आसोलीत जि.प. क्षेत्रासाठी ७३.४० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 10:29 PM2019-06-23T22:29:17+5:302019-06-23T22:30:43+5:30

तालुक्यातील आसोली जिल्हा परिषद क्षेत्राच्या रिक्त जागेसाठी रविवारी (दि.२३) घेण्यात आलेल्या मतदानात ७३.४० टक्के मतदान झाले. निवडणुकीत क्षेत्रातील १२ हजार ७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Asolii zip 73.40 percent polling for the area | आसोलीत जि.प. क्षेत्रासाठी ७३.४० टक्के मतदान

आसोलीत जि.प. क्षेत्रासाठी ७३.४० टक्के मतदान

Next
ठळक मुद्दे१२ हजार मतदारांनी बजावला हक्क : ग्राम मोरवाहीत तणावाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्यातील आसोली जिल्हा परिषद क्षेत्राच्या रिक्त जागेसाठी रविवारी (दि.२३) घेण्यात आलेल्या मतदानात ७३.४० टक्के मतदान झाले. निवडणुकीत क्षेत्रातील १२ हजार ७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
आसोली जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य शेखर पटले यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त होती. या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली.यात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार परसराम हुमे तर कॉँग्रेसचे उमेदवार सुरजलाल महारवाडे यांच्यात थेट लढत आहे. क्षेत्रातील १९ केंद्रांवरून रविवारी (दि.२३) घेण्यात आलेल्या मतदानात क्षेत्रातील ७ हजार ९९० पुरूष तर सहा हजार ८९ महिला अशाप्रकारे एकूण १२ हजार ७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे, मतदान प्रक्रीया सुरू असताना क्षेत्रातील ग्राम मोरवाही येथे दोन्ही पक्षाच्या गोंदिया येथील कार्यकर्त्यांना बघून गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला. एवढेच नव्हे तर दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांची आपसांत बाचाबाची झाली. यावर दोन्ही पक्षांतील वरिष्ठ पदाधिकारीही आमने-सामने आले होते. पोलिसांनी ऐनवेळी मध्यस्ती करून वाद मिटविल्याची माहिती आहे. यामुळे काही काळ मोरवाहीत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.

दोन्ही जागांसाठी आज मतमोजणी
आसोली जिल्हा परिषद क्षेत्रासह माहुरकुडा पंचायत समिती क्षेत्राची मतमोजणी सोमवारी (दि.२४) होणार आहे. यात आसोलीची मतमोजणी येथील नवीन प्रशासकीय इमारतीत होणार असून माहुरकुडाची मतमोजणी अर्जुनी-मोरगाव येथील तहसील कार्यालयात होणार आहे. सकाळी ११ वाजतापासून दोन्ही जागांसाठी मतमोजणी होणार आहे.

माहुरकुडा पं.स.साठी ६४.५० टक्के मतदान
अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील माहुरकुडा पंचायत समिती क्षेत्रातील रिक्त पदासाठी रविवारी (दि.२३) झालेल्या पोटनिवडणुकीत टक्के ६४.५० टक्के मतदान झाले.यात तीन उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले असून त्याचा फैसला सोमवारी होणार आहे.यात नेमकी बाजी कोण मारणार याची मतदारांना उत्सुकता लागली आहे.
माहुरकुडा पंचायत समिती क्षेत्राचे सदस्य नानाजी मेश्राम यांच्या निधनानंतर जागा रिक्त झाली होती. यासाठी रविवारी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पोटनिवडणूक घेण्यात आली. यात संघदीप विजय भैसारे (काँग्रेस),दिनेश निलकंठ शहारे (भाजप) व अजय सुरेश बडोले (बहुजन वंचित आघाडी) हे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या क्षेत्रात महालगाव, तावशी, मोरगाव, निलज, माहुरकुडा, मालकनपूर व सिरोली या सात गावांचा समावेश असून एकूण १० मतदान केंद्र होती. ही जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या क्षेत्रातील मतदारांची संख्या ७३५७ असून यात ३७७२ पुरुष व ३५८५ महिला मतदारांचा समावेश आहे. यापैकी रविवारी २३८० पुरूष आणि २३६५ महिला अशा एकूण ४७४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यापूर्वी ही जागा काँग्रेसच्या ताब्यात होती. आता विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे, तहसीलदार विनोद मेश्राम, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सुनील भानारकर यांनी ही पोटनिवडणूक यशस्वीपणे हाताळली. मतदान शांततेत पार पडले असून कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

Web Title: Asolii zip 73.40 percent polling for the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.