प्लास्टिकबंदीची गुढी, पर्यावरण रक्षणाच्यादृष्टीने सरकारचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 02:00 AM2017-09-19T02:00:33+5:302017-09-19T02:00:36+5:30

मराठी नववर्षाच्या शुभारंभी राज्यभरात प्लास्टिक कॅरिबॅग बंदीची गुढी उभारण्याचा राज्य शासनाचा निर्णय स्वागतार्ह असून पर्यावरण रक्षणाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

Plastics Gudi, a very important decision of the Government to protect environment | प्लास्टिकबंदीची गुढी, पर्यावरण रक्षणाच्यादृष्टीने सरकारचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय

प्लास्टिकबंदीची गुढी, पर्यावरण रक्षणाच्यादृष्टीने सरकारचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय

Next


मराठी नववर्षाच्या शुभारंभी राज्यभरात प्लास्टिक कॅरिबॅग बंदीची गुढी उभारण्याचा राज्य शासनाचा निर्णय स्वागतार्ह असून पर्यावरण रक्षणाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्ये जागोजागी फेकलेल्या प्लास्टिक पिशव्यांमुळे पाणी साठून राहिले होते. परिणामी फार मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. बहुदा या अनुभवातून प्लास्टिक कॅरिबॅग बंदीचा निर्णय घेण्याची उपरती सरकारला झाली असावी. परंतु त्याची अंमलबजावणी किती गांभीर्याने केली जाते यावरच त्याचे यश अवलंबून आहे. प्लास्टिकबंदीचा निर्णय हा काही नवा नाही. यापूर्वीही तसा प्रयत्न झाला आहे. पण प्लास्टिकला आपण राज्यातून आणि आपल्या आयुष्यातूनही हद्दपार करू शकलेलो नाही. उलटपक्षी त्याचा वापर दिवसेंदिवस वाढतच आहे. प्लास्टिकच्या अमर्याद वापराने पर्यावरणासोबतच मानवी आरोग्यही धोक्यात आले आहे. पण याचे गांभीर्य अजूनही आपण ओळखलेले नाही. प्लास्टिक युगाचा प्रारंभ एवढा घातक ठरेल याची कल्पनाही कुणी केली नव्हती. आपल्या हातातील कापडी पिशव्या बघताबघता गायब झाल्या आणि त्यांची जागा प्लास्टिक कॅरिबॅगने घेतली. हे प्लास्टिक दरवर्षी लाखो जनावरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरते. जमिनीचा पोत तर त्यामुळे खराब होतोच पण पूर येण्यामागीलही ते एक मोठे कारण ठरते. जमिनीवर प्लास्टिक कुजण्यास १००० वर्षे तर पाण्यात ४०० वर्षे लागतात. पण तोपर्यंत या प्लास्टिकने अनेकांचे जीवन कुजते. खरे तर अनेक देशांनी प्लास्टिकचे दुष्परिणाम लक्षात येताच त्याचा वापर कमी अथवा बंद करून विघटनशील पिशव्यांचा उपयोग सुरू केला आहे. भारतातही केंद्र आणि राज्य सरकारांकडून गेल्या काही वर्षांपासून प्लास्टिकचा अमर्याद वापर कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण लोकांमधील प्लास्टिकच्या व्यसनाधीनतेमुळे ते निष्फळ ठरले. केंद्र सरकारने देशातील सर्व राष्टÑीय स्मारके आणि पर्यटन स्थळांवर प्लास्टिकबंदी जाहीर केली होती. ती कितपत अमलात आली कुणास ठाऊक. त्यामुळे शासनाला खरोखरच प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर बंद करायचा असल्यास लोकसहभागातून एक चळवळच उभी करावी लागणार आहे. काही वर्षांपूर्वी लातूर शहरात असा प्रयोग झाला होता. शहरातील शाळा महाविद्यालये आणि सर्व प्रभागांमध्ये प्लास्टिक मुक्तीबाबत जागरण करण्यात आले. या धर्तीवर मोठे प्रयोग करावे लागतील. कारण शेवटी लोकांनी मनावर घेतले तरच प्लास्टिक कॅरिबॅगपासून मुक्ती शक्य आहे.

Web Title: Plastics Gudi, a very important decision of the Government to protect environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.