अजितदादांची नेमकी दिशा तरी कोणती..? कोणता झेंडा घेऊ हाती

By अतुल कुलकर्णी | Published: April 23, 2023 11:24 AM2023-04-23T11:24:49+5:302023-04-23T11:25:51+5:30

पहाटेच्या शपथविधीसाठी काकांनीच आपल्याला राजभवनावर पाठवले आणि पुन्हा सगळे काही आपण कसे नॉर्मल करून दाखवले असे चित्र उभे केल्याची देखील चर्चा आहे

What is the exact direction of Ajit pawar ? Which flag to take in politics? | अजितदादांची नेमकी दिशा तरी कोणती..? कोणता झेंडा घेऊ हाती

अजितदादांची नेमकी दिशा तरी कोणती..? कोणता झेंडा घेऊ हाती

googlenewsNext

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 

प्रिय अजितदादा, नमस्कार. 

एवढ्या लवकर तुम्हाला दुसऱ्यांदा पत्र लिहिण्याचा योग येईल असे वाटले नव्हते. पण गेल्या काही दिवसांपासून तुमच्या गूढ, रम्य हालचाली ताई, काका यांच्यासह महाराष्ट्रासाठी चर्चेचा विषय बनल्या आहेत. आपल्याला मुख्यमंत्री व्हायचे आहे, ही इच्छा आपण कधीही लपवून ठेवलेली नाही. मात्र, त्या इच्छापूर्तीचे मार्ग आपण सतत बदलताना दिसतात. कधी डाव्या बाजूने तर कधी उजव्या बाजूने आपण जाता असे वाटू लागते. मध्येच आपण सरळसोट मार्ग निवडता. त्यामुळे आपल्याला नेमके डाव्या बाजूला जायचे की उजव्या बाजूला हे कळत नाही. तुम्ही कुठल्याही बाजूला गेला तरी जनतेला काही फरक पडणार नाही. मात्र जे कार्यकर्ते वेगवेगळ्या मतदारसंघांत आपल्यावर विसंबून आहेत त्यांचे काय..? त्यांच्या मतदारसंघात उजव्या बाजूला भगवा झेंडा... डाव्या बाजूला महाविकास आघाडीचा झेंडा... समोर भलताच झेंडा... त्यामुळे ‘दादा, कोणता झेंडा घेऊ हाती...?’, या प्रश्नाच्या उत्तरासाठी ते आपल्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत.

दादा, खरे तर आपल्याला मुख्यमंत्री होण्याची संधी होती. २००४ मध्ये काँग्रेसचे ६९ आणि राष्ट्रवादीचे ७१ आमदार निवडून आले होते. ठरवलं असतं तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता. मात्र राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री कोण होणार? अशी चर्चा सुरू झाली. आर. आर. पाटील यांचे नाव पुढे केले गेले. पण पडद्याआड खरे नाव तुमचे होते. तुम्ही मुख्यमंत्री व्हावे असे त्यावेळी काकांना वाटले नाही. त्यांनी मुख्यमंत्रिपदच काँग्रेसला देऊन टाकले. त्या बदल्यात गृहमंत्रिपद घेतले. ते आर. आर. पाटील यांना देऊन टाकले. आपल्याला जर गृहमंत्रिपद दिले असते, तर वेगळे अजितदादा महाराष्ट्राला बघायला मिळाले असते. काकांनी असे का केले असेल बरे...? ना रहेगा बांस... ना बजेगी बासुरी... अशी खेळी काकांना का करावी वाटली असेल..? आपण त्यांना कधी खासगीत, घरच्या लोकांसमोर याबद्दल विचारले का...? विचारले असेल तर त्यांनी काय उत्तर दिले...? जर आपण विचारले नसेल तर एवढी वर्षे आपण ही सल मनात का ठेवली...? थेट काकांना न विचारता आपण माध्यमांसमोर ही खंत बोलून दाखवली. आमच्या नेत्यांनी निर्णय घेतले, असे म्हणत आपण काकांचे नाव देखील घेतले नाही. हा आपला संयम होता, की मनातला राग...? नेमके काही कळत नाही.

