हा वनवास केव्हा संपणार? वीस गावांतील नागरिकांचा अद्यापही प्राणहिता नदीतून जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2022 11:47 AM2022-10-03T11:47:48+5:302022-10-03T11:52:28+5:30

दरदिवशी शेकडाे नागरिक तेलंगणात करतात ये-जा

Gadchiroli | The life-threatening journey of the citizens of twenty villages across the Pranhita river | हा वनवास केव्हा संपणार? वीस गावांतील नागरिकांचा अद्यापही प्राणहिता नदीतून जीवघेणा प्रवास

हा वनवास केव्हा संपणार? वीस गावांतील नागरिकांचा अद्यापही प्राणहिता नदीतून जीवघेणा प्रवास

googlenewsNext

सिरोंचा (गडचिरोली) : तालुक्यातील रेगुंठा-कोटापल्ली परिसरातील तब्बल २० गावांतील हजारो नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून प्राणहिता नदीचे पात्र ओलांडून तेलंगणा राज्य गाठावे लागत आहे. नदी भरली असताना तर हा प्रवास अधिकच जीवावर बेतणारा ठरत आहे.

जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क शेजारच्या तेलंगणा राज्याशी होत आला आहे. एवढेच नव्हे तर रोटीबेटीचे व्यवहारही जोडले गेले आहेत. परिणामी, तालुक्यातील अनेक नागरिक तेलंगणात ये-जा करीत असतात. तालुक्यातील रेगुंठा-कोटापल्ली परिसरातील गावातील नागरिकांचा तेलंगणाशी व्यवहार चालत आला आहे. या भागातील बारमाही वाहणारी प्राणहिता नदी पावसाळ्याच्या कालावधीत रुद्रावतार धारण करीत असते. मात्र, या नदीवर पुलाची निर्मिती न झाल्याने परिसरातील २० गावांतील नागरिक हतबलतेने नावेच्या साहाय्याने तेलंगणात प्रवास करीत आहेत. पावसाळ्यात नदीत १०० फूट खाेल पाणी वाहत असते. मात्र, अशा स्थितीतही या परिसरातील जवळपास ३०० नागरिक दररोज जीव मुठीत घालून नावेच्या साहाय्याने तेलंगणाचा किनारा गाठत असतात.

रेगुंठा, कोटापल्ली, मोयाबीन पेठा, नरसिंहापल्ली, पर्सेवाडा, चिख्याला, दर्षेवाडा, झेंडा, मुलादिम्मा, पापायापल्ली, येला, पिर्मेडा, विठ्ठलराव पेठा, चंदारम, बोकटागुडम, बोंड्रा या २० गावांतील नागरिकांना या त्रासाचा सामना करावा लागत आहे. या भागातील नागरिक दररोज विविध कामांसाठी तसेच आरोग्य सेवेसाठी तेलंगणा राज्यातील चेन्नूर, मंचिरियाल, गोदावरी खांनी, करीमनगर, वारंगल या शहरात भेट देत असतात. मात्र प्राणहिता नदीवर पुलाची निर्मिती न झाल्याने या परिसरातील नागरिकांना मागील अनेक दशकापासून नदीवाटे नावेतील जीवघेणा प्रवास घडत आहे. राज्य शासनाने आकांक्षित जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला विशेष प्राधान्य दिले असले तरी रेगुंठा-कोटापल्ली परिसरातील या २० गावात रस्त्यासह मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्याने हा वनवास केव्हा संपणार?, असा संतप्त सवाल या परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.

काेटापल्ली गावाजवळ पुलाची गरज

कोटापल्लीपासून ३० किमी अंतरावर आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग व अहेरी ते कोटापल्ली आणि कोटापल्ली ते टेकडा असे तीन मुख्य मार्ग आहेत. कोटापल्ली गावाजवळ असलेला प्राणहिता नदीवर पुलाची निर्मिती झाल्यास सिरोंचा-आलापल्ली राष्ट्रीय मार्गावरून चालणारी जडवाहने कोटापल्ली-वेमनपल्ली मार्गाने तेलंगणा राज्यातील चेन्नूर, मंचिरियाल, गोदावरी खांनी, वारंगल, कारीमनगर या शहरात जाण्यासाठी सोयीचे ठरू शकते. या पुलाची निर्मिती झाल्यास रेगुंठा परिसरातील अनेक समस्या दूर होऊन सदर परिसराचा विकासाला मोठा विकास होऊ शकतो.

Web Title: Gadchiroli | The life-threatening journey of the citizens of twenty villages across the Pranhita river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.