याचा अर्थ काय?

By Admin | Published: December 29, 2016 03:37 AM2016-12-29T03:37:53+5:302016-12-29T03:37:53+5:30

आपण नेमके काय बोलतो आणि त्याचा काय अर्थ निघू शकतो याचा काहीही विचार न करता स्वत:ची कातडी बचावण्यासाठी प्रसंगी लोक कसे बेलगाम बोलतात याचा जणू वस्तुपाठच

What does this mean? | याचा अर्थ काय?

याचा अर्थ काय?

googlenewsNext

आपण नेमके काय बोलतो आणि त्याचा काय अर्थ निघू शकतो याचा काहीही विचार न करता स्वत:ची कातडी बचावण्यासाठी प्रसंगी लोक कसे बेलगाम बोलतात याचा जणू वस्तुपाठच तामिळनाडूचे माजी मुख्य सचिव पी. राम मोहन राव यांनी घालून दिला आहे. त्यांच्या अधिकृत सरकारी निवासस्थानावर आणि कार्यालयावर छापे मारुन नव्या चलनातील ३० लाख रुपये व पाच किलो सोने जप्त केल्याचे आयकर विभागाने जाहीर केल्यानंतर राव यांना मुख्य सचिव पदावरुन राज्य सरकारने तत्काळ दूर केले (निलंबित नव्हे) आपल्या विरुद्ध झालेल्या या कारवाईबद्दल माध्यमांशी बोलताना राव यांनी म्हटले आहे की जर जयललिता हयात असत्या तर आयकर विभागाने आपल्या घर आणि कार्र्यालयावर धाड मारण्याची हिंमतच केली नसती. याचा एक अर्थ असा निघतो की, आपण जो कारभार करीत होतो त्या कारभाराला सर्वार्थाने जयललिता यांचा पाठिंबा आणि समर्थन होते. थोडक्यात त्या भ्रष्टाचार्यांच्या पाठीराख्या होत्या. आयकर विभागाने राव यांच्याशी संबंधित एकूण अकरा जागी छापे मारले. पण मोठे घबाड राव यांचे पुत्र विवेक याच्यापाशी सापडल्याचे व आपण पाच कोटींच्या बेहिशेबी संपत्तीचे मालक असल्याचे त्यानेच कबूल केल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे. या सर्व धाडसत्राचे मूळ त्या राज्यातील वाळू माफिया शेखर रेड्डी याच्या उद्योगांशी आहे. त्याच्याकडे आयकर विभागाने धाड मारली असता तब्बल १३५कोटींची रोकड आणि १७७ किलो सोने आयकर अधिकाऱ्यांच्या हाती लागले होते. त्याशिवाय जी कागदपत्रे हाती लागली त्यांच्याच आधारे नंतर राम मोहन राव आणि पुत्र विवेक यांच्याकडे धाडी टाकण्यात आल्या. माध्यमांशी बोलताना राव यांनी एकाच वेळी केन्द्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारांवर आरोप केले आहेत. केन्द्र सरकारला राज्यांच्या अधिकारांची जराही तमा नाही आणि म्हणूनच केन्द्राने तामिळनाडू राज्यावर असा हल्ला केला आणि राज्य सरकारदेखील आपले म्हणजे त्याच सरकारच्या एका अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्याचे रक्षण करु शकले नाही असा दुहेरी आरोप त्यांनी केला आहे. हा दुसरा आरोप सरळ सरळ त्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्व्हम यांच्यावरच आहे. पण तो करतानाच त्यांच्याकडे केन्द्राने या धाडीसाठी अनुमती मागितली होती का आणि मागितली असल्यास त्यांनी ती दिली होती का, याविषयी आपणास काही ठाऊक नाही असेही त्यांनी म्हटले आहे. आपला आणि आपल्या मुलाचा व त्याच्या व्यवहारांचा काहीही संबंध नाही असा नेहमीचाच खुलासादेखील त्यांनी केला आहे. राम मोहन राव यांनी जयललिता यांच्या संदर्भात जे विधान केले आहे तो त्यांचा केवळ एक बचाव नसून वास्तव आहे असे गृहीत धरले तरी त्यातही काही आश्चर्य नाही. कारण स्वच्छ कारभारासाठी जयललिता कधीच ख्यातकीर्त नव्हत्या.

Web Title: What does this mean?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.