अपघातात पाय गमवावे लागल्याचा कटू अनुभव आहे आणि एका कृत्रिम पायाचा आधार डॉ. आस्था यांना घ्यावा लागत आहे. असे असले तरी जिद्द व चिकाटीने या दोघांनी सर्व अडचणींवर मात करीत इतरांसमोरही आदर्श उभा केला आहे.
न विसरू शकणारा तो क्षण
जळगावात प्राथमिक शिक्षण घेतलेल्या निकुंजने पुणे व मुंबई येथे महाविद्यालयीन शिक्षण घेऊन इंग्लड येथे उच्च शिक्षण (एमएस) घेतले. त्यानंतर जळगावातील आॅईल मिल या आपल्या कौटुंबिक व्यवसायाची जबाबदारी संभाळली. मात्र नोव्हेंबर २०११मध्ये अचानक अपघात होऊन निकुंजला दोन्ही पाय गमावावे लागले. या कधी विसरू न शकणाऱ्या कटू प्रसंगाने निकुंजच्या आयुष्यातील सहा महिने रुग्णालयात गेले. मात्र तरीही जिद्द न सोडता या सर्वांमधून सावरत निकुंजने पुन्हा आपला व्यवसाय संभाळला. आज दोन्ही पायांनी चालता येत नसले तरी व्यवसायातील यश निकुंज अगदी लिलया मिळवित असल्याचे त्याचे वडील अनिल अग्रवाल हे मोठ्या अभिमानाने सांगतात.
....अन् जोडीदाराची साथ मिळाली
निकुंज व्यवसायाची जबाबदारी यशस्वीरीत्या संभाळत असताना त्याच्या लग्नाचा विषय पुढे आला व काही नातलगांनी अमरावती येथील डॉ. राजेंद्र गणेरीवाल यांच्या मुलीचे स्थळ सूचविले. दोन्ही बाजूने चर्चा झाली व मुला-मुलींसह दोन्ही कुटुंबाचा होकार मिळाला आणि २९ एप्रिल रोजी निकुंज व आस्था यांचा विवाह इंदूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
‘तुमच्यापेक्षा मला अधिक माहिती....’
निकुंजने विवाहपूर्वीच डॉ. आस्थाला आपल्या दोन्ही पायांबद्दल माहिती दिली. त्यावेळी एमडी असलेल्या डॉ. आस्थाने क्षणाचाही विलंब न करता तुमच्या पायांबद्दल तुमच्यापेक्षा मला अधिक माहिती आहे, असे उत्तर देत या लग्नास तयार असल्याचे सांगून टाकले.
दुसरीकडे डॉ. आस्थाचा एक पाय कृत्रिम असला तरी त्यावर तिने मात करीत उच्च शिक्षित होत एक यशस्वी डॉक्टर होण्यासह मुंबईत प्रसिद्ध रुग्णालयात ज्ञानदानाचे कामही केल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे डॉ. आस्था यांचे सासरे अनिल अग्रवाल यांचे म्हणणे आहे.
व्हीलचेअरवरून नृत्य
निकुंजला सुरुवातीपासूनच नृत्याची प्रचंड आवड. मात्र अपघातात पायच निकामी झाल्याने ही आवड कशी जपावी या विचारात न पडता निकुंजने आपल्या विवाह सोहळ््यादरम्यान असलेल्या संगीत रजनी कार्यक्रमात व्हीलचेअरवरून नृत्य केले. या वेळी नववधू डॉ. आस्थानेदेखील निकुंजला अप्रतिम साथ देत उपस्थितांची मने जिंकली. तत्पूर्वी विविध विधी पार पाडताना वॉकरच्या साहाय्याने निकुंजने सातफेरे घेतले. या भावनिक क्षणाचे साक्षीदार होत निकुंजच्या मित्रपरिवाराने त्याचे मोठे कौतुक केले.
विदेश दौ-यात एकमेकांची साथ
लग्न झाल्यानंतर नवदाम्पत्य सिंगापूर येथे फिरायला गेले होते. या प्रवासादरम्यानही दोघांनी एकमेकांना साथ देत विदेशातही कोणाचा आधार घेतला नाही, हे विशेष.
कुटुंबाचे पाठबळ
दोन्ही पाय निकामी झाले तरी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मला कुटुंबातील सर्वांचेच पाठबळ मिळाले व मी पुन्हा उभा राहू शकलो, असे निकुंज यांचे म्हणणे आहे.
दोघांची यशाला गवसणी
डॉ. आस्था यांनी एका पायाची चिंता न करता वैद्यकीय शिक्षण घेऊन एक यशस्वी डॉक्टर झाल्याबद्दल डॉ. आस्थाचा एका दूरचित्रवाणी कार्यक्रमात अभिनेता आमिर खान व नीता अंबानी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला आहे. तर दुसरीकडे निकुंज दररोज कार्यालयात सलग १० ते १२ तास बसून व्यवसायाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडत असल्याने अनेक दिग्गजांनी दोघांच्याही या जिद्द व चिकाटीचे आणि आता एकमेकांसोबत रेशीमगाठ बांधण्याच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.

Web Title: Happiness and there was a difficult way of disability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.