नितीशकुमारांचे ‘बंड’!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 12:35 AM2018-07-10T00:35:46+5:302018-07-10T00:36:23+5:30

नितीशकुमारांच्या जनता दल (युनायटेड) या पक्षाने मोदींच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरुद्ध बंड पुकारण्याची भूमिका आपल्या दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात घेतली आहे. आगामी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा बिहारमधील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून नितीशकुमारांना मान्यता द्या ही त्या पक्षाची मोदींकडे मागणी आहे

 Nitish Kumar's 'rebellion'! | नितीशकुमारांचे ‘बंड’!

नितीशकुमारांचे ‘बंड’!

Next

नितीशकुमारांच्या जनता दल (युनायटेड) या पक्षाने मोदींच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरुद्ध बंड पुकारण्याची भूमिका आपल्या दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात घेतली आहे. आगामी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा बिहारमधील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून नितीशकुमारांना मान्यता द्या ही त्या पक्षाची मोदींकडे मागणी आहे. सध्याही तेच बिहारचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना रालोआचा पाठिंबा आहे. हीच स्थिती त्या पक्षाला यापुढेही कायम राहायला हवी आहे. अशी मागणी मोदींचा भाजप किंवा रालोआ निवडणुकीपूर्वी मान्य करील अशी त्यांची मानसिकता नाही. भाजपची भूमिका आरंभी सहकार्याची राहिली तरी पुढे ती आक्रमकच नव्हे तर सर्वंकष होते. आपली गरज म्हणून त्या पक्षाने आज नितीशकुमारांचे मुख्यमंत्रिपद स्वीकारले असले तरी त्याला त्या राज्यात स्वत:ची सत्ता आणायची आहे. भाजप हा पक्ष तसाही नितीशकुमारांचे पद वा मुख्यमंत्रिपद राखायला त्याचे राजकारण करीत नाही. त्याचे बिहारमधील नेते व उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी हे स्वत:च मुख्यमंत्रिपदाची बाशिंगे बांधून आहेत व त्यांचे तसे असणे हे गैरही नाही. नितीशकुमारांच्या पक्षाला मात्र बिहारमध्ये व देशातही त्यांच्या नेतृत्वावाचून तारून नेणारी दुसरी कोणतीही शक्ती नाही. त्यामुळे आपला भविष्यकाळ सुरक्षित करण्यासाठी त्याने आपली मागणी अगोदरच पुढे रेटली आहे. नितीशकुमारांनी लालूप्रसाद यादवांचा राष्ट्रीय जनता दल व काँग्रेस यांच्या मदतीने बिहारची निवडणूक जिंकली. मात्र पुढे त्या दोन्ही पक्षांचा विश्वासघात करून भाजपसोबत आताचे आपले सरकार बनविले. परिणामी त्यांना भाजपेतर पक्षात मान नाही व स्थानही नाही. त्यामुळे भाजपचा विश्वास राखणे व आपल्या मागण्या वाढवीत नेणे हे महाराष्ट्रातील शिवसेनेचे राजकारण करण्याचा मार्ग त्यांनी आता अनुसरला आहे. त्याचसाठी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड व मणिपूर या चार राज्यात होऊ घातलेल्या विधानसभांच्या निवडणुकीत भाजपसोबत न राहता त्यातील अनेक जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला आहे. आपल्या मागणीचा दबाव वाढविण्याचाच त्यांचा हा पवित्रा आहे. भाजपने त्याबद्दल आपली प्रतिक्रिया अजून व्यक्त केली नसली तरी ते याला भीक घालील असे त्याने काश्मिरातील मेहबुबा मुफ्ती सरकारबाबत घेतलेल्या भूमिकेवरून वाटत नाही. तसे तो वागला तर मात्र नितीशकुमारांच्या व त्यांच्या पक्षाच्या वाट्याला एक राजकीय निर्वासितपण येणार आहे. भाजप त्यांना जवळ करणार नाहीत आणि भाजपेतर त्यांना सोबत घेणार नाहीत. एका अर्थाने नितीशकुमारांनी ओढवून घेतलेले हे दुर्दैवी प्राक्तन आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत त्यांच्याकडे मोदीचा पर्याय म्हणून देश पाहू लागला होता. त्यांनी लालूप्रसादांच्या मदतीने बिहार हे राज्य जिंकले तेव्हाची त्यांची प्रतिमा राष्ट्रीय होती. आता ती नुसती प्रादेशिकच नाही तर अर्धप्रादेशिक बनली आहे. ती फुगवून मोठी करण्याचे त्यांचे आत्ताचे राजकारण त्यांना मोठे करण्याऐवजी मोडित काढणारेच अधिक आहे. एकेकाळचा हा समाजवादी नेता भाजपच्या आहारी गेला असेल आणि आता तो त्याच्याशीही राजकारण करीत असेल तर त्याचा विश्वास कुणाला वाटेल? राजकारण हा केवढ्याही व कशाही तडजोडींचा खेळ असला तरी त्यालाही जनतेच्या विश्वासाची गरज आहे. नितीशकुमारांनी अल्पावधीत एवढ्या कोलांटउड्या घेतल्या आहेत की त्यांना हा विश्वास प्राप्त होणे आता अवघडही ठरणार आहे.

Web Title:  Nitish Kumar's 'rebellion'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.