Fifa World Cup 2018 : भारत विश्व स्पर्धेत नाही याचेच दु:ख...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 05:15 AM2018-06-13T05:15:57+5:302018-06-13T05:15:57+5:30

फुटबॉल विश्वचषकाची उत्सुकता जगभर शिगेला पोहचली आहे. सर्वच क्रीडाप्रेमींच्या आनंदाला उधाण आले आहे. यानिमित्ताने ‘लोकमत’ वाचकांसाठी लिहिताहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक रणजीत दळवी थेट मॉस्कोहून....

Fifa World Cup 2018: It is sad that India is not in the World Cup ... | Fifa World Cup 2018 : भारत विश्व स्पर्धेत नाही याचेच दु:ख...

Fifa World Cup 2018 : भारत विश्व स्पर्धेत नाही याचेच दु:ख...

Next

- रणजीत दळवी

पाऊस काही पिच्छा सोडण्यास तयार नाही. मुंबईहून मॉस्कोला निघताना मुसळधार पावसामुळे एअरबस लॅण्ड होऊ न शकल्याने पहाटे चारच्या फ्लाइटने चक्क सहा तास उशीराने टेक आॅफ केले. यामुळे पुढची कनेक्टींग फ्लाइटही चुकली. साधारणपणे २६ तासांच्या प्रवासानंतर मॉस्को गाठले आणि तेथेही पावसानेच स्वागत केले. रात्री
दहा वाजताही उजेड होता, जणूकाही सातच वाजले होते. मात्र
ऐन उन्हाळ्यातही गारठा चांगलाच होता.
टॅक्सीचालकाने आमची स्थिती पाहिली आणि हीटर सुरु केला. त्याने लगेच विचारले, ‘फुटबॉल? वर्ल्डकप?’ यावर मी हातवारे करत त्याला उत्तर दिले. येथे इंग्रजी जवळजवळ बोललेच जात नाही. त्यामुळे हातवारे, भावमुद्रा हीच काय ती संपर्क साधण्याची भाषा. खेळाडू, रेफ्री, दूरदर्शनवर मराठी, हिंदी आणि इंग्रजीत समालोचन असा माझा आजवरचा प्रवास. मुंबई फुटबॉलच्या अव्वल साखळीत रेफ्री म्हणून दशकभराचा अनुभव आहे. पण एक शल्य सतत वाटते. विश्वचषक स्पर्धेत माझा भारत देश नाही.
होय, १९४८ लंडन, १९५२ हेलसिंकी, १९५६ मेलबर्न आणि १०६० रोम या आॅलिम्पिकमध्ये खेळलेला माझा भारत. १९५१ दिल्ली, १९६२ जकार्ता आशियाई खेळातील सुवर्णपदक विजेता माझा भारत. कोलकात्यामध्ये १९८०-९० च्या दशकात मोहन बागान, इस्ट बंगाल, मॉहमेडन स्पोर्टिंग यांच्यातील लढतींना लाखाच्या आसपास गर्दी खेचणारा माझा भारत. गोवा - मुंबई केरळ येथे फुटबॉलसाठी प्रचंड गर्दी करणारा माझा भारत. कोलकात्यात फुटबॉलमध्ये दंगली घडणारा भारत. आज त्या खेळाला आम्ही विसरलो. मुंबईत चार देशांची स्पर्धा भरते आणि आपला शंभरावा सामना खेळणारा कर्णधार सुनील छेत्री ही लढत पाहण्यासाठी या, अशी आर्जव एका व्हिडिओ द्वारे करतो, हे आपल्याला भूषणावह आहे?
मुंबईचा फुटबॉल वाढला, पण दर्जा मात्र खालावला. १९८०-९० च्या दशकातील येथल्या प्रशासकांचे वाद, संघटनात्मक सुंदोपसुंदीने अनेकांची कारकिर्द संपुष्टात आली. माझ्यासारख्या डझनभर रेफ्रींनाही याची झळ पोहचली. फिफा रेफ्री होऊन विश्वचषकात काम करणे ही प्रेरणा आमचे गुरु, फिफा रेफ्री आणि देशातील एकमेव फिफा रेफ्रीज इन्स्ट्रक्टर अ‍ॅलेक्स वाझ यांनी
दिली होती. पण त्यांनाही या विकोपाला गेलेल्या वादाचा फटका बसला.
एका अंतिम लढतीत खेळाडूने हल्ला केल्यानंतर मी त्याला रेड कार्ड दाखविले. पुढे त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. अनेकवेळा प्रशासकांनी त्यांच्या पाठिशी ठाम उभे राहूनही आम्हाला संरक्षण दिले नाही. जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. शेवटी ठरविले, बस्स,
आता पुरे! माझ्यासारखे अनेकजण आहेत. खेळाडू, प्रशिक्षक, रेफ्री ज्यांनी निराश होऊन खेळाला ‘रामराम’ केला. नाराजी - राग त्या खेळावर नाही. रोष आहे, तो भारतीय फुटबॉल व्यवस्थेवर. ती जर ठीक असती, तर ‘माझा भारत’ विश्वचषकामध्ये दिसला असता. तो नाही याचे अतीव दु:ख आहे, ते देशातील करोडो फुटबॉलप्रेमींना!

Web Title: Fifa World Cup 2018: It is sad that India is not in the World Cup ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.