दौडमधून विकासाची आस प्रतिबिंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 10:21 PM2018-08-09T22:21:43+5:302018-08-09T22:22:41+5:30

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोलीत गुरूवारी विकास दौडचे आयोजन करण्यात आले होते. या दौड स्पर्धेत जिल्हाभरातील एकूण ५६५ युवक-युवती व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून त्यांच्यामध्ये विकासाची आस असल्याचे प्रतिबिंबीत झाले.

Evidence of Developmental Impact from Doubles | दौडमधून विकासाची आस प्रतिबिंबित

दौडमधून विकासाची आस प्रतिबिंबित

Next
ठळक मुद्देविकास दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद : आदिवासी दिनानिमित्त स्पर्धेत जिल्हाभरातील ५६५ युवक-युवती धावले

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोलीत गुरूवारी विकास दौडचे आयोजन करण्यात आले होते. या दौड स्पर्धेत जिल्हाभरातील एकूण ५६५ युवक-युवती व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून त्यांच्यामध्ये विकासाची आस असल्याचे प्रतिबिंबीत झाले.
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे, उपपोलीस ठाणे व पोलीस मदत केंद्रांवर यापूर्वी विकास दौड स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धांमधून पहिल्या पाचमध्ये आलेल्या एकूण ५६५ विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय विकास दौड स्पर्धेसाठी पात्र ठरविण्यात आले. याशिवाय सदर स्पर्धेत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १९२ बटालियनच्या जवानांनीही सहभाग दर्शविला.
सकाळी ८ वाजता येथील इंदिरा गांधी चौकात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोलीस उपमहानिरिक्षक टी.शेखर, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी हिरवी झेंडी दाखवून या दौड स्पर्धेचा शुभारंभ केला. उद्घाटनप्रसंगी प्रामुख्याने अप्पर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधीक्षक मोहीतकुमार गर्ग तसेच सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
सदर विकास दौड इंदिरा गांधी चौकातून कारगिल चौक, आयटीआय चौक, सामान्य रूग्णालय, जिल्हा न्यायालय ते एमआयडीसी व टी-पार्इंट मार्गे पोलीस मुख्यालय गडचिरोलीच्या एम. टी. गेट येथे पोहोचल्यावर पोलीस मुख्यालयात या दौडचा समारोप झाला. सदर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पार पडला. याप्रसंगी गडचिरोली-गोंदिया परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे यांच्या हस्ते विजेत्या प्रथम, द्वितीय व तृतीय गटास बक्षिस देण्यात आले. मुले व मुली यांच्या गटातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकास रोख १० हजार, ट्रॉफी, पुष्पगुच्छ, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास रोख ७ हजार ५००, ट्रॉफी व पुष्पगुच्छ तसेच तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास रोख ५ हजार, ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. दोन्ही गटातून प्रत्येकी तीन स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषीक देऊन सन्मानित करण्यात आले. या समारंभाला जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी व स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते.
राष्ट्रीयस्तरावर नेण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन देणार
गडचिरोली या आदिवासी बहूल मागास जिल्ह्यातील आदिवासी युवक, युवतींमध्ये चांगली शारीरिक क्षमता व विविध क्रीडा कौशल्य उपजत आहेत. या गुणांना चालना देण्यासाठी दौड व इतर स्पर्धा पोलीस विभागातर्फे सातत्याने घेतल्या जात आहेत. या जिल्हास्तरीय विकास दौड स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पोहोचविण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, शिवाय त्यांना पोलीस विभागातर्फे सर्व प्रकारची मदत करण्यात येईल, असे गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक अंकूश शिंदे यांनी सांगितले. तसेच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जिल्हास्तरापर्यंत पोहोचलेल्या स्पर्धकांची पोलीस मदत केंद्रापासून सुरूवात होऊन कशा पध्दतीने त्यांची जिल्हास्तरीय दौड स्पर्धेसाठी निवड करण्यात आली, याची माहिती दिली. यामुळे दुर्गम भागातील तरूण, तरूणींचा आत्मविश्वास वाढल्याचे ते म्हणाले.

Web Title: Evidence of Developmental Impact from Doubles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस