लोकसभेचा ढोल वाजतोय, पण आवाज कुणाचा?

By किरण अग्रवाल | Published: February 11, 2024 04:49 PM2024-02-11T16:49:06+5:302024-02-11T16:51:05+5:30

Loksabha Election : तोंडावर आल्या निवडणुका, पण नक्की कोण लढणार याबाबत संभ्रमच

The drum of the Lok Sabha is beating, but whose voice is it? | लोकसभेचा ढोल वाजतोय, पण आवाज कुणाचा?

लोकसभेचा ढोल वाजतोय, पण आवाज कुणाचा?

 - किरण अग्रवाल 

आगामी लोकसभा निवडणुकीचे ढोल वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांची तयारी झाली आहे, पण उमेदवार उघडपणे पुढे येताना अद्याप दिसलेले नाहीत. महायुती व आघाडी अंतर्गतच्या पक्षीय पातळीवरील जागावाटपांचे फार्म्युले नक्की झाल्यावरच यात गतिमानता येईल, तोपर्यंत आडाखेच बांधत राहायचे.

लोकसभा निवडणुकीचे घोडा मैदान जवळ आहे, राष्ट्रीय पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत; पण स्थानिक पातळीवर कमालीची संभ्रमावस्था आहे. मतदारांमध्ये ती नसावीही, पण नेमका कोणता पक्ष लढणार व त्याचा उमेदवार कोण असेल याबाबतची ही अविश्वसनीयता ऐनवेळी उमेदवारांचीच दमछाक करणारी ठरली तर आश्चर्य वाटू नये.

निवडणुकीच्या तारखा घोषित होऊन आचारसंहिता कधीही लागू शकते अशी एकूण स्थिती असल्याने, विकासकामे उरकण्याचा सपाटा लागला आहे. एकेका कामाचे भूमिपूजन वा लोकार्पणासाठी जिथे ताटकळत राहावे लागले होते तेथे एका दिवसात वा दौऱ्यात अनेक नारळ फुटत आहेत. आठ-आठ दिवसांत परिसराचे रूप पालटत आहे हे चांगलेच म्हणायचे. निवडणुकीच्या चाहूलमुळे साऱ्या राजकीय पक्षात सक्रियताही आली आहे. मुद्दा हाती लागण्याचा अवकाश, की आंदोलने होऊ लागली आहेत. नेत्यांचे दौरे वाढले असून, पक्षांमध्ये कार्यकर्त्यांना ''भाव'' आला आहे. निवडणुकीचा ढोल वाजतो आहे, परंतु हे सारे होत असताना लोकसभेच्याच दृष्टीने बोलायचे तर उमेदवार कोण? यावर मात्र कोणत्याही पक्षात वा पक्षाबाहेरही कुठे एकवाक्यता आढळत नाही.

पश्चिम वऱ्हाडापुरते बोलायचे तर, खासदार संजय धोत्रे यांनी तब्बल वीस वर्षांपासून अकोल्याची जागा एकहाती राखली आहे, पण त्यांच्या वैद्यकीय अडचणी पाहता भाजपचा यंदाचा उमेदवार अद्याप समोर आलेला नाही. ऐनवेळी कोणाचे नाव पुढे करायचे हे पक्षाच्या मनात नक्की असेलही, पण स्थानिकात केवळ चर्चाच झडत आहेत. समोर महाआघाडीमध्ये कोणता पक्ष लढणार याचीच घुळघुळ सुरू आहे. ज्येष्ठ नेते प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे खरी, परंतु त्यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीचा महाआघाडी आणि ''इंडिया'' यात कुठे व कसा समावेश होतो हेच अजून निश्चित होताना दिसत नाही. त्यामुळे ''असे'' झाले तर ''कसे''? याच भोवती सारे आडाखे बांधले जात आहेत. काँग्रेसमध्ये ऐनवेळी चर्चेत नसणारे नाव येण्याची परंपरा असूनही काहीजण कंबर कसून तयारीला लागलेले दिसत आहेत, पण मुळात पक्षालाच येथून जागा सुटते का, याचीच संभ्रमावस्था आहे.

बुलढाण्याचीही परिस्थिती अकोल्यासारखीच आहे, फक्त पक्ष वेगळा आहे एवढेच. तेथे आजवर शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी तीन वेळा जागा राखली. ते शिंदे गटात गेलेले असल्याने यंदा त्यांच्याही उमेदवारीबाबत चर्चा झडत आहेत. भाजपचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे तेथे वरचेवर दौरे होत असतात. जिल्ह्यातील काही आमदारांची खासदारकीसाठी चाचपणी करून पाहिली गेली म्हणे, पण खुद्द त्यांनीच अनिच्छा दर्शविल्याची वदंता आहे. महाआघाडीतून शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी नक्की झाल्याचे बोलले जात असले तरी अधिकृत घोषणा नाही. आजवर विरोधात लढणाऱ्या राष्ट्रवादीचे काय? हेदेखील गुलदस्त्यात आहे. अन्य संभाव्य इच्छुकही आहेत, पण सध्या त्यांचा खेळ ''व्हाॅट्सॲप''वरच सुरू आहे. पक्षाच्या पातळीवर कुणी कुणाचे नाव एकमताने घेताना दिसत नाही.

वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघ भावना गवळी यांनी तब्बल पाच वेळा राखला आहे. त्याही शिवसेना शिंदे गटात गेलेल्या असल्याने शिवसेना ठाकरे गट तेथे जोरात तयारीला लागला आहे, पण स्वतः गवळी यांनी ''मेरी झासी नही दुंगी'' अशी गर्जना जाहीरपणे केल्याने अन्य पर्यायी इच्छुकांचे मनसुबे उघड होऊ शकलेले नाहीत. गवळी यांच्या शिंदे गटाची महायुती असलेला भाजपही तेथे मैदानात गर्जना करताना दिसून येत आहे. पण कोणता पक्ष लढणार हेच नक्की नसल्याने अन्य उमेदवार उघडपणे दावेदारी करताना दिसत नाहीत. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीवर तूर्त शांतता असली तरी यवतमाळमधील काही नावे पुढे केली जात आहेत.

सारांशात, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सारेच पक्ष लागले असले तरी महायुती व महाआघाडी अंतर्गत कोणत्या जागा कोणी लढायच्या हेच नक्की नसल्याने उमेदवारीबाबतच्या नावांची केवळ चर्चाच होताना दिसत आहेत. सुस्पष्टता कुणाच्याही नावाबाबत नसल्याने स्थानिक पातळीवरचा माहोल नेमके उमेदवार पुढे आल्यावरच बदलण्याची चिन्हे आहेत, त्याचीच वाट बघायची...

Web Title: The drum of the Lok Sabha is beating, but whose voice is it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.