FIFA Football World Cup 2018 : गच्छंतीची नामुष्की टळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 02:43 AM2018-06-28T02:43:41+5:302018-06-28T02:44:05+5:30

विश्वचषक स्पर्धेतून गच्छंती टाळून अर्जेंटिनाने मोठी नामुष्की टाळली! त्यांच्या मदतीला अनपेक्षितपणे धावला मार्कोस रोहो! गेल्या लढतीत बाकावर बसल्यानंतर आज खेळावयाची संधी मिळालेल्या चारापैकी तो एक!

False embarrassment! | FIFA Football World Cup 2018 : गच्छंतीची नामुष्की टळली!

FIFA Football World Cup 2018 : गच्छंतीची नामुष्की टळली!

Next

रणजित दळवी
विश्वचषक स्पर्धेतून गच्छंती टाळून अर्जेंटिनाने मोठी नामुष्की टाळली! त्यांच्या मदतीला अनपेक्षितपणे धावला मार्कोस रोहो! गेल्या लढतीत बाकावर बसल्यानंतर आज खेळावयाची संधी मिळालेल्या चारापैकी तो एक! त्याने तो व्हॉली मारून केलेला गोल अप्रतिम याच्यासाठी, की त्याने तो लाथाडला उजव्या पायाने, जी गोष्ट तो क्वचितच करतो. त्याच्यापुढे एक प्रतिस्पर्धी मार्गात होता व वेळ होता क्षणार्धाचा. त्याच गोलने नायजेरियाची शौर्यगाथा संपुष्टात आणली. त्याच्या रुपाने अर्जेंटिनाला हीरो सापडला की भविष्यातला सुपरस्टार? या घडीला त्याच्यावर प्रकाशझोत अवश्य असला तरी त्याच्या आणि सहकाऱ्यांसमोर पुढचे आव्हान फारच मोठे आहे. फ्रान्स एक पक्का व्यावसायिक संघ आहे. सुनियोजितपणा, उत्तम डावपेच आणि नेमकाच आक्रमकपणा ही त्यांच्या खेळाची वैशिष्ट्ये आहेत. मेस्सीला पूर्वार्धात नायजेरियाने जी मोकळीक दिली ती फ्रान्स देणार नाही, हे काय सांगावयास हवे?
नायजेरियाच्या बचावफळीतील दरार एव्हर बानेगाने हेरली आणि त्याने उंचावरून मेस्सीला अचूक पास दिला. तेव्हा तो चेंडू आपल्या डाव्या मांडीवर झेलल्यानंतर त्याने डाव्या चवड्यावर आणून नियंत्रित केला व एकाच दमात तो उजव्या पायाने लाथाडून गोलमध्ये वळविला. यात असली मेस्सीचे पुनश्च दर्शन झाले! मात्र उत्तरार्धात नायजेरियाने मध्यक्षेत्रात नियंत्रण प्रस्थापित करताच मेस्सी थंडावला आणि अर्जेंटिनाही. अचानक आफ्रिकन संघ आक्रमक झाला आणि प्रतिस्पर्धी सुमार दिसू लागला. त्यांनी टाकलेला दबाव फलदायी ठरला. अखिलाडूपणा नसानसांत भिनलेल्या माशेरानोने त्यांना पेनल्टी किकची भेट दिली. वय झाले आणि दम व ताकद कमी पडू लागल्यावर प्रतिस्पर्ध्यांना येनकेन प्रकारे रोखण्याशिवाय पर्याय असत नाही. तोच त्याने निवडला व
व्हिक्टर माझेसने आरामात बरोबरी साधली. या सामन्याचे रेफरी झुनेत शाकिर यांनी सुरुवातीपासूनच खेळाची सूत्रे हाताबाहेर जाणार नाहीत, याची काळजी घेतली. त्यांनी पेनल्टी त्वरित दिली व तो निर्णय बरोबर असल्याची खातरजमादेखील व्हीएआरच्या मदतीने केली. माशेरानोच्या आर्जवांना त्यांनी असे उत्तर दिले.
शाकिर यांनी अन्य वेळी जो संयम दाखविला तो वाखाणण्याजोगाच होता. जोरजोराने हातवारे करत वाद घालून चेंडू दूर फेकत तीव्र नापसंती व्यक्त करणाºया नायजेरियाच्या एटेबोला त्यांनी ज्या प्रकारे समजावले, तो क्षण इतर रेफरींना बरेच काही शिकविणारा होता.
इतकेच काय, रोहोच्याविरोधात पेनल्टी न देण्याचा त्यांचा निर्णय फुटबॉलच्या कायदे-कानूनांविषयीचे त्यांचे सखोल ज्ञान व अर्थ लावण्याची क्षमता सिद्ध करून गेला. फार महत्त्वाचा निर्णय होता तो! चेंडू
हेड केल्यानंतर तो त्याच्या हातावर घरंगळला होता. तो काही गोलच्या दिशेने जात नव्हता, की त्याच्या
जवळ होता एखादा प्रतिस्पर्धी,
ज्याला गोलसंधी मिळू शकली
असती. यावर बराच खल होईल.
पण खुर्चीत बसणाºया टीकाकारांना शाकिर खलनायकच वाटतील.
खेळाडू खरोखरच जाणूनबुजून हाताने चेंडू खेळला की कसे, हे पाहणे महत्त्वाचे असते. उगीचच संशयावरून एखाद्या खेळाडूला फासावर लटकवायचे? आणि त्यामुळे अर्जेंटिनाची नाहक गच्छंती नसती झाली?
आता अतिशय कठीण परिस्थितीतून बाहेर पडताना गोंधळलेल्या अवस्थेतील फ्रान्सविरुद्ध मुकाबला करायचा आहे. फ्रान्सने डेन्मार्कविरुद्ध आपल्या पहिल्या अकरातील नऊ जणांना विश्रांती दिली. केवढा विश्वास आपल्या राखीव क्षमतेवर? कालच्या लढतीत पुरती दमछाक झालेल्या आणि मानसिक ताण-तणावाखालील अर्जेंटिनाला हे आव्हान अतिशय जड जाणार हे निश्चित!

Web Title: False embarrassment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.