नागपुरातही तीच स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 03:35 AM2018-04-13T03:35:28+5:302018-04-13T03:35:28+5:30

नागपुरात सातत्याने वाढत चाललेली गुन्हेगारी व आरोपींवर पोलिसांचा कमी झालेला वचक यामुळे शहरात कायद्याचा धाक उरलाय की नाही, असा प्रश्न प्रत्येक नागपूरकराला अस्वस्थ करीत आहे.

The same situation in Nagpur | नागपुरातही तीच स्थिती

नागपुरातही तीच स्थिती

Next

नागपुरात सातत्याने वाढत चाललेली गुन्हेगारी व आरोपींवर पोलिसांचा कमी झालेला वचक यामुळे शहरात कायद्याचा धाक उरलाय की नाही, असा प्रश्न प्रत्येक नागपूरकराला अस्वस्थ करीत आहे. नागपूर हे देशाचे मध्यवर्ती ठिकाण अन् महाराष्ट्राची उपराजधानी. त्या अर्थाने नागपूर सर्वात शिस्तप्रिय आणि कायद्याच्या दृष्टीने राज्यासाठी आदर्श शहर असले पाहिजे. परंतु चित्र याच्या अगदी उलट आहे. खून, दरोडे, बलात्कार यासारख्या घटनांची संख्या वेगाने वाढत आहे. मंगळवारी शहरातील झिरो डिग्री बारचे तापमान एका गुन्हेगाराने बंदुकीच्या धाकावर एका मिनिटात हजारपटीने वाढवून टाकले. कारण काय तर त्याला म्हणे, तेथे जेवायल्या आलेल्या तरुणींसोबत सेल्फी काढायचा होता. ही घटना रात्री पावणे दोनची. आता हा बार इतक्या उशिरा कसा सुरू होता, तो तसा रोजच सुरू असतो का, असतो तर त्याच्याकडे पोलिसांचे लक्ष कसे जात नाही, या बारमध्ये जेवायला आलेला गुन्हेगार कंबरेला बंदूक लटकवून येण्याचे धाडस कसे करू शकला, त्याला पोलिसांची भीती वाटली नाही का आणि अशी भीतीच उरली नसेल तर नागपूर पोलीस केवळ वर्दी मिरवण्यापुरतेच उरले आहेत का, असे हजार प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ही केवळ एकच घटना नाही. या शहरात मोकाट सुटलेले गुन्हेगार दरदिवसाआड पोलिसांच्या अब्रूचे असे जाहीर धिंडवडे काढत सुटले आहेत. वंश यादव नावाच्या एका निष्पाप मुलाचा खून झाला. आठवडाभर त्याचा मृतदेह सडत राहिला. गुन्हेगार या पोलिसांपुढे मिरवत राहिला. पण, पोलिसांना ना बेपत्ता वंश दिसत होता ना आरोपी. अखेर मृतदेहाच्या दुर्गंधीने या हत्याकांडाला वाचा फोडली अन् मग पोलीस कामाला लागले. चार दिवसांआधी कारवाई झालेल्या हुक्का बारचाही विषय याच पोलिसांच्या नाकर्तेपणाचा नमुना आहे. भारतनगर चौकातल्या एका अर्पाटमेंटमध्ये पोलिसांचा ताफा शिरला तेव्हा नऊ अल्पवयीन मुले चक्क हुक्क्याचा धूर हवेत उडवत होती. या ठिकाणी जे हुक्का पार्लर सुरू आहे ते अशा शेकडो अल्पवयीन मुलांच्या आयुष्यात रोज अंधार पेरतोय हे पोलिसांना इतके दिवस कसे कळले नाही? पोटासाठी नोकरी-व्यवसाय करून रात्रीबेरात्री घरी परतणारे नागपूरकर सुखरूप घरी पोहोचतील याची खात्री देता येत नाही. शस्त्राच्या धाकावर भररस्त्यात लोकांना लुटले जात आहे. हायक्लास कुुंटणखाना उघडकीस येण्याच्या बातमीचे तर आता नावीन्यच संपून गेले आहे. चौकाचौकातील आमलेटच्या दुकानांवर उघडपणे ‘प्याले’ भरले जात आहेत. हे इतके घडूनही पोलिसांची सक्रियता मात्र कागदावरच आहे. ही कागदावरची सक्रियता वास्तवात कधी उतरणार, असा सवाल नागपूरकर विचारत आहेत.

Web Title: The same situation in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.