हिंगोलीत रस्ते, नाल्यांवरील अतिक्रमणांवर नगर पालिकेचे बुलडोझर

By रमेश वाबळे | Published: May 2, 2024 01:57 PM2024-05-02T13:57:07+5:302024-05-02T13:57:30+5:30

हिंगोली शहरातील हरणचौक, बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम

Municipal bulldozers on encroachments on roads, drains in Hingoli | हिंगोलीत रस्ते, नाल्यांवरील अतिक्रमणांवर नगर पालिकेचे बुलडोझर

हिंगोलीत रस्ते, नाल्यांवरील अतिक्रमणांवर नगर पालिकेचे बुलडोझर

हिंगोली : शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध रस्ते, चौकांतील अतिक्रमणांवर २ मे रोजी नगर पालिका प्रशासनाने बुलडोझर चालविला. यात रस्ते, नाल्यांवर अतिक्रमणे करून केलेली बांधकामे हटविण्यात आली.

हिंगोली शहरातील बाजारपेठ, चौकांसह विविध रस्त्यांवर अनेकांनी अतिक्रमणे केली आहेत. काहींनी तर नाल्यांवर ढापा टाकून त्यावर बांधकाम केले असून, अनेकांनी दुकान, घरांसमोर टिनशेड ठोकले. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून, शहरवासीयांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. तसेच रस्ता कामातही अतिक्रमणे अडथळा ठरत असल्याने नगर पालिका प्रशासनाने २ मे रोजी सकाळी १० वाजेपासून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरूवात केली. त्यानंतर महेश चौक, जुनी अनाज मंडई भागातील अतिक्रमणे हटविण्यात आली.

यादरम्यान काही नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतली. तर ज्यांनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतली नाहीत. त्यांचे अतिक्रमण हटवून साहित्य जप्त करण्यात आले. ही मोहीम मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, अभियंता रत्नाकर अडसिरे, किशोर काकडे, बाळू बांगर, पंडीत मस्के, भागवत धायतडक यांच्यासह न.प.च्या पथकाने केली. मोहिमेदरम्यान शहर ठाण्याच्या पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Municipal bulldozers on encroachments on roads, drains in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.