पहाटेच्या शपथविधीसाठी काकांनीच आपल्याला राजभवनावर पाठवले आणि पुन्हा सगळे काही आपण कसे नॉर्मल करून दाखवले असे चित्र उभे केल्याची देखील चर्चा आहे. पहाटेच्या शपथविधीबद्दलही आपण कधी मोकळेपणाने कोणाशी बोलला नाहीत. हे असे आडूनआडून बोलणे आणि राजकारण करणे हा आपला स्वभाव नाही. मात्र, काकांच्या प्रेमापोटी आपण असे करत आहात का..? मी जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार, असे आपण माध्यमांना सांगितले. मात्र मी भाजपसोबत जाणारच नाही, असे काही आपण बोलला नाहीत. आता त्याची चर्चा सुरू झाली आहे. नेमके खरे काय आणि खोटे काय...? आपल्यासोबत किती आमदार आहेत? अशी विचारणा काकांनी म्हणे पुण्याच्या अंकुश काकडे यांच्याकडे केली. काकडे आणि काकांमध्ये झालेले बोलणे बाहेर कसे आले...? की विचारणा केल्याची बातमी बाहेर जावी म्हणून तर काकडे यांच्याकडे काका बोलले नसतील...? प्रत्येक मोठा नेता आपण काय बोललो म्हणजे काय प्रतिक्रिया उमटतील, याचा शोध घेण्यासाठी काही माणसे सांभाळत असतो. एखादे पिल्लू सोडून द्यायचे आणि त्यातून उमटणाऱ्या प्रतिक्रियांचा अंदाज घ्यायचा. त्यानुसार राजकारणाची दिशा ठरवायची, हा काकांचा आवडता खेळ आहे. हे कधी आपल्याला कळालेच नाही का..? आपण अशी काही माणसे आपल्या भोवती जमवली का..? काकांचे क्रॉस सेक्शनमधील मित्र जगभर आहेत. महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारे लोक काकांकडे येतात. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतात. काका त्यांचे ऐकून घेतात. आपण असा मित्रसंचय केला असेलच...! त्यांच्याकडून आपल्याला कोणते फीडबॅक मिळतात..?

राष्ट्रवादीचे सगळ्यात जास्त आमदार निवडून आले तर अजितदादा मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा काका का करत नाहीत...? की सुप्रियाताईंना मुख्यमंत्रिपद देऊन त्यांचे राजकीय भवितव्य सुरक्षित करायचे आहे...? हे प्रश्न आता सतत विचारले जात आहेत. तुम्ही आणि काकांनी मिळून याची उत्तरे दिली पाहिजेत, असे प्रत्येकाला वाटत आहे. आपल्या उत्तरांकडे महाराष्ट्र कान देऊन बसला आहे. दादा, आपली दिशा कोणती..? हा मिलियन डॉलरचा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. आपण लवकरच अशा प्रश्नांची उत्तरे द्याल, याची त्यांना अजूनही खात्री आहे...! 
जाता जाता : एकदा जनतेने निवडून दिले की पाच वर्षे आपण त्यांच्यावतीने कुठेही जाण्यासाठी, कोणताही निर्णय घेण्यासाठी मोकळे असतो. ज्यांनी निवडून दिले त्यांनाच आपण कुठे जावे हे विचारण्याची गरज नसते... आणि तशी पद्धतही नाही. मतदारांनी पक्ष, विचार यासाठी थोडेच मतदान केले आहे...? त्यामुळे मतदारांची फार चिंता करू नका. पुण्यात गेलात, तर दगडूशेठ गणपतीला कमळाचे फूल नक्की अर्पण करा... बाप्पा नक्की आशीर्वाद देईल...
- आपलाच, बाबूराव

Web Title: What is the exact direction of Ajit pawar ? Which flag to take in politics?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.