आजार मुळासकट नष्ट करण्याची क्षमता ‘होमिओपॅथी’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 01:29 PM2018-04-10T13:29:47+5:302018-04-10T13:29:47+5:30

होमिओपॅथी दिन विशेष

The ability to destroy the disease in homeopathy | आजार मुळासकट नष्ट करण्याची क्षमता ‘होमिओपॅथी’मध्ये

आजार मुळासकट नष्ट करण्याची क्षमता ‘होमिओपॅथी’मध्ये

Next
ठळक मुद्देरुग्णांना नवसंजीवनी देणारी उपचार पध्दतीकमी खर्चात उपचार होत असल्याने रुग्णांचा कल वाढला; साडेचार हजार औषधी

सागर दुबे / आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १० - थेट आजाराच्या मुळाशी जाऊन तो मुळासकट नष्ट करण्याची क्षमता होमिओपॅथी उपचार पद्धतीत आहे. त्याचा लाभ जवळजवळ ६० टक्के नागरिक घेतात. कमी खर्चात योग्य उपचार होत असल्याने रुग्णासाठी होमिओपॅथी ही नवसंजीवनी देणारी उपचार पद्धती ठरली आहे.
१८ व्या शतकाच्या पूर्वार्धापासून ते आजतागायत ही पद्धती प्रचलित आहे. जगाच्या विविध भागात होमिओपॅथीचा उपचार केला जातो. याच होमिओपॅथीला केंद्रस्थानी ठेवून जनजागृतीसाठी १० एप्रिल हा दिवस जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून साजरा केला जातो.
डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांची
चिकित्सा पद्धती
डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांनी समानाला समान या तत्त्वावर आधारित होमिओपॅथी म्हणजे समचिकित्सा पद्धती नावारूपास आणली. आधुनिक विज्ञानाच्या कुठल्याही कसोटीवर उतरू न शकलेली ही चिकित्सा पद्धती मात्र आज संपूर्ण जगात मान्यताप्राप्त झाली आहे. एखाद्याला कुठला आजार झाल्यास तो बरा करण्यासाठी प्रतिरसायन देणारी अ‍ॅलोपॅथी ही उपचार पद्धती संपूर्ण जगात मान्यताप्राप्त आहे; पण या उपचार पद्धतीला होमिओपॅथीने आव्हान दिले. विशेष म्हणजे या चिकित्सा पद्धतीचा अवलंब करीत असलेल्यांची संख्या हळूहळू वाढत आहे.
होमिओपॅथी सुरक्षित उपचार पद्धती
ज्याप्रमाणे सापाच्या विषापासून सर्पदंशावरील औषध बनते तशाच प्रकारचे तत्त्व डॉ. सॅम्युअल यांनी या उपचार पद्धतीत वापरले. त्यांच्या म्हणण्यानुसार रोगाचा सामना करण्यासाठी आवश्यक प्रतिकारशक्ती ही मानवाच्या शरीरातच असते. त्यामुळे एखाद्या आजारावर औषध म्हणून होमिओपॅथीमध्ये प्रतिजैविके न देता आजाराच्या लक्षणाशी साधर्म्य असणारी जैविकेच अत्यल्प प्रमाणात रुग्णांना दिली जातात.
देशात ७ हजार ५०० होमिओपॅथीची शासकीय रुग्णालये असून या रुग्णालयात होमिओपॅथीद्वारेच उपचार केले जातात. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या १८० शैक्षणिक संस्थेकडून होमिओपॅथीचे शिक्षण दिले जाते. होमिओपॅथीची औषधे ही अत्यंत सुरक्षित असून त्यामुळे कुठलेही साईड इफेक्टस होत नाहीत, असा दावा होमिओपॅथी डॉक्टरांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
शरीर, मन आणि आत्मा या तिघांचा समन्वय राखून होमिओपॅथी शास्त्रात उपचार केला जातो. यात आजाराचे समूळ उच्चाटन केले जाते. इतर शास्त्रात मनाचा विचार केला जात नाही. मात्र, यात केला जातो हे महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे होमिओपॅथी औषधीमुळे रुग्णाला कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. मधुमेह व हृदयविकार मानसिक तणावाशी संबंधित असल्याने होमिओपॅथी अशा रुग्णांसाठी लाभदायक आहे. गरिबांसोबत उच्चभ्रू समाजही या उपचाराकडे वळला आहे.
-अविनाश महाजन, होमिओपॅथी तज्ज्ञ
वैद्यकीय क्षेत्रात गेल्या ३० ते ३२ वर्षांपासून कार्यरत असताना होमिओपॅथी उपचार पद्धतीचा वापर करून रुग्णांना सेवा देत आहे. उपचार पद्धतीचे कोणतेही दुष्परिणाम नाही. अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णांनी नियमित पथ्य पाळावे, गोळ्यांमध्ये नियमितता ठेवावी तसेच निसर्गाविरुद्ध जाऊ नये. -डॉ. विलास महाजन, होमिओपॅथी तज्ज्ञ
हॉमिओपॅथीमुळे प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. चिकुनगुनिया, स्वाईन फ्लू या रोगावर हॉमिओपॅथी सर्वाधिक उपयुक्त आहे. जुन्या आजारांवर उपचार करत असताना रुग्णांच्या आवडी-निवडीसह त्याच्या नियमित गोष्टींचा विचार केला जात असतो. त्यानुसार उपचार केले जातात. हॉमिओपॅथीमध्ये एका दिवसाच्या मुलापासून तर वृद्धांपर्यत उपचार करता येतात. याचे कोणतेही दुष्परिणाम नसल्यामुळे आता ज्या व्यक्तींना हॉमिओपॅथीवर विश्वास नव्हता ते देखील मोठ्या संख्येने उपचार घेत आहेत.
-डॉ.कमलेश मराठे, होमिओपॅथी तज्ज्ञ
ही पद्धती अतिशय संथपणे रुग्णांवर उपचार करते. अनेक वर्षांच्या संशोधनाअंती यात बरेच बदल झाले आहेत. जवळपास ४ हजार ५०० औषधी या उपचारपद्धतीत आज वापरली जात आहेत. आजारानुसार सूक्ष्म अध्ययनाद्वारे अचूक निदान केले जाते. विशेष म्हणजे यात कुठलाही दुष्परिणाम नाही. त्यामुळे या पद्धतीचा अवलंब करीत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. -तुषार कोठावदे, होमिओपॅथी तज्ज्ञ

Web Title: The ability to destroy the disease in homeopathy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.