आदिवासींचा तहसीलवर धडक मोर्चा

By admin | Published: August 24, 2014 11:36 PM2014-08-24T23:36:22+5:302014-08-24T23:36:22+5:30

महाराष्ट्रात धनगर व तत्सम समाजाने आदिवासींच्या आरक्षणावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. याचा विरोध म्हणून शनिवारी (दि.२३) आदिवासी समाजाच्या विविध संघटनांनी

Dhadi front of tribal tehsil | आदिवासींचा तहसीलवर धडक मोर्चा

आदिवासींचा तहसीलवर धडक मोर्चा

Next

अर्जुनी मोरगाव : महाराष्ट्रात धनगर व तत्सम समाजाने आदिवासींच्या आरक्षणावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. याचा विरोध म्हणून शनिवारी (दि.२३) आदिवासी समाजाच्या विविध संघटनांनी तहसील कार्यालयावर मोर्चा नेला. या मोर्चात तालुक्याच्या खेडेपाड्यातील आदिवासी समाजबांधव सहभागी झाले होते.
दुर्गा चौक येथून निघालेला मोर्चा गावातील मुख्य मार्गाने होत तहसील कार्यालयावर नेण्यात आला. पंचायत समितीचे सभापती तानेश ताराम, दुर्गाप्रसाद कोकोडे, डी.एल. तुमडाम, गोवर्धन ताराम, बी.एस. सोयाम, शीला उईके यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजाला अनुसूचित जातीमध्ये सामावून घेण्यात यावे अशा माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या वक्तव्याच्या निषेध म्हणून मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोर्चा पोहोचताच सभेत रुपांतर झाले. मोर्चा आयोजनाचे महत्त्व प्रास्ताविकेतून गोवर्धन ताराम यांनी विषद केले. बोगस आदिवासींच्या विरोधात लढा देण्याचे आवाहन कोकोडे यांनी केले. खऱ्या आदिवासींच्या हक्कांवर धनगर समाजाचे नेते डल्ला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. तो हाणून पाडा असे आवाहन सुनीता उईके यांनी केले. सर्व आदिवासींनी संघटित होऊन अन्यायाविरोधात लढा द्यावा, असे प्रतिपादन सोयाम यांनी केले. राज्यात २४ मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव असून ८५ मतदारसंघात आदिवासींची मते निर्णायक आहेत. सरकार स्थापन करण्यात आदिवासींचा सिंहाचा वाटा आहे. आदिवासी संघटना एकत्र आल्याअसून कोणताही अन्याय सहन करणार नाही. शासनाने आदिवासींचे हक्क व सवलती हिरावू नये अन्यथा आदिवासी समाज शासनाला धडा शिकवेल असे मत अध्यक्षीय भाषणातून तानेश ताराम यांनी व्यक्त केले. दरम्यान, तहसीलदार संतोष महाले यांनी सभास्थळी येऊन निवेदन स्वीकारले.
धनगर जातीला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यात येऊ नये, राज्यातील सर्व अनुसूचित जमातीचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींची जातवैधता पडताळणी करावी, राज्यातील सर्व विभागानिहाय अनु. जमातीचा अनुशेष तात्काळ भरावा, आदिवासींना वनहक्काचे पट्टे त्वरीत देण्यात यावे या मागण्यांचे राज्यपाल यांचे नावे असलेले निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
मोर्चाच्या यशस्वीतेसाठी परमेश्वर उईके, पंचम भलावी, मधुकर कुंभरे, लीलाधर ताराम, गजानन कोवे, बाबुराव काटंगे, रत्नमाला राऊत, लक्ष्मीकांत मडावी, जागेश्वर भोगारे, अशोक कन्हाके, पतिराम पंधरे, सोमा पंधरे, शंकर उईके, दशरथ अवरासे, तुकडोजी फरदे, तुलाराम मारगाये, हरीशचंद्र उईके, रमेश पेंदाम, ललीता अवरासे, वर्षा कुंभरे, कुसुम पंधरे, धीरजकुमार जुगनाके व बहुसंख्य आदिवासी बांधवांनी सहकार्य केले. सभेचे संचालन लक्ष्मीकांत मडावी यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
आमगाव
आदिवासी समाजाला घटनेने मिळालेल्या आरक्षणावर डोळा ठेवणाऱ्या धनगर व इतर जातींच्या विरोधात आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्यावतीने काली मंदिरातून शुक्रवारी (दि.२२) तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, जाहीर सभा घेऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन, एम्प्लॉईज फेडरेशन, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, आदिवासी विद्यार्थी संघ, नॅशनल आदिवासी महिला फेडरेशन, गोंडवाना गणतंत्र पार्टी, हलबा/हलबी संघटन, गोंडवाना मित्रमंडळ कल्याण समिती, अखिल भारतीय धृत गोंड समाज संघटन इत्यादी संघटनांच्या आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या पुढाकाराने दुर्गाप्रसाद कोकोडे, केंद्रीय सचिव जियालाल पंधरे, बाळा उईके, गुलाब धुर्वे, संतोष पेंदोर, मनोज पंधरे, राकेश परतेती, चुन्नीलाल भलावी यांच्या नेतृत्वात आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला होता.
सभेत विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करताना खऱ्या आदिवासींची अस्मिता, अस्तित्व व हक्कावर येऊ पाहत असलेली गदा पिटाळून लावण्याचा निर्धार व्यक्त केला. मूळ निवासी असलेल्या आदिवासी समाजाला संविधानाने अधिकार आणि हक्क सांगत असतील ते कदापि खपवून घेणार नाही. या आदिवासी लढ्यात कोणत्याही पक्षाचा विचार न करता आदिवासी समाजाच्या हक्कासाठी सदैव लढण्यास तत्पर राहणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितले.
पश्चात, तहसीलदार राजीव शक्करवार यांना आरक्षण बचाव कृती सतिमीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात महाराष्ट्र राज्यातील आदिवासींच्या अनु. जमात प्रवर्गात धनगर व इतर जातींचा समावेश करुन आदिवासींचे आरक्षण बळकावण्याची कूटनीती काही स्वार्थी नेत्यांनी त्यांच्या क्षेत्रातील स्वत:चे मतदान वाढविण्यासाठी धनगर व इतर जातींना आदिवासींच्या आरक्षणात सहभागी होण्याचा इशारा दिलेला आहे. राज्यातील धनगर व इतर जातींचा आदिवासींच्या प्रथा, परंपरा, रीतिरिवाज व संस्कृतीशी कोणताच संबंध जुळत नसून त्या व्यावसायिक जाती आहेत. अनु. जमाती प्रवर्गात सहभागी होण्याचे षड्यंत्र करीत आहेत. त्या विरोधात महाराष्ट्रातील संपूर्ण आदिवासींमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. त्यामुळे धनगर व इतर जातींना अनु. जमाती या प्रवर्गात आरक्षण न देता, खऱ्या आदिवासींच्या अस्मितेचे व आरक्षणाचे संरक्षण करावे असे निवेदनात नमूद आहे.
मोर्चाच्या यशस्वीतेसाठी संतोष पेंदोर, चुन्नीलाल भलावी, माणिक धुर्वे, रमेश भलावी, यु.जी. फरदे, संतोष कुसराम, प्रशांत उइके, भाऊ टेकाम, सुरेश मडावी, प्रल्हाद गाते, जवाहर घासले, लीना उईके, जे.डी. हरदुले, शिवचरण मरस्कोल्हे, विलास कळपाते, गोपाल परतेती, डॉ. भोयर, धनराज भलावी, मिलिंद धुर्वे व पी.ए. मडावी या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Dhadi front of tribal tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.