पितरांना संतुष्ट करणारा पक्ष पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 02:32 AM2017-09-10T02:32:03+5:302017-09-10T02:32:09+5:30

 The party that satisfies ancestors fifteen | पितरांना संतुष्ट करणारा पक्ष पंधरवडा

पितरांना संतुष्ट करणारा पक्ष पंधरवडा

Next

- मोहन धुंडिराज दाते

भारतीय समाजमनाचा धर्मशास्त्र हा बळकट आधार आहे. शास्त्राने सांगितलेले विधी यथायोग्य आणि यथाशक्ती करणे, ही गोष्ट धर्माचरण म्हणून पाळली जाते. धर्मशास्त्र समजून घेऊन, त्याचे पालन करणारा भारतीय समाज हा सश्रद्ध आहे. श्रद्धापूर्वक विधी करावेत आणि प्रयत्नपूर्वक कर्मे करावीत, हीच भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. विधी वा कर्मे करीत असताना, त्या विषयीचा कौटुंबिक, सामाजिक दृष्टिकोनही समजावून घेतला पाहिजे, तरच प्राचीन काळातले धर्मशास्त्र वर्तमानकाळातही मानवी जीवनाला प्रेरक, उपकारक ठरू शकेल. शास्त्रार्थ हा नेहमीच समाजपुरुषाला पुष्टी देणारा असतो. त्यामुळे विधी वा कर्मे ही शेवटी सामाजिक स्वास्थ्यासाठी आणि व्यक्तिगत अभ्युदयासाठी असतात.

भाद्रपद वद्य प्रतिपदा ते अमावस्या हा पंधरा दिवसांचा कालावधी ‘पक्ष पंधरवडा’ म्हणून पाळला जातो. घरातील व्यक्ती मृत झाल्यावर, त्या तिथीला त्यांचे श्राद्ध केले जाते. हे श्राद्ध मातृ व पितृ वंशपरंपरेतील मागील तीन पिढ्यांचे स्मरण करण्यासाठी केले जाते.
वडील, आजोबा, पणजोबा अशा तीन पिढ्यांच्या (आई, आजी, पणजी अशाप्रमाणेही) नावांचा उल्लेख करून, हे स्मरण केले जाते. मात्र, भाद्रपद वद्य पंधरवड्यात पिढीतील सर्व पितरांना, तसेच आप्तांना, मित्रांना जे मृत आहेत, त्या सर्वांना वडिलांच्या तिथीस श्राद्ध करून, त्यांचे स्मरण करायचे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला पोषक ठरलेल्या गुणांचे अनुकरण कसे करता येईल, या विषयीचा संकल्प करायचा. श्रद्धापूर्वक हे विधी करताना, प्रयत्नपूर्वक कार्य करण्याची एक समन्वयी भूमिका आपल्या धर्मशास्त्राने घालून दिली आहे, ही त्यातील महत्त्वाची बाब.
केवळ हिंदू धर्मशास्त्रातच असा अन्न, पाणी देण्याचा विचार मांडला आहे असे नाही, तर पारशी, ख्रिस्ती, मुस्लीम, जैन अशाही धर्मांमध्ये पितरांना अन्न, पाणी देण्याची प्रथा आहे.
हे श्राद्ध भाद्रपद पक्ष पंधरवड्यातच का द्यायचे? याविषयी धर्मशास्त्राने खगोलशास्त्राचा आधार घेऊन, एक भूमिका मांडली आहे. ती म्हणजे, दक्षिणायन आणि उत्तरायण अशी सूर्याभोवतीच्या पृथ्वी प्रदक्षिणेतील कालमापनाची गणना सर्वपरिचित आहेच. पृथ्वीवरील एक दिवस हा चोवीस तासांचा मानला गेला आहे, पण जे मृत झाले, त्या जिवांचा वर्षभराचा कालावधी म्हणजे एक दिवस असे मानले जाते. उत्तरायणाचा काळ हा देवांचा दिवस आणि दक्षिणायनाचा काळ ही देवांची रात्र, तसेच दक्षिणायन हा पितरांचा दिवस आणि उत्तरायण ही पितरांची रात्र असते. कर्क संक्र मणापासून धनुसंक्र मणापर्यंतचा कालावधी हा पितरांचा होय. मध्यान्हात पितरांना भोजन (अन्नपाणी) देण्यासाठीचा काळ म्हणजे, पक्ष पंधरवडा, म्हणजेच भाद्रपद वद्य प्रतिपदा ते अमावस्या हा कालावधी होय. एरवी आपण जसे मैत्री दिन, पर्यावरण दिन, आरोग्य दिन असे विशिष्ट दिवस निश्चित करून ते साजरे करतो, त्याप्रमाणेच पितृपंधरवडा हा ‘पितृपक्ष’ म्हणून पाळला जातो.

