क्रोएशियाचा सकारात्मक खेळ...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 04:22 AM2018-07-09T04:22:01+5:302018-07-09T04:22:20+5:30

फ्योडोर स्मॉलोव्हची पहिली किक फारच कमजोर निघाली. झागोएव्हने गोल केला, पण तारणहार मारिओने एवढा जोरदार फटका का बरे मारला? चेंडू चक्क बाहेर गेला. क्रोएशियाच्या कोव्हासिचने दरम्यान दुसरी किक मारताना स्मोलॉव्हचे अनुकरण केल्याने अकीनफीव्हला तो फटका रोखता आला. पण मॉड्रिकला तो गोल मिळताच फासे क्रोएशियाच्या बाजूने पडले.

 Croatia's positive game ... | क्रोएशियाचा सकारात्मक खेळ...

क्रोएशियाचा सकारात्मक खेळ...

googlenewsNext

- रणजीत दळवी

रशियाचे स्वप्न खंडित झाले! खरे तर त्यांची येथवरची प्रगती तशी अनपेक्षितच होती. ना त्यांच्यापाशी गुणवत्ता, ना खेळात कल्पकता अथवा विविधता आणि त्यात कहर म्हणजे अंगी असणारी नकारात्मक वृत्ती. फुटबॉलचे सौंदर्य आवडणाऱ्या अस्सल चाहत्यांना याचा कोण आनंद झाला असावा? त्यामानाने गुणवत्ता असणाºया क्रोएशियाने त्या वृत्तीवर मात करताना सकारात्मकता दाखवली. त्यांना थोडा नशिबाने हात दिला हेही खरे. शूटआऊटमध्ये ल्युका मॉड्रिÑकचा फटका इगॉर अकीनफीव्हने उजवीकडे झेपावत रोखला, पण दुर्दैवाने चेंडू गोलखांबाला लागून गोलजाळीमध्ये गेला. दुसरीकडे दुखापतीने ग्रस्त गोलरक्षक डॅनियल सुबासिचवर भरवसा त्यांनी ठेवला. हा निर्णय अतिशय धाडसी नव्हता?
स्वीडन आणि इंग्लंड ही लढत फारच कंटाळवाणी झाली. पात्रता फेरीत इटलीसारख्या मोठ्या संघाला बाद करणाºया स्वीडनला इंग्लंडने खडे चारले ते ‘सेट-पीस’वरील दोन गोलच्या आधारे. तब्बल २८ वर्षांनी उपांत्य फेरी गाठणाºया इंग्लंडला ५२ वर्षांपूर्वी जिंकलेले विजेतेपद आता खुणावू लागले असेल.
रशियाचा क्रोएशियाविरुद्धचा खेळ त्यांनी जो स्पेनविरुद्ध केला त्या तुलनेत किंचित सकारात्मक होता. त्यांनी अधूनमधून प्रतिस्पर्धी क्षेत्रात जाण्याचे धाडस केले. परिणामी त्यांना आघाडीही मिळाली. डेनिस चेºयेशवचा तो गोल स्पर्धेमधील काही उत्तम गोलमध्ये गणला जाईल. आर्टेम झ्युबाबराबेर उत्तम समन्वय साधल्यानंतर त्याने २५ यार्डवरून डाव्या पायाने मारलेला फटका पाहत राहण्याजोगा होता. सुबासिचलाही तो पाहण्यापलीकडे कामच उरले नाही. पण केवळ ५-६ मिनिटांतच रशियाला आंद्रे क्रॅमरिचने जमिनीवर आणले. मारिओ मॅण्डझु किचच्या क्रॉसवर पुढे वाकत ‘आॅन द रन’ हेडर म्हणजे चक्क बंदुकीची गोळी!
पेरिसिचचा एक फटका गोलखांबाला लागला व गोलमुखातून मैदानाबाहेर गेला तेव्हा रशियन चाहत्यांनी मोठा सुस्कारा सोडला. यावेळी तासाभराचा खेळ झाला होता. यानंतर रशियाने बचावात्मक पवित्रा घेतल्याने खेळ थंडावला. कासवाने डोके आणि पाय आत ओढून घेतल्यावर वर्मी घाव घालायचा कसा व कोठे, अशी क्रोएशियाची अवस्था झाली. दोन्ही संघांनी ज्यादा वेळ आणि शूटआऊटची तयारी करत तीन-तीन बदल मग केले आणि ९० व्या मिनिटाला सुबासिचला दुखापत झाली. चौथा बदल ज्यादा वेळेतच करता येत असल्याने क्रोएशियाने जीव मुठीत ठेवत पाच मिनिटांचा ‘स्टॉपेज-टाईम’ खेळून काढला.
‘एक्स्ट्रा-टाईम’मध्येही सुबासिच सारखा उजव्या पायाच्या मांडीच्या मागे असणारी ‘हॅमस्ट्रिंग’ सारखी चाचपून पाहत होता. केवढा मोठा जुगार क्रोएशिया खेळली? ज्यादा वेळेत उभय संघांनी नाट्यमयरीत्या एकेक गोलही केला.
डॉमागोझ व्हिडाने एका अप्रतिम हेडरवर १०० व्या मिनिटाला क्रोएशियाला आघाडी मिळवून दिलीे. आपले आव्हान जणू सपंलेच, असे दिसत असता रशियाच्या ब्राझिलियन मारिओ फर्नांडिसने बरोबर साधली व यजमानांच्या आशांना पुनर्जीवन दिले. जोसिफ पिवारीचने पेनल्टी एरियाच्या बाहेर चेंडू कोपराने खेळण्याची घोडचूक केल्याने रशियाचे फावले. ती फ्री किक उपयुक्त ठरली. जखमी सुबासिचने शेवटच्या एक-दीड मिनिटात दोन गोल प्रयत्न हाणून पाडल्याने मग क्रोएशिया तगली.
इंग्लंड आणि स्वीडनचा खेळ म्हणजे उंचावरून चेंडू खेळण्यावर अधिक भर बगलेवरून क्रॉसेस असोत की मध्यक्षेत्रातून दिले जाणारे पासेस, चेंडू सतत हवाईमार्गाने प्रवास करत होता. हेतू हा, की आपल्या फॉर्वर्ड्सनी तो मोकळ्या जागांमध्ये धावून चेंडू मिळवत गोलप्रयत्न करावेत. इंग्लंडला रहीम स्टर्लिंगने निराश केले. त्याला दोन वेळा गोलसंधी होती. पण स्वीडन गोलरक्षक रॉबिन ओलसेनने त्याला झकास रोखले.
मॅग्वायर क्रेंद्रस्थानी असलेल्या इंग्लिश बचावफळीला अडचणीत आणण्याची क्षमता स्वीडनपाशी नव्हती आणि जेव्हा केव्हा त्यांनी दोन, तीन प्रयास केले तेव्हा गोलरक्षक जॉर्डन पिकफर्डने सतर्कतेने धोका परतविला. अ‍ॅश्ले यंग आणि जेस्सी लिनगार्ड यांच्या कॉर्नर आणि फ्री-किकवर मॅग्वायर (३१ वे मिनिट) आणि डेली अली (६० वे मिनिट) यांनी ‘डोके’ लावून गोल केले.

Web Title:  Croatia's positive game ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.