ही मस्ती येते कुठून? मद्यपी चालक अन् गोव्यातील वाढते अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 10:19 AM2023-08-08T10:19:28+5:302023-08-08T10:20:04+5:30

अनेक मद्यपी चालक जीवघेण्या अपघातास कारण ठरले आहेत. 

drunk drivers and increasing accidents in goa | ही मस्ती येते कुठून? मद्यपी चालक अन् गोव्यातील वाढते अपघात

ही मस्ती येते कुठून? मद्यपी चालक अन् गोव्यातील वाढते अपघात

googlenewsNext

गोव्यातील एका ठरावीक वर्गातील चंगळवादी संस्कृती दुसऱ्याचा जीव घेण्यास कारण ठरत आहे. सातत्याने रस्त्यांवर वाहन अपघात होत आहेत. वाहतूक नियमांचा भंग करून वाट्टेल तशी वाहने हाकली जात आहेत. गोव्याचे पोलिस परप्रांतीय वाहने अडवून तालांव देण्यात बिझी आहेत. दारूडे चालक रस्त्यांवर दंगामस्ती करत आहेत. रविवारी रात्री बाणस्तारी येथे मर्सिडीज कार चालकाने जो थरार केला, त्यामुळे तिघा निष्पाप व्यक्तींचे जीव गेले. चार-पाच जण गंभीर जखमी झाले. ज्याने अपघात घडवून आणला, त्या चालकाविरुद्ध (परेश सावर्डेकर) गोव्यात सगळीकडे संताप आहेच. शिवाय हे प्रकरण मिटविण्यासाठी जे कुणी धडपडले, ज्या राजकारण्यांनी हातपाय बडवले, त्यांच्याबाबतही जनमानसात कडवट प्रतिक्रिया आहेत. अति दारू पोटात गेल्यानंतर काहीजण वाहन हाकण्याच्यादेखील स्थितीत नसतात. यापूर्वी अनेक मद्यपी चालक जीवघेण्या अपघातास कारण ठरले आहेत. 

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पोलिस यंत्रणा अधिक सक्रिय करून रोज रात्री मद्यपी चालकांची झडती घेण्याचे काम पोलिसांना द्यावे. सलग तीन-चार महिने तरी मोठी व्यापक मोहीम राज्यात चालायला हवी. कसिनो, बार व रेस्टॉरंट, क्लब, पब अशा ठिकाणी जाऊन ज्या व्यक्ती वाहन चालवत माघारी येतात, त्यांची धरपकड व्हायला हवी. कोण किती प्रमाणात दारू प्यायला आहे, हे अल्कोमीटरने तपासून त्यांना तुरुंगातच टाकावे लागेल. अन्यथा निष्पाप लोकांचे बळी जात राहतील. बाणस्तारी येथील घटनेने पूर्ण सरकारी यंत्रणेचे व सगळ्याच दारुड्या चालकांचे डोळे उघडले असतील, असे समजावे काय हे येणाऱ्या काळात कळून येईल. 

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांचेही जीव सुरक्षित नाहीत. रस्त्याच्या बाजूने कुणी सकाळी किंवा सायंकाळी चालत असेल तर मागून येणारे वाहन कशा प्रकारे ठोकर देईल ते सांगता येत नाही. राज्यात पूर्वी अशा अपघातांमध्येही पादचाऱ्यांचे जीव गेलेले आहेत. काहीजण दुचाक्या बेफाम पद्धतीने हाकतात, तर काहीजण मर्सिडीज आणि अन्य महागड्या, वेगवान गाड्या वाट्टेल तशा उडवतात, पणजीत पहाटे किंवा मध्यरात्री जे तथाकथित पॉश कुटुंबातील चालक वाहन हाकतात, त्यांना अडवून त्यांची तपासणी करावी लागेल. असे बहुतांश चालक एक तर गाडी नेऊन झाडावर, वीज खांबावर मारतात किंवा जाऊन दुसऱ्याला ठोकतात. यापूर्वी बार्देश तालुक्यात तसेच दोनापावल व मिरामार पट्ट्यात अशा घटना घडलेल्या आहेत. पेडणे तालुक्यातील एका माजी आमदाराच्या मुलाचा काही वर्षांपूर्वी पहाटेच मृत्यू झाला होता. 

शिवोलीच्या पट्ट्यात पहाटेच दोघा पर्यटकांचे अशाच प्रकारे बळी गेले होते. काही मद्यपी चालकांना वाहन चालवताना मध्येच झोपही लागते. काहीवेळा दुचाकी चालक मिरामार कांपाल मार्गावर शर्यत लावतात. अनेक उच्चभ्रू कुटुंबातील मुले ड्रग्जच्या आहारी गेलेली आहेत. त्यांच्याकडून वेगळीच संस्कृती जपली जाते. पणजी परिसरातील एका नाट्यकलाकाराचा नातू काही वर्षांपूर्वी अपघातात दगावला. अर्थात प्रत्येकवेळी वाहन चालकाचाच दोष असतो असे नाही, पण अनेकदा अतिवेगाची नशा चढलेले किंवा दारू प्यायलेले चालक दुसऱ्याचेही जीवन उध्वस्त करत आहेत.

पणजी, मडगाव, वास्को, फोंडा, म्हापसा अशा काही प्रमुख शहरांतील तथाकथित उच्चभ्रू समाजातील पोरे रात्री अय्याशी जीवन जगत आहेत. त्यांना समाजातील गरीब व सामान्य लोकांच्या दैनंदिन सुखदुःखाशी काही देणेघेणे नसते. ही चंगळवादी मुले अत्यंत महागड्या कार रात्रीच्यावेळी उडवतात. काही तरुण व तरुणी आईबापांनी कमावलेला पैसा क्लब, पब, कसिनो व किनारी भागातील महागड्या रेस्टॉरंटमध्ये उडवतात. काही मंत्री, आमदारांची मुलंदेखील अशीच चैनीत जगत आहेत. बाणस्तारी येथे झालेल्या अपघातावेळी वाहन नेमके कोण चालवत होते याचा शोध पोलिसांना घ्यावाच लागेल. सुरेश फडते व भावना फडते या दांपत्यासह इतरांचा बळी घेतलेल्या वाहन चालकाला कठोर शिक्षा व्हायला हवी.

गेल्या ७ महिन्यात गोव्यात वाहन अपघातात १८४ व्यक्ती ठार झाल्या. मद्यपी चालकांना फासावर देण्याची वेळ आली आहे, असे अतिशयोक्तीचा दोष पत्करून म्हणावे लागेल. मंत्री माविन यांनी म्हटल्याप्रमाणे चालकाने वाणस्तारीत तीन खूनच केले आहेत, पण चालक सावर्डेकराविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्याचे धाडस सरकारला नाही.

 

Web Title: drunk drivers and increasing accidents in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.