ऋ णनिर्देशाचा क्षण : भारतीय धर्मशास्त्र आणि भारतीय संस्कृती ही पाच प्रकारची ऋ णनिर्देशाची परंपरा पाळत आली आहे. १) देव ऋ ण २) गुरु ऋ ण ३) मातापितरांचे ऋ ण ४) समाज ऋ ण
५) पशुपक्षी ऋण. देवाने सृष्टी निर्माण केली व आपल्याला जगायला अनुकूलता प्राप्त करून दिली, म्हणून देव ऋण आपण मान्य करतो व पूजाविधी करून, त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. गुरू हे ज्ञानदृष्टी देतात, म्हणून त्यांचेही ऋ ण आहेत. आपण गुरु पूजन/गुरुदक्षिणा याद्वारे तेही मान्य करतो. मातृपितृ ऋ ण हेही महत्त्वाचे आहे. कारण त्यांनीच आपल्याला जीवसृष्टी पाहण्याचे भाग्य प्राप्त करून दिले. याबद्दल आपण त्यांच्याविषयी कृतज्ञ असलेच पाहिजे. जिवंतपणी आपण त्यांची एकसष्ठी वा सहस्रचंद्रदर्शन अशासारखे सोहळे आयोजित करून, त्यांना वंदन करतो, त्यांचे पूजन करतो, त्यांचा सत्कार करतो, पण त्यांच्या मृत्युनंतरही त्यांचे स्मरण करून, त्यांच्या गुणानुकरणाचा संकल्प आपण करावा, हीच पक्ष पंधरवड्यातील त्यांच्या तिथीच्या दिवशी अन्नपाणी देऊन ऋ ण व्यक्त करण्याची एक योजना आणि संधीही आहे.

पितृपक्षाविषयी काही शंका समाधान!
१) प्रथमवर्ष श्राद्ध झाल्यानंतर येणा-या पितृपक्षात महालय श्राद्ध करावे. चालू वर्षात घरातील एखादी व्यक्ती मृत झाल्यास, ती व्यक्ती सोडून इतर पितरांचे महालय श्राद्ध करता येते.
२) एखादी सुवासिनी मृत झालेली असेल आणि एक वर्ष पूर्ण झाले असेल, तर तिचे अविधवा नवमीच्या दिवशी महालय श्राद्ध करावे.
३) पौर्णिमा श्राद्धतिथी असेल, तर त्यांचा महालय भरणी, अष्टमी, व्यतिपात, द्वादशी किंवा अमावस्या, यापैकी कोणत्याही दिवशी करता येतो. अपघात, घातपात किंवा आत्महत्या, यामुळे मृत झालेल्या व्यक्तींचा महालय चतुर्दशी श्राद्धाचे दिवशी करावा.
४) पितृपंधरवड्यात मुंज, विवाह, वास्तुशांती यांचे मुहूर्त नसतात, परंतु जागेची खरेदी, वाहनाची खरेदी, विवाह मीलनासाठी पत्रिका पाहणे, डोहाळे जेवण, जननशांतीसाठी/पंचाहत्तरी यासारख्या शांती इ. सर्व कार्ये करता येतात. यासाठी पितृपंधरवडा अशुभ निश्चित नाही.

(लेखक हे पंचांगकर्ते आहेत)

Web Title:  The party that satisfies ancestors fifteen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.