मराठी कालिदासाची स्मृतिशताब्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:53 PM2018-01-24T23:53:35+5:302018-01-25T00:17:19+5:30

‘मंगल देशा, पवित्र देशा महाराष्ट्र देशा’ या गीतातून महाराष्ट्राचा महिमा गाणारे थोर कवी आणि एकाहून एक सरस नाटके लिहून महाराष्ट्र सारस्वतात नाव अजरामर करणारे सिद्धहस्त लेखक राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिशताब्दी वर्षाची कालपासून सुरुवात झाली. उपमा नरसिंंहस्य। श्रीपादस्यार्थगौरवम्॥

 Marathi Kalidasa's memory! | मराठी कालिदासाची स्मृतिशताब्दी!

मराठी कालिदासाची स्मृतिशताब्दी!

Next

‘मंगल देशा, पवित्र देशा महाराष्ट्र देशा’ या गीतातून महाराष्ट्राचा महिमा गाणारे थोर कवी आणि एकाहून एक सरस नाटके लिहून महाराष्ट्र सारस्वतात नाव अजरामर करणारे सिद्धहस्त लेखक राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिशताब्दी वर्षाची कालपासून सुरुवात झाली.
उपमा नरसिंंहस्य। श्रीपादस्यार्थगौरवम्॥
कृष्णस्य पदलालित्यम्। रामे सन्तित्रयो गुणा॥
न. चिं. केळकर, श्री. कृ. कोल्हटकर व कृ. प्र. खाडिलकर या तिघांची एकवटलेली त्रिवेणी प्रतिभा गडकरी नावाच्या सुंदर संगमावर कशी अलंकृत झाली आहे, याचे या श्लोकात सुंदर वर्णन केले आहे. महाराष्ट्र शारदेच्या या लाडक्या पुत्राला आपल्यातून जाऊन आता शंभर वर्षे पूर्ण होतील, तरी त्यांची ‘रामरसवंती’ आजही महाराष्ट्रात स्वच्छंदपणे बागडते आहे!
२६ मे १८८५ रोजी गुजरातेत नवसारी जिल्ह्यात गणदेवी मुक्कामी या रामाचा जन्म दुपारी १२ वाजता झाला. सहाव्या वर्षीच त्यांचे पितृछत्र हरपले. थोड्याच दिवसांत धाकटे बंधू गोविंदचेही अकाली निधन झाले. यातून सावरण्यासाठी ते पुण्यात आले. नवलाची बाब म्हणजे तोपर्यंत त्यांना मराठीचा गंधही नव्हता. शिक्षण घेऊन त्यानंतर नोकरी करत असताना ते विविध नियतकालिकांतून कविता लिहू लागले. यातून मित्राच्या ओळखीने त्यांना ‘किर्लोस्कर नाटक कंपनी’त नाट्यपदं लिहिण्याची संधी मिळाली. त्या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि एक सोनेरी कारकीर्द आकाराला आली. उपमा, उत्प्रेक्षा, प्रास, अलंकारांनी नटलेली भरजरी भाषा आणि एक वेगळ्या प्रतीचा निर्भेळ विनोद घेऊन १९१२ मध्ये त्यांचं ‘प्रेमसंन्यास’ रंगभूमीवर अवतरलं! आणि महाराष्ट्राला राम गणेश गडकरी नावाच्या प्रतिभेचे दर्शन झालं!
प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन आणि राजसंन्यास ही पाच नाटके, वाग्वैजयंती हे काव्य आणि विनोदी लेखन ही त्यांची साहित्यसंपदा. त्यांनी आपले कवितालेखन ‘गोविंदाग्रज’ या टोपणनावाने केले, तर विनोदी लेखन ‘बाळकराम’ या नावाने. बोचºया नसलेल्या त्यांच्या अभिजात विनोदानेही एक दर्जा राखत कमालीची उंची गाठली. पहिली चार सामाजिक तर राजसंन्यास हे ऐतिहासिक नाटक होते. ‘एकच प्याला’ या नाटकाने तर पुढे लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. मराठी रंगभूमीवर अखंड भरजरी वस्त्रांत वावरलेले बालगंधर्व या नाटकात सिंधूच्या रूपात अगदी आनंदाने फाटक्या लुगड्यात प्रेक्षकांसमोर वावरले. ‘वाग्वैजयंती’च्या अभिनव वाग्विलासाने महाराष्ट्र शारदेची पूजा बांधणारा हा लखलखता कोहिनूर मराठी सारस्वतात एका विलक्षण तेजाने झळकला! आणि त्याच्या चंद्रकलेप्रमाणे सदोदित वर्धिष्णू होणाºया वाग्वैभवाने महाराष्ट्र दिपून गेला! अवघे जीवन नाट्यक्षेत्रातील वातावरणात घालविलेले गडकरी तिशीनंतर अचानक आजारी पडू लागले. हवापालटासाठी १९१८ च्या नववर्षात सावनेरला आले. प्रवासात आपले बंधू विनायकराव यांना ऐकवलेला अठरा नाटकांचा भावी संकल्प पूर्ण होणं नियतीच्या मनात नसावं. कारण सावनेरी आल्या आल्या ते अंथरुणाला खिळले!
२३ जानेवारी १९१८ रोजी रात्री १ वाजता भावबंधनाचा अखेरचा प्रवेश त्यांनी पूर्ण केला आणि अवघ्या ३३ व्या वर्षी हा तेज:पुंज चंद्रमा अकस्मात मावळला. मावळताना त्याने आपल्या बौद्धिक ज्ञानाची श्रीशिल्लक महाराष्ट्रशारदेच्या चरणी अर्पण केली! ही श्रीशिल्लक पाहून महाराष्ट्राने त्यांना ‘मराठी रंगभूमीचा कालिदास’ म्हणून अग्रपूजेचा मान दिला. योगायोग म्हणजे या कालिदासाच्या अस्थीही अखेर कविकुलगुरू कालिदासाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या रामटेकच्या काव्यभूमीतच विसर्जित झाल्या! त्यांच्या नाट्य व काव्यसंपदेतून अवतरलेल्या अलौकिक भाषाप्रभुत्वाने ते आजही अजरामर आहेत.
- विजय बाविस्कर vijay.baviskar@lokmat.com

Web Title:  Marathi Kalidasa's memory!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.