म्हादई खोरे: तीन राज्ये करणार संयुक्त पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2024 08:10 AM2024-04-05T08:10:14+5:302024-04-05T08:11:08+5:30

कर्नाटकने काम सुरू केल्याच्या गोव्याने केलेल्या तक्रारीची 'प्रवाह' कडून दखल

mhadei river issue joint inspection by three states including goa | म्हादई खोरे: तीन राज्ये करणार संयुक्त पाहणी

म्हादई खोरे: तीन राज्ये करणार संयुक्त पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: कर्नाटकने म्हादईचे पाणी वळविण्यासाठी नव्याने काम सुरू केल्याने गोवा राज्याने केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर 'प्रवाह' प्राधिकरण गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र या तिन्ही राज्यांना सोबत घेऊन संयुक्त पाहणी करणार आहे. जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी ही माहिती दिली. 

मंत्री शिरोडकर म्हणाले की, 'प्रवाह'कडून गोव्याला पत्र आले असून संयुक्त पाहणीसाठी तारखा सूचवा असे सांगण्यात आले आहे. यासाठी वेगवेगळ्या तीन ते चार तारखा आम्ही पाठवणार आहोत. कर्नाटक व महाराष्ट्र सरकारलाही प्राधिकरणाने असेच पत्र पाठवले असून तिन्ही राज्यांसाठी संयुक्तिक अशी तारीख निश्चित करुन म्हादईच्या ठिकाणी जेथे काम चालू आहे तेथे पाहणी केली जाईल.'

शिरोडकर म्हणाले की, 'म्हादईबाबत गोवा सरकार कोणतीही तडजोड करणार नाही. कायद्याने जे काही करणे शक्य आहे ते सर्व काही आम्ही करत आहोत. आमचे अॅडव्होकेट जनरल तसेच वकिलांचे पथक काम करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने जे काही दस्तऐवज मागितले आहेत, त्याचे संकलन करुन आम्ही दिलेले आहे.'

दरम्यान, सध्या लोकसभा निवडणुकीत सर्वजण व्यस्त आहेत. त्यामुळे इतर दोन राज्ये पत्राला प्रतिसाद देतील का? असा सवाल केला असता शिरोडकर म्हणाले की, 'हा विषय गंभीर असल्याने अन्य राज्यांनी यायला हवे. गोव्याच्यावतीने आम्ही जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता व खात्याचे सचिव व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन जाणार आहोत. आमचे अधिकारी दर पंधरा ते वीस दिवसांनी तेथे पाहणी करण्यासाठी जातात. कर्नाटकने म्हादई नदीचे पाणी वळवण्यासाठी नव्याने काम सुरू केले असल्याचे निदर्शनास आले आहे.'

कर्नाटकचा आगाऊपणा

मंत्री शिरोडकर म्हणाले की, 'कर्नाटकने आगाऊपणा करुन काही दिवसांपूर्वी म्हादईचे पाणी मलप्रभेत वळवण्यासाठी नव्याने बांधकाम सुरु केल्याचे वृत्त समजल्यावर आम्ही लगेच 'प्रवाह' प्राधिकरणाला पत्र लिहून तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगानेच म्हादई खोऱ्याचा अभ्यास करण्यासाठी 'प्रवाह'ने संयुक्त पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकने काम सुरु केल्याने न्यायालयाचा अवमान झालेला आहे. सरकार थेट कर्नाटकवर कारवाई करू शकत नाही, प्रवाह प्रधिकरणाने कारवाई करावी लागेल, त्यामुळेच आम्ही तक्रार केली आहे.

 

Web Title: mhadei river issue joint inspection by three states including goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा