टायर फुटून ब्रेक निकामी झालेल्या चारचाकीने उडविले आठ जणांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:40 PM2019-01-21T12:40:33+5:302019-01-21T12:41:38+5:30

 दुचाकी, पादचारीसह दिव्यांगाचाही समावेश

Eight people blew up the tire break break | टायर फुटून ब्रेक निकामी झालेल्या चारचाकीने उडविले आठ जणांना

टायर फुटून ब्रेक निकामी झालेल्या चारचाकीने उडविले आठ जणांना

Next
ठळक मुद्देकार, दुचाकी पोलीस ठाण्यात


जळगाव : अचानक टायर फुटल्याने त्यात ब्रेक निकामी होऊन भरधाव चारचाकीने एकामागून एक दुचाकी, पादचारी, रिक्षा व सायकलस्वाराला उडविल्याची थरारक घटना रविवारी सकाळी साडे अकरा वाजता डी मार्ट चौक ते तांबापुरातील शामा फायर व्यापारी संकुलादरम्यान घडली. या घटनेत दिव्यांग सायकलस्वारासह आठ जण जखमी झाले आहेत. चार जणांना जिल्हा रुग्णालयात तर चार जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती अशी की, जलसंपदा विभागात (वाघुर धरण) विभागीय लेखाधिकारी असलेले संतोषकुमार सुमन (वय ३९, रा. मायादेवी नगर, जळगाव) हे त्यांच्याच विभागातील लिपीक प्रकाश अंबर पाटील (रा.संभाजी नगर, जळगाव) यांना सोबत घेऊन पाटील यांच्या कारने (क्र.एम.एच.१९ बी.जे. ८२५७) रविवारी सकाळी ११ वाजता घरुन वाघूर धरणाकडे जात असताना डी मार्ट चौकात अचानक चारचाकीचे डाव्या बाजुचे टायर फुटले, त्यामुळे कार चालवत असलेले संतोषकुमार यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यात भर पडली ती ब्रेक निकामी होण्याची. बे्रक लागत नसल्याने या कारने एकामागून एक दुचाकी, पादचाऱ्यांना धडक द्यायला सुरुवात केली. याप्रकारामुळे रस्त्यावरील लोकांची पळापळ झाली. शामा फायर व्यापारी संकुलाजवळ आल्यावर एका रिक्षावर (क्र.एम.एच.१९ व्ही.६३२) कार आदळल्याने तेथे जागेवर थांबली.
मुलगी बचावली, वडील जखमी
टी.व्ही.दुरुस्ती करण्यासाठी जात असलेल्या निशिकांत रामचंद्र कुळकर्णी ( ५४, रा.मोहननगर) यांच्या दुचाकीलाही कारने मागूनच धडक दिली. त्यांच्या डोक्याला व छातीला मार लागला आहे.कुळकर्णी यांच्या दुचाकीच्या मागे रिक्षात मुलगी पूर्वा ही टी.व्ही घेऊन जात होती. ती रिक्षात असल्याने बचावली. त्यानंतर फिरोज शेख अब्बास यांच्या रिक्षावर ही कार आदळली व तेथेच थांबली.
कार, दुचाकी पोलीस ठाण्यात
या घटनेत बबनराव ढेकणे, सुदाम एकनाथ पाटील हे देखील जखमी झाले आहेत. पाटील यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. अन्य तीन जण खासगी रुग्णालयात उपचार करुन घरी गेले. कारमधील लेखाधिकारी व लिपिकाने पोलिसांकडे धाव घेतली म्हणून ते जमावाच्या तावडीतून बचावले. दरम्यान, क्रेनच्या सहाय्याने ही अपघातग्रस्त कार पोलीस स्टेशनला आणण्यात आली.
चारचाकीत जलसंपदाचे लेखाधिकारी व लिपीक
या घटनेनंतर संतप्त नागरिक धावून आल्याने लेखाधिकारी संतोषकुमार व लिपीक प्रकाश पाटील यांनी तत्काळ इच्छादेवी पोलीस चौकी गाठली. तेथे पोलिसांना झाल्याप्रकाराची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर रस्त्यावर जखमी झालेल्या लोकांना तांबापुरातील लोकांनी खासगी व जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यात एका वृध्दाची प्रकृती चिंताजनक आहे.
मुलाला पर्स देताना दुचाकीवरुन पडल्याने महिला गंभीर
चालत्या दुचाकीवर मुलाला पर्स देताना तोल जावून पडल्याने शोभा राजेंद्र भालेराव (४५, रा.पाळधी, ता.धरणगाव) या डोक्याला गंभीर मार लागून जखमी झाल्या आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजेंद्र भालेराव हे पत्नी व मुलगा रिंकू असे तिन्ही जण पाळधी येथून शहरात बारशाचा कार्यक्रम तसेच मेळाव्यासाठी शहरात येत होते. पाळधी गाव सोडताच शोभा या दुचाकीवरुन पडल्या. डोक्याला मार लागून प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागला. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दुचाकीस्वार दाम्पत्याला गंभीर दुखापत
मोहाडी रोड येथून शहरात येत असलेले अनिल मनोहर वाणी (३१) व पत्नी रेखा ( २५) यांच्या दुचाकीला (क्र.एम.एच.१९ बी.एच.४८११) कारने मागून जोरदार धडक दिली. त्यात मागे बसलेल्या रेखा यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली तर अनिल यांच्या खांद्याला खरचटले आहे. रेखा या दवाखान्यात येईपर्यंत बेशुध्द होत्या. तसेच तीन चाकी रिक्षाने इच्छादेवी चौकाकडे जात असलेले सैय्यद रफिक सैय्यद रसुल (वय ५५, रा.समता नगर) यांनाही जबर दुखापत झालेली आहे.

Web Title: Eight people blew up the tire break break